पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्था आधीच दबावाखाली आहे. त्यात आता हवामान बदलाची भर पडत आहे. यंदा एल निनो सक्रिय होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभाग (सरकारी) आणि स्कायमेट (खासगी) या दोन हवामान संस्थांनी यापूर्वीच दिला होता. आता सुपर एल निनो सक्रिय होण्याचा इशारा अमेरिकेची हवामान संस्था नॅशनल ओशेनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने (नोआ) दिला आहे. भारतात उष्णतेची तीव्र लाट असताना अंदमानमध्ये नैर्ऋत्य पावसाचे म्हणजे मान्सूनचे आगमन झाल्याची सुवार्ता आली आहे. 26 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, सुपर एल निनो सक्रिय होण्याचा इशारा चिंतेत भर घालणारा आहे. नोआच्या ताज्या माहितीनुसार, सुपर एल निनो मे ते जुलै या कालावधीतच सक्रिय होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागराचे तापमान यंदा मे महिन्यात सामान्यापेक्षा 0.5 अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले गेले असून, ही उष्णतेची स्थिती संपूर्ण मान्सून हंगामात कायम राहू शकते. गेल्या महिन्यात एल निनो सक्रिय होण्याची शक्यता 61 टक्के वर्तवली गेली होती, ती आता वाढून 82 टक्के झाली आहे. याचा थेट परिणाम मान्सूनवर होणार असून, देशात दुष्काळाचा धोका वाढणार आहे, असे भारतीय हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय मोहपात्रा यांनी म्हटले आहे. नोआच्या अहवालानुसार, मे ते जुलैदरम्यान सुपर एल निनो विकसित होण्याची शक्यता 82 टक्के असून, हा प्रभाव डिसेंबर 2026 ते
फेब्रुवारी 2027 म्हणजेच हिवाळ्यापर्यंत कायम राहण्याची 96 टक्के शक्यता आहे. तसेच हा एल निनो तीव्र किंवा अति तीव्र राहण्याची शक्यता 67 टक्के आहे. यामुळे भारतात भीषण उष्णतेची लाट आणि कमकुवत मान्सूनचे सावट अधिक गडद झाले आहे. याच्या प्रभावामुळे भारत आणि दक्षिण-पूर्व आशियात पाऊस कमी होईल, तर इंडोनेशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलियात ओलावा संपून जंगलांना आग लागण्याचा धोका वाढेल, असा अंदाज आहे. या अंदाजाचा सर्वाधिक फटका उत्तर, पश्चिम आणि मध्य भारताला बसण्याची शक्यता असून, येथील शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते. मध्य आणि पश्चिम भारतातील चांगल्या पावसाच्या क्षेत्रांमध्येही यंदा सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल. दुसरीकडे, लडाख, राजस्थानचा काही भाग, तेलंगणा आणि उत्तर भारताच्या काही मर्यादित भागांवर मात्र याचा प्रभाव कमी जाणवेल. अंदमान परिसरात मान्सूनची आगेकूच सुरू असतानाच महाराष्ट्रात उष्णतेचा कहर वाढला आहे. यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत एल निनोचा सर्वाधिक परिणाम जाणवण्याची शक्यता असून, पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावर्षी देशात सरासरीच्या 92 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे प्रमाण सामान्यपेक्षा कमी या वर्गवारीतील आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात एल निनोची परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची भीती असते. पाऊस कमी झाला, तर पुढे अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई वाढेल. दुसरीकडे, कृषीवर आधारित उद्योगांना कच्चा माल कमी प्रमाणात उपलब्ध होईल. या सर्वांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडेल. युद्धाने परिस्थिती बिकट झाली आहे. त्यातच युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत. अशा परिस्थितीत पाऊस कमी झाला, तर पुढच्या वर्षी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण होईल. एकूणच परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारांनी आतापासूनच संभाव्य उपाययोजनांचा विचार करणे आवश्यक आहे. जून महिन्यात साधारण सरासरीइतकाच किंवा थोडा जास्त पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. जुलै महिन्यात सरासरीइतका किंवा त्याहूनही कमी पावसाची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी (60 टक्के) असेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये सरासरीहून कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यंदा पावसाची सुरुवात अनुकूल होणार असली, तरीही त्यानंतर पाऊस अनियमित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान विभागाचा अंदाज यापेक्षा वेगळा नाही. अमेरिकन संस्थेने दिलेला अंदाज अधिक चिंताजनक आहे. भारतीय हवामान विभागाचा आणखी एक अंदाज या महिन्याच्या शेवटी येणार आहे. तोपर्यंत एल निनो स्थिती बदलली किंवा काही बदल झाले, तर सकारात्मक अंदाज वर्तविला जाऊ शकतो. पण सुपर एल निनोने संकटाचा इशारा दिला आहे. जेव्हा मध्य आणि पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढते, त्या अत्यंत तीव्र हवामान स्थितीला सुपर एल निनो म्हणतात. हा सामान्य एल निनोपेक्षा एक अत्यंत तीव्र आणि शक्तिशाली प्रकार आहे. सामान्यतः जेव्हा हे तापमान फक्त 0.5 अंश सेल्सिअसने वाढते तेव्हा नेहमीचा एल निनो सुरू होतो; परंतु तापमान 2 अंश सेल्सिअसची मर्यादा ओलांडल्यास त्याला सुपर एल निनो म्हणून ओळखले जाते. सुपर एल निनोमुळे तापमानात प्रचंड वाढ होते. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा किमान 2 अंश सेल्सिअसने वाढल्यामुळे ही स्थिती निर्माण होते. ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे. 1950 पासून आतापर्यंत जागतिक स्तरावर चार ते पाच वेळाच सुपर एल निनोची नोंद झाली आहे. यापूर्वी 1982-83, 1997-98 आणि 2015-16 मध्ये सुपर एल निनो स्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे जगभरात मोठे नुकसान झाले होते. सुपर एल निनो केवळ समुद्रापुरता मर्यादित न राहता संपूर्ण पृथ्वीच्या हवामान चक्रात प्रचंड उलथापालथ घडवून आणतो. याच्या प्रभावामुळे जगातील काही देशांमध्ये भीषण दुष्काळ पडतो, तर काही ठिकाणी अतिवृष्टी आणि विनाशकारी पूर येतो. जागतिक तापमानात कमालीची वाढ होऊन अनेक देशांना उष्णतेच्या प्रचंड लाटांचा सामना करावा लागतो. यामुळे ब्राझिलच्या अॅमेझॉनच्या जंगलात दुष्काळ, इंडोनेशियात वणवे आणि प्रशांत महासागरात शक्तिशाली चक्रीवादळांची मालिका सुरू होऊ शकते. भारताच्या दृष्टीने सुपर एल निनो ही अत्यंत चिंताजनक बाब मानली जाते. सुपर एल निनो प्रशांत महासागराकडून भारताकडे वाहणारे मान्सूनचे वारे कमकुवत करतो. यामुळे देशात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडतो. उत्तर, मध्य आणि पूर्व भारतासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उन्हाळा अत्यंत तीव्र होतो आणि दीर्घकाळ उष्णतेच्या लाटा जाणवतात. भारताची 60 ते 70 टक्के शेती मान्सूनवर अवलंबून असल्याने पाऊस कमी झाल्यास खरीप पिकांचे मोठे नुकसान होते. अन्नधान्याचे उत्पादन घटल्यामुळे बाजारात महागाई वाढण्याचा धोका निर्माण होतो. मान्सून कमकुवत राहिल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने खालावतो आणि देशात पिण्याच्या व वापराच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होऊ शकते. एकूणच अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असतो.
Super El Nino
ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…
नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…
माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…
गेल्या आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नाला गेलो होतो. खरेतर लग्न कसले, फक्त वैताग. जावे लागते म्हणून लोक…
सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा ज्येष्ठ नागरिकाचा आरोप मनमाड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या…