अग्रलेख

पाकचा निर्दयी हल्ला

पश्चिम आशियातील अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर निर्दयी हल्ले सुरू असून, मागचा-पुढचा विचार न करता इराण इस्रायल आणि शेजारी देशांवर हल्ले करत आहे. पश्चिम आशियातील युद्ध पेटलेले असताना, अफगाणिस्तानवर पाकिस्तानने निर्दयी हवाई हल्ले केले. यामुळे दोन देशांत युद्ध तीव्र होण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असून, खनिज तेल आणि गॅसची टंचाई भासत आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीतून खनिज तेल व गॅसची वाहतूक बंद असल्याचा परिणाम जगावर झाला असून, त्यापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दूर नाहीत. दोन्ही देशांची आर्थिक स्थिती फार चांगली नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानने शेजारच्या अफगाणिस्तानवर हल्ला करणे उचित ठरत नाही. भारताने या हल्ल्याचा धिक्कार केला असून, संयुक्त राष्ट्रसंघटनेने हल्ल्यात मृत व जखमी लोकांच्याप्रति संवेदना व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत असला, तरी त्याचे समर्थन करता येत नाही. हल्ल्यास जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा अफगाणिस्तानने दिला आहे. तर भारताने हा हल्ला अमानुष, निंदनीय असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या सैन्याने काबूलमधील उमीद अ‍ॅडिक्शन ट्रीटमेंट हॉस्पिटल या दोन हजार खाटांच्या नशामुक्ती रुग्णालयावर 16 मार्च रोजी हवाई हल्ला केला. या हल्ल्यामुळे रुग्णालयाचा मोठा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. यापूर्वीही अफगाणिस्तानमधील नागरी वस्ती असलेल्या भागांवर पाकिस्तानने हल्ले केल्याचे आरोप झाले आहेत. पाकिस्तानने रात्रीच्यावेळी अफगाणिस्तानच्या हद्दीमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये तब्बल 400 लोक ठार झाले. पाकिस्तानमधील बलुचिस्तान हा प्रांत अफगाणिस्तानच्या सीमेवर आहे. पाकिस्तानपासून वेगळे होण्याचा बलुचिस्तानमधील काही संघटनांचा प्रयत्न आहे. बलुचिस्तान स्वतंत्र करण्यासाठी काही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानात कार्यरत असल्याचा दावा पाकिस्तानचा आहे. या संघटना, त्यांना मदत करणार्‍या गटांच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. अफगाणिस्तानच्या हद्दीतून दहशतवादी कारवाया करणार्‍या गटांना लक्ष्य करण्यासाठी 26 फेब्रुवारीपासून पाकिस्तानने ऑपरेशन गजब लिल हक सुरू केले आहे. हे ऑपरेशन अजूनही सुरू आहे. हल्ल्यात काबूलमधील दोन ठिकाणांची तांत्रिक सहाय्य पायाभूत सुविधा आणि दारुगोळ्याची गोदामे नष्ट करण्यात आली, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले. पाकिस्तानच्या कारवाईमध्ये आतापर्यंत 684 अफगाण तालिबान दहशतवादी ठार झाले असून, 912 जण जखमी झाले आहेत. तालिबानींच्या 252 चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. तर 44 चौक्या ताब्यात घेऊन नंतर नष्ट करण्यात आल्या. तालिबान राजवटीचे 229 रणगाडे, चिलखती वाहने आणि तोफा नष्ट करण्यात आल्या आहेत. अफगाणिस्तानमधील जवळपास 73 दहशतवादी आणि त्यांच्या सहाय्यासाठीच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले असल्याचेही सांगितले गेले. परंतु, पाकिस्तानने काबूलमधील सन रुग्णालयावर हल्ला केला होता. यात किमान 400 जण ठार झाले. मुळात भारतात विशेषतः जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणारा पाकिस्तान दहशतवाद्यांच्या नावाने गळा काढत आहे. इराण युद्ध आणि त्याच्या जागतिक परिणामांवर जगाचे लक्ष केंद्रित असताना, पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ला केला. यामध्ये रुग्णालयातील 400 जण मृत झाले. यावरून हा अमानवीय हल्ला समजला जात आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील एका शाळेवर केलेल्या हल्ल्यात 150 मुली मृत पावल्या. तो