महाराष्ट्राचा सर्वांत मोठा सांस्कृतिक उत्सव म्हणजे दरवर्षी भरणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. सातार्यात 99 वे संमेलन याच वर्षी पार पडल्यानंतर पुढचे शंभरावे ऐतिहासिक संमेलन कुठे भरणार, याकडे साहित्यरसिकांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात शंभरावे म्हणजे शताब्दी संमेलन घेण्याचे निश्चित झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात ते भरणार आहे. पहिले संमेलन पुण्यातच भरले होते आणि आता शंभरावेही पुण्यातच होत आहे, हा एक योगायोग. पहिले संमेलन 1878 मध्ये न्या. महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या पुढाकाराने भरविण्यात आले होते. त्याकाळी साहित्य नव्हे, तर ग्रंथकारांचे संमेलन म्हटले जायचे. पहिले संमेलन फारसे यशस्वी झाले नाही म्हणून न्या. रानडे यांनी दुसरे संमेलन 1885 साली पुण्यातच भरविले. या संमेलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी महात्मा फुले यांना निमंत्रण पाठविले होते. फुल्यांनी मराठी ग्रंथकार सभेस पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली होती. ते पत्र ज्ञानोदय वृत्तपत्राने 11 जून 1885 च्या अंकात प्रसिद्ध केले होते. यांच्यात मिसळल्याने आम्हा शूद्रादि अतिशूद्रांचा कांहीं एक फायदा होणे शक्य नाहीं, याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे, असे या पत्रात फुल्यांनी म्हटले होते. त्याच पत्रात त्यांनी न्या. रानडेंना उद्देशून ’माझ्या घालमोड्या दादा’ असा उल्लेख केला होता. महात्मा फुले यांच्या अर्धांगिनी सावित्रीबाई यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाच्या प्रांगणात फुले दाम्पत्याचे पुतळे आहेत आणि त्यांच्या साक्षीने शंभरावे संमेलन भरणार आहे, हा आणखी एक योगायोग. न्या. रानडे हेही समाजसुधारक होते. ग्रंथकार संमेलनावरून फुल्यांनी त्यांच्यावर टीका केली, तरी दोघे मात्र मित्रच होते. शंभरावे संमेलन 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत चार दिवस होणार असून, ते ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पाडण्याचा मानस अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने केला आहे. या संमेलनाचे यजमानपद पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे असून, समर्थ युवा फाउंडेशन व पुणे नगर वाचन मंदिर हे सहसंयोजक आहेत. पुणे, मुंबई वगळता जेथे साहित्य संमेलने झाली आहेत अशा महाराष्ट्रातील 48 ठिकाणांसह महाराष्ट्राच्या विविध भागांत संमेलनपूर्व 99 साहित्यिक उपक्रमांद्वारे शंभराव्या साहित्य संमेलनाची नांदी होणार आहे. 15 ऑगस्ट 2026 ते 15 जानेवारी 2027 या कालावधीत ’नांदी शंभराव्या साहित्य संमेलनाची’ या नावाने हे साहित्यिक उपक्रम छोटेखानी संमेलने ठरणार आहेत. संमेलनाचे स्थळ निश्चित झाले असले, तरी अध्यक्ष कोण होणार याकडे नेहमीप्रमाणे लक्ष वेधले गेले आहे. मात्र, संभाव्य अध्यक्ष म्हणून अद्याप कोणतीही नावे चर्चेत नाहीत. अध्यक्ष निवडीची प्रक्रिया ऑगस्ट 2026 मध्ये सुरू होणार असून, त्यानंतर अधिकृत नावाची घोषणा केली जाईल. अध्यक्षांची निवड सर्वसंमतीने, सन्मानाने आणि बिनविरोध केली जाणार आहे. महामंडळाच्या चार प्रमुख घटक संस्था- पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर- आणि इतर संलग्न तसेच समाविष्ट संस्थांकडून ज्येष्ठ व योग्य साहित्यिकांच्या नावांचे प्रस्ताव व शिफारशी मागवल्या जातील. संस्थांकडून आलेल्या नावांची यादी महामंडळासमोर ठेवली जाईल. हे संमेलन शंभरावे म्हणजेच मैलाचा दगड ठरणारे असल्याने साहित्यातील सर्वोच्च योगदान, ज्येष्ठता आणि सांस्कृतिक उंची लक्षात घेऊन निवड समिती व महामंडळाचे सदस्य नावांवर सखोल चर्चा करतील आणि एकमताने निवड केली जाईल. कोणताही वाद किंवा मतभेद टाळण्यासाठी सर्व घटकांच्या संमतीने केवळ एकाच नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. ज्या विद्यापीठाच्या प्रांगणात संमेलन भरणार आहे, त्या विद्यापीठाला मोठा इतिहास आहे. या विद्यापीठाची स्थापना 10 फेब्रुवारी 1949 रोजी पुणे विद्यापीठ (युनिव्हर्सिटी ऑफ पूना) या नावाने झाली होती. फुले दाम्पत्याचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची मागणी महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक पक्षसंघटनांनी लावून धरली होती. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने 7 जुलै 2014 रोजी त्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत 9 ऑगस्ट 2014 रोजी अधिकृत नामकरण समारंभ पार पडला. हे नामांतर नव्हते, तर नामविस्तार होता. विद्यापीठातील विविध भाषा विभाग व ललित कला केंद्रांतील विद्यार्थी आणि प्राध्यापक संमेलनाच्या आयोजनात थेट सहभागी होतील. शंभर वर्षांच्या संमेलनांचा इतिहास, जुनी भाषणे आणि दुर्मिळ ग्रंथांचे एक भव्य डिजिटल प्रदर्शन संमेलनस्थळी उभारले जाणार आहे. संमेलनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. साहित्याच्या सर्व प्रवाहांना सामावून घेणार्या, सर्व समाज घटकांना आपलेसे करणार्या लेखक किंवा लेखिकेला अध्यक्षपदाचा मान मिळावा, अशी अपेक्षा आहे. संमेलनात कोणताही वाद निर्माण होणार नाही, याची दक्षता साहित्य महामंडळाने घ्यावी, अशीही अपेक्षा आहे. पहिल्या संमेलनाच्या जन्मस्थळी शताब्दी संमेलनाचा योग जुळून आला आहे. गेल्या दहा दशकांपासून संमेलनाची परंपरा सुरू आहे. काळाच्या ओघात संमेलनाचे स्वरूप बदलत गेले. मराठी साहित्य संमेलनापासून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या नावांनी संमेलने भरू लागली. दलित, विद्रोही, ग्रामीण, आदिवासी, खिस्ती, मुस्लिम, अहिराणी अशा नावांनी संमेलने भरवली गेली. इतकेच नव्हे, तर विभागवार संमेलनेही भरवली जात आहेत. कोणत्याही नावाने संमेलने भरवली गेली, तरी ती मराठी साहित्याला समृद्ध करणारी ठरली आहेत आणि ठरतील. कोणत्याही संमेलनात राजकीय नेत्यांची उठबस असते. संमेलनाला राजाश्रय मिळत असेल किंवा सरकारचा निधी मिळत असेल, तर राजकीय नेत्यांची मांदियाळी अपरिहार्य आहे. संमेलनात सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांना आमंत्रित केले जाते आणि तेही आवर्जून उपस्थित राहून मांडीला मांडी लावून बसतात, हेही नसे थोडके! समाजजीवनाचे दर्शन साहित्यात घडते, तेच प्रतिबिंब शताब्दी संमेलनात दिसेल, अशी अपेक्षा आहे.
Prelude to the Centenary Conference
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik