माझ्या हाताला धरून
चालायला शिकवणारे हात,
आज काठीला टेकून थरथरत चालतात
मी मोठा झालो म्हणे,
पण खरं तर त्यांच्या
आयुष्याला मीच लहान केलं…
घर मोठं झालं, खोल्या वाढल्या, सुविधा वाढल्या पण आई-वडिलांसाठी जागा मात्र कमी होत गेली. एकेकाळी ज्या घरात बाबा उंबरठा ओलांडताच मुलं धावत यायची, आईच्या ओंजळीतलं जेवण खाण्यासाठी सगळे भांडायचे, त्या घरात आज टीव्हीचा आवाज आहे, मोबाइलची रिंग आहे पण आई म्हणत हाक मारणारा आवाज नाही. बाबांनी आयुष्यभर पगाराच्या लिफाफ्यात स्वतःची स्वप्नं बंद करून ठेवली. मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, घरासाठी त्यांनी स्वतःच्या हौशींना कधीच जागा दिली नाही. आईने तिचं तारुण्य स्वयंपाकघराच्या धुरात विरघळवलं. मुलं आजारी पडली की रात्रभर जागी राहिली, पण स्वतः तापातही उठून डबा बनवला. त्यांना वाटायचं मुलं मोठी झाली की आपल्याला विश्रांती मिळेल. आता ते आपल्याला सांभाळतील. पण मुलं मोठी झाली आणि अंतरही. आता त्याच घरात आई-बाबांसाठी वेगळी खोली आहे सोय म्हणून. जेवण त्यांच्या वेळेवर, टीव्ही त्यांच्या चॅनलवर, आयुष्य त्यांच्या कोपर्यात. घरात सगळे एकत्र असतात, पण त्यांच्यासाठी वेळ वेगळा असतो. आई दार उघडल्याचा आवाज ऐकली की हसते. बाळा, चहा घेणार का? उत्तर येतं आई, आधीच घेतलाय मीटिंग आहे. ती पुन्हा कप खाली ठेवते. चहा थंड होतो आणि तिचं मनही. बाबा बोलायला बसतात आज जुन्या मित्राला भेटलो, मुलगा मोबाइलकडून नजर न उचलता म्हणतो हम्म गुड. त्या हम्ममध्ये संवाद संपतो. त्यांच्या दिवसातील सगळ्यात मोठी गोष्ट, मुलाच्या आयुष्यातील सगळ्यात छोटा क्षण ठरते. रात्री दोघेही शांत बसतात. आई हळूच विचारते आपण काही चुकलो का हो? बाबा खिडकीबाहेर पाहत म्हणतात नाही गं आपण खूप काही केलं, कदाचित जास्तच केलं. आईवडिलांचं दु:ख रडण्यात नसतं ते अपेक्षा सोडून देण्यात असतं.
एक दिवस मुलं सगळ्या जबाबदार्यांमध्ये व्यस्त असतात. आणि अचानक फोन येतो, बाबांची तब्येत बिघडली आहे लवकर या. ते धावत पोहोचतात पण यावेळी बाबा काही बोलत नाहीत. पहिल्यांदाच ते शांत असतात. त्यांच्या उशाजवळ चष्मा, औषधं आणि एक कागद असतो. थरथरत्या अक्षरात लिहिलेलं आम्हाला काही नको होतं बाळा फक्त तू बसून दोन शब्द बोलावंसं इतकंच हवं होतं. तेव्हा लक्षात येतं घर आपण दिलं, सुविधा आपण दिल्या पण वेळ कधीच दिला नाही. आणि मग आयुष्यभरासाठी उरतो तोच प्रश्न आपण आईबाबांना वृद्धाश्रमात पाठवलं की स्वतःच त्यांच्या आयुष्यातून बाहेर पडलो? शेवटी त्यांनी आयुष्य घालवलं आपल्याला उभं करण्यात, आपण वेळ घालवला कारणं सांगण्यात. घर आजही तसंच आहे, फक्त ‘आई’ म्हणताच उत्तर देणारं कोणी उरलेलं नाही. जिवंत असताना जवळ बसा, कारण त्यांच्या फोटोसमोर रडताना ते डोळे पुसायला ते स्वतः येणार नाहीत.
Sit close while you are alive…
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik