आरोग्य

श्रावण आणि आयुर्वेद

श्रावण महिना सुरू झाला की निसर्गावर हिरवी शाल पसरते, हवेत मंद गारवा दरवळतो आणि मनाला तृप्त करणारा भक्तिभाव दाटून येतो. ‘हर हर महादेव’चा गजर, महादेवाला अर्पण केलेले त्रिदल बेलपत्र, शिवामूठ आणि व्रतांचे सोहळे ही श्रावणाची खरी ओळख. भारतीय संस्कृतीचे सर्वांत मोठे सौंदर्य हेच आहे की, इथे प्रत्येक सण, व्रत आणि अगदी स्वयंपाकाच्या पद्धतीमागे आयुर्वेदाचे सखोल ‘ऋतुचर्या शास्त्र’ दडलेले आहे.

श्रावण हा केवळ धार्मिक विधींचा महिना नसून, निसर्गाच्या तालावर शरीराचे संतुलन साधणारा आरोग्यदायी महिना आहे. म्हणूनच ‘श्रावण भाजावा’ या तत्त्वाचा अंगीकार करून हलका, सात्त्विक आणि पौष्टिक आहार घेणे हीच खरी प्रकृतीची पूजा ठरेल.

पावसाळ्यातील त्रिदोष आणि जठराग्नचे संतुलन राखण्यासाठी आपल्या पूर्वजांनी एका सोप्या सूत्रात आहाराचे मर्म मांडले आहे-‘आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा.’
त्रिदोष आणि तीन महिन्यांची आहारशैली
पावसाळ्यात निसर्गात होणार्‍या बदलांचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो.
आषाढ तळावा (वातशमन) :
आषाढात जोरदार वार्‍यासह पावसाचे आगमन होते. हवेतील गारवा आणि कोरडेपणामुळे शरीरात वातदोषाचा प्रकोप होतो. या काळात जठराग्नी तुलनेने कार्यरत असतो. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे स्नेहन देण्यासाठी आणि वाढलेला वात शांत करण्यासाठी तळलेले, स्निग्ध पदार्थ (उदा. गरमागरम भजी, वडे, तळणीचे पदार्थ) खाल्ले जातात.
श्रावण भाजावा (अग्निदीपन व लघु आहार) :
श्रावणात सततची रिमझिम, ढगाळ वातावरण आणि सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे जठराग्नी अत्यंत मंदावतो. अशा वेळी तळलेले किंवा जड अन्न पचत नाही. म्हणूनच श्रावणात अन्न भाजून खाण्याची पद्धत आहे. उदा. भाजणीचे थालिपीठ, राजगिरा व ज्वारीच्या लाह्या, भाजलेले पोहे, फुटाणे, भाजलेला मका. भाजलेले अन्न पचनास अत्यंत हलके (लघु) असते, ते कफ-आमाचा नाश करते आणि मंदावलेला अग्नी प्रदीप्त ठेवते.
भाद्रपद उकडावा (पित्तशमन) :
भाद्रपदात पाऊस कमी होऊन ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो, ज्यामुळे हवेत दमट उकाडा वाढतो. यामुळे शरीरात पित्तदोषाचा प्रकोप होतो. पित्त आणि उष्णता शांत ठेवण्यासाठी तेल-तुपाचा वापर कमी करून अन्न वाफवून खाल्ले जाते. उदा. उकडीचे मोदक, पातोळ्या, वाफवलेले मुटके आणि उकडलेल्या भाज्या, उकडलेले अन्न पोटाला शीतलता देते आणि पित्त वाढू देत नाही.
श्रावणात केवळ भक्ती म्हणून नव्हे, तर आरोग्याचे रक्षण करण्यासाठी नियमांचे पालन केले जाते.
आयुर्वेदानुसार ‘लंघनं परम् औषधम’- म्हणजेच उपवास हे सर्वोत्कृष्ट औषध आहे. मंदावलेल्या पचनसंस्थेला विश्रांती मिळावी आणि शरीरातील विषारी घटक (Toxins किंवा ‘आम’) बाहेर पडावेत, हाच श्रावणी सोमवार व इतर उपवासांमागील मुख्य
हेतू आहे.
श्रावणात एकभुक्त राहणे म्हणजे एक वेळेसच जेवणाचा नियम पचनसंस्थेवरील ताण कमी करतो.
श्रावणी सोमवारी शिवाला अर्पण केल्या जाणार्‍या धान्यांमध्ये (तांदूळ, तीळ, मूग, जव) शरीरातील धातूंचे पोषण करण्याचे आणि अग्नी वाढवण्याचे सामर्थ्य असते. (क्रमशः)

Shravan and Ayurveda

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

17 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

17 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

17 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

18 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

18 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

18 hours ago