हल्ला अमानवी होता. इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायलची जी नीती आहे, तीच नीती अफगाणिस्तानबाबत पाकिस्तानची आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी या हल्ल्यातून अफगाणिस्तानला एक टोकदार संदेश दिला. या हल्ल्यामुळे तालिबानचे पाकिस्तानशी संबंध बिघडत असल्याचे स्पष्ट होत असताना, भारताची अफगाणिस्तानशी जवळीक वाढत आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये दोन्ही सैन्य एकमेकांशी भिडण्यापूर्वी दोन्ही देशांचे अधिकारी गेल्या वर्षी नियमितपणे भेटत होते. तेव्हापासून हे संबंध वेगाने घसरले होते. तालिबान राजवटीपेक्षा कित्येक पट अधिक शक्तिशाली आहे. काबूलमधील रुग्णालयावरील हल्ल्यानंतर उभय देशांत तणाव वाढला. मात्र, सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि कतार यांच्या विनंतीवरून, ईद-उल-फित्रच्या निमित्ताने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने लढायांना तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा केली. अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील व्यसनमुक्ती केंद्रावर हवाई हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेटर्सनी पाकिस्तानवर निशाणा साधला. राशीद खान आणि मोहम्मद नबी यांनी पाकिस्तानचे कृत्य योग्य नाही, असे म्हटले आहे. रमजानच्या महिन्यात हे घडल्यामुळे अधिक दु:ख वाटते, अशी भावना राशीद खान याने व्यक्त केली होती. अफगाणिस्तानच्या युवा क्रिकेटरने भारत खरा मित्र असल्याचे सांगत पाकिस्तानला नापाक कृत्याबद्दल चपराक मारली आहे. अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू अल्लाह गझनफर याने पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, तिथे लोकांकडे उपचारासाठी पैसेही नाहीत आणि आता त्यांनी त्या ठिकाणालाच लक्ष्य केले. अनेक निरपराध लोकांनी जीव गमावला. अफगाणिस्तानातील लोकांना हे अजिबात मान्य नाही. ते काय सिद्ध करू इच्छितात, हे मला समजत नाही. ते येतात आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य करतात. आम्ही हे स्वीकारू शकत नाही, असे त्याने म्हटले. “भारत आमचा जवळचा मित्र आहे. अशा घटनांवर चर्चा करण्यासाठी आम्हाला त्यांच्याशी जोडले जावे असे वाटते, जेणेकरून भविष्यात अशा गोष्टी होऊ नयेत. इतर देशांनाही आम्ही विनंती करतो की, अशा परिस्थितीत लोकांच्या हिताचा विचार व्हावा. सध्या जग अनेक आव्हानांना सामोरे जात आहे आणि हे कोणासाठीही योग्य नाही,” असेही तो म्हणाला. भारत – पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेट संबंध संपुष्टात आलेले आहेत. त्यात अफगाणिस्तानी क्रिकेटपटूंना भारत जवळचा वाटत आहे. अफगाणिस्तानात पुराणमतवादी तालिबानी राजवट आहे. बलुचिस्तानमधील दहशतवाद्यांना तालिबान मदत करत असल्याचा पाकिस्तानचा संशय आहे. बलुचिस्तानचा प्रश्न पाकिस्तानचा आहे. परंतु, जगाचे लक्ष विचलित करण्यासाठीच पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ला केला. भारतविरोधी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल किंवा भारतात हल्ले केले म्हणून भारताने कारवाई केली तर पाकिस्तानला अमेरिकेची मदत घ्यावीशी वाटते. पण, दहशतवादाच्या नावाखाली अफगाणवरील हल्ल्याचे कोणत्याही देशाने समर्थन केले नाही, हे पाकिस्तानने लक्षात घेऊन दक्षिण आशियातील शांतता भंग करू नये.

Pakistan’s merciless attack

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

12 hours ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

12 hours ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

12 hours ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

12 hours ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

12 hours ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

12 hours ago