संपादकीय

चिमणीचे रक्षण – पर्यावरणासाठी आवश्यक पाऊल

एकेकाळी आपल्या घरांच्या कडांवर, अंगणात किंवा झाडांच्या फांद्यांवर चिवचिवाट करत उडणारी चिमणी हा पक्षी आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होता. सकाळच्या वेळी तिच्या गोड किलबिलाटाने दिवसाची सुरुवात होत असे. मात्र, आज हीच चिमणी हळूहळू आपल्या आसपासून अदृश्य होत चालल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे. या परिस्थितीकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आणि त्यातूनच जागतिक चिमणी दिवस या दिवसाची सुरुवात झाली.
सन 2010 मध्ये भारतातील पर्यावरण कार्यकर्ते मोहम्मद दिलावर आणि त्यांच्या नेचर फॉरएवर सोसायटी (Eco-Sys-ction Foundation) या संस्थेने देशातील घरगुती चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे लक्षात आणून दिले. या गंभीर समस्येकडे जगभरातील पर्यावरणतज्ज्ञांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी 20 मार्च 2010 रोजी विश्व चिमणी दिवस साजरा करण्याची घोषणा केली. या उपक्रमाला नंतर पर्यावरण आणि परिसंस्था अभ्यासकांनी मोठे समर्थन दिले. फ्रान्समधील वन्यजीव संस्था इको-सिस अ‍ॅक्शन फाउंडेशननेही (एले-डूी -लींळेप र्ऋेीपवरींळेप) या मोहिमेला उत्स्फूर्त सहकार्य दिले. त्यानंतर दरवर्षी 20 मार्च रोजी जगातील 50 हून अधिक देशांमध्ये विश्व चिमणी दिवस साजरा केला जातो.
पर्यावरणाचा महत्त्वाचा संकेत
चिमणी ही पर्यावरणशास्त्रात सूचक प्रजाती (Indicator Species) म्हणून ओळखली जाते. म्हणजेच एखाद्या परिसरात या पक्ष्यांची संख्या कमी होणे किंवा ते संकटग्रस्त होणे हे त्या भागातील पर्यावरणीय संतुलन बिघडत असल्याचे संकेत असतात. त्यामुळे चिमण्यांची घटती संख्या ही केवळ एका पक्ष्याची समस्या नसून, ती संपूर्ण परिसंस्थेसाठी धोक्याची घंटा मानली जाते.
विशेषतः कृषीप्रधान समाजासाठी चिमणी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण तिचे मुख्य अन्न म्हणजे कीटक. ज्या भागात चिमण्यांची संख्या जास्त असते, त्या भागात शेतीतील कीटकांचा त्रास कमी होतो. चिमण्या शेतातील अनेक हानिकारक कीटक खातात आणि त्यामुळे नैसर्गिकरीत्या कीटक नियंत्रणाची प्रक्रिया घडते. म्हणूनच चिमणी ही शेतकर्‍यांची निसर्गदत्त मैत्रीण मानली जाते.
चिमण्यांची घटती संख्या
तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार भारतातील शहरी भागांमध्ये चिमण्यांची संख्या 60 ते 80 टक्क्यांपर्यंत घटली आहे. ही घट विशेषतः दिल्ली, बेंगळुरू आणि मुंबई या शहरांमध्ये अधिक प्रमाणात आढळली आहे. या पार्श्वभूमीवर 2012 मध्ये दिल्ली सरकारने चिमणीला राज्य पक्षी म्हणून
घोषित केले.
चिमण्यांची संख्या कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. मागील काही दशकांत देशात वेगाने वाढलेले शहरीकरण आणि उभ्या राहिलेल्या काँक्रीटच्या इमारतींमुळे चिमण्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा मोठ्या प्रमाणावर नाश झाला. घरांच्या कौलांमधील फटी, अंगणातील झाडे आणि मोकळ्या जागा कमी झाल्यामुळे त्यांना घरटे बांधण्यासाठी योग्य ठिकाणे मिळेनाशी झाली. याशिवाय वाढते प्रदूषण, शेतीत कीटकनाशकांचा अतिरेकी वापर आणि मोबाइल टॉवरमधून होणार्‍या विकिरणांबाबत व्यक्त होणार्‍या शंका यांनाही चिमण्यांच्या घटत्या संख्येस कारणीभूत मानले जाते.
संरक्षणासाठी सामूहिक
प्रयत्न आवश्यक
विश्व चिमणी दिवस साजरा करण्यास सुरुवात झाल्यापासून लोकांमध्ये चिमण्यांच्या संरक्षणाविषयी जागरूकता वाढू लागली आहे. शहरी भागातील अनेक नागरिक आपल्या घरांच्या बाल्कनीत किंवा छतावर धान्याचे दाणे आणि पाण्याची छोटी वाटी ठेवू लागले आहेत. बागेत दाट झुडपे किंवा स्थानिक झाडे लावून चिमण्यांना सुरक्षित आश्रय देण्याचे प्रयत्नही वाढले आहेत.
चिमणी ही फक्त एक छोटा पक्षी नाही, तर ती आपल्या पर्यावरणाच्या संतुलनाचे प्रतीक आहे. तिचे अस्तित्व टिकवणे म्हणजे निसर्गाचे संतुलन जपणे होय. म्हणूनच प्रत्येकाने थोडीशी काळजी घेतली, तर पुन्हा एकदा आपल्या घराजवळ चिमण्यांचा गोड चिवचिवाट ऐकू येईल आणि निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ होईल.

Protecting the Chimney – A Necessary Step for the Environment

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

11 hours ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

11 hours ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

11 hours ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

11 hours ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

11 hours ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

11 hours ago