सिन्नर-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर सुरू झालेली चर्चा थांबलेली नाही. अशोक खरात आता ईडीच्या रडारवर आला असून, त्याचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर खरातचा खरा चेहरा उघडा पडला आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. खरातनंतर राज्यात अनेक भोंदूबाबांचे कारनामे उघडकीस आले, ते केवळ पीडितांनी धैर्याने केलेल्या तक्रारींमुळेच. नाशिकमधील सातपूर येथील तथाकथित पत्रकार रवींद्र एरंडे उघडा पडला, तो महिलांनी केलेल्या तक्रारींमुळेच. तक्रारी येताच पोलिसांनी राज्यात अनेक ठिकाणी भोंदूबाबांवर कारवाई केली असली, तरी पोलिसांनी संशयावरून
स्वतःहून तपास करून किंवा गस्त घालून एकाही भोंदूला पकडलेले नाही. पोलिसांचे आपल्याकडे लक्ष नाही याचा अंदाज बांधूनच भोंदूबाबांची काळी कृत्ये सर्रास सुरू असतात. खरातचे प्रकरण पुढे आल्यापासून दोन महिन्यांत राज्यभर सुमारे 35 भोंदूबाबांवर कारवाई करून पोलिसांनी त्यांना गजाआड केले. महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी किंवा जादूटोणाविरोधी कायदा असतानाही भोंदूबाबांना कशाचीच भीती वाटत नाही. भोंदूबाबा कुठे ना कुठे असतातच. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा परिसरातील स्वयंघोषित भोंदूबाबा मनोहर भोसले याने 17 एकर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून स्वतःचा आश्रम उभा केला. फसवणूक आणि जमीन बळकावल्याप्रकरणी त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली. जळगावात एका भोंदूबाबाने घरातील वाद मिटवणे, करणी बाधा दूर करणे आणि गुप्तधन मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेची सुमारे 12 लाखांंची फसवणूक केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीरामपूर, संगