हनुमान चालीसा केंद्रांच्या माध्यमातून 25 कोटी लोकांपर्यंत आरोग्यसेवा : डॉ. प्रवीण तोगडिया
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवेसाठी 10 हजार डॉक्टर उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता असून, मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत यंदा दहा पट अधिक गर्दी होऊ शकते असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. गर्दीचे योग्य नियोजन स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि अफवा रोखणे या बाबींना विशेष महत्त्व देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
नाशिक दौर्यावर आलेल्या डॉ. तोगडिया यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भूमिका मांडली. यावेळी नगरसेवक कैलास मुदलियार, शिवसेना नेते विजय करंजकर, मोहन चौहान, नितीन चिडे, विनय उपाध्याय, लकी ढोकणे आदी उपस्थित होते.
प्रयागराज कुंभमेळ्यापासून हनुमान चालीसा सप्ताहाचा उपक्रम सुरू केल्याचे सांगून, देशातील लाखो गावांमध्ये हनुमान चालीसा पठण केंद्रे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. या केंद्रांचे केवळ धार्मिक उपक्रमांपुरते मर्यादित स्वरूप न ठेवता त्यांचे आरोग्य केंद्रांमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. सुमारे 25 कोटी लोकांपर्यंत आरोग्यविषयक व्यवस्था पोहोचविण्याचा संकल्प असून, कर्करोगाच्या बाबतीतही वेळीच तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत. आपण कर्करोगतज्ज्ञ असून, योग्य वेळी उपाययोजना केल्यास दहापैकी आठ रुग्णांना कर्करोगापासून वाचविणे शक्य असल्याचा दावा त्यांनी केला.
शेतकरी आत्महत्या ही शरमेची बाब
शेतकर्यांच्या प्रश्नावर बोलताना डॉ. तोगडिया म्हणाले शेतकरी आत्महत्या करतो, ही समाजासाठी शरमेची बाब आहे. मी स्वतः शेतकर्याचा मुलगा असून आजही शेतात घास कापतो. माझ्याकडे अडीचशे गायी आहेत. महाराष्ट्र सरकारने देशातील विविध राज्यांतून, विशेषतः मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक येथून मोठ्या प्रमाणावर चारा खरेदी करून शेतकर्यांना त्याचा योग्य मोबदला द्यावा. शेतकर्यांना केवळ पाच हजार रुपयांची मदत देण्याऐवजी शक्य तितकी जास्त आर्थिक मदत थेट रोख स्वरूपात द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
निवडणुकीपुरते पक्ष, अन्य वेळी हिंदू म्हणून संबंध
राजकीय विषयावर भाष्य करताना त्यांनी भाजपसह विविध पक्षांतील नेत्यांशी असलेल्या संबंधांबाबत भूमिका स्पष्ट केली. निवडणुकीच्या काळात पक्ष महत्त्वाचा असतो; मात्र इतर वेळी हिंदू म्हणून आपले संबंध महत्त्वाचे असतात. माझे सर्व हिंदूंशी संबंध आहेत. भाजपशी दूरचे संबंध असते तर गिरीश महाजन यांच्याशी बोललो नसतो. शिंदे शिवसेना अस्तित्वात येण्यापूर्वीही मी त्यांच्या घरी जात होतो. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणी बोलावले तरी त्यांच्या घरी जाईन. मात्र, भेटीनंतर त्यांच्यावर हिंदुत्वाचा अधिक मोठा शिक्का बसेल, असे ते म्हणाले. सत्ता येण्यात आमचाही हातभार असतो; मात्र त्याबाबत आम्ही बोलत नाही. सध्या जे आहे त्यात मी समाधानी असून सत्ता येते आणि जाते, असे सांगत त्यांनी दीर्घकालीन यशाला अधिक महत्त्व असल्याचे नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आपले सहकारी भाऊ संबोधत, नरेंद्र मोदी यांच्या वडिलांवर आपण कर्करोगाचे उपचार केले होते, असा दावाही त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन चांगले काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कुंभमेळ्यात गर्दी व्यवस्थापन महत्त्वाचे
नाशिकच्या आगामी कुंभमेळ्याबाबत माहिती घेणार असल्याचे सांगत त्यांनी आरोग्यसेवा आणि अन्नदानासाठी योगदान देण्याची तयारी दर्शविली. गरज भासल्यास दहा हजार डॉक्टर उपलब्ध करून देण्याची आपली ऑफर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्यात भाविकांना कमीत कमी चालावे लागेल, अशा पद्धतीने नियोजन केल्यास गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल. अफवा पसरणार नाहीत, स्वच्छता आणि गर्दी नियंत्रण यावर प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.
आंदोलनाचा अधिकार, मात्र हिंसा नको
लोकशाहीमध्ये आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार असून, समाजातील प्रश्नांसाठी आंदोलन आवश्यक आहे. मात्र, आंदोलनाला हिंसक वळण लागता कामा नये. फ्रान्समध्ये तरुण नागरिक आपला आवाज उठवतात, त्याचप्रमाणे भारतातील तरुणांनीही प्रश्नांवर आवाज उठवावा; परंतु हिंसक मार्गाचा अवलंब करू नये, असे आवाहन त्यांनी केले. 2029 मध्ये राजकीय चित्र काय असेल, याचा ज्योतिषशास्त्रीय अभ्यास आपण केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्रिशूळ वाटपाची जबाबदारी माझीच
त्रिशूळ वाटपाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी, त्रिशूळ आपणच वाटले होते, असे स्पष्ट केले. डॉक्टर असूनही पैसे कमावण्यापेक्षा सामाजिक आणि धार्मिक कार्याला प्राधान्य दिले. त्रिशूळ बनविण्याचा आपला कारखाना असून देवीचे शस्त्र त्रिशूळ आहे. ते प्रवीण तोगडिया वाटणार नाहीत तर कोण वाटणार, असा सवाल त्यांनी केला.
Preparations to provide 10,000 doctors for the Kumbh Mela
जिल्ह्यातील 4 लाख 47 हजार शेतकर्यांच्या खात्यावर पाच हजार नाशिक : प्रतिनिधी अनियमित पावसामुळे खरीप…
दीपावली सुट्टीमुळे राज्यासह परराज्यातून भाविक गडावर दाखल सप्तशृंगगड : प्रतिनिधी दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे साडेतीन शक्तिपीठांपैकी…
आजचे युग हे डिजिटल क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मोबाइल, इंटरनेट, ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा…
ग्राहकांंची चांदी, आगामी लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी संधी नाशिक : प्रतिनिधी दीपोत्सवाचा उत्सव संपताच देशांतर्गत आणि…
नाशिक केंद्रावर 23 नाट्य संस्थांचा सहभाग नाशिक : प्रतिनिधी दिवाळीचा उत्साह ओसरल्यानंतर आता नाशिककर नाट्यरसिकांना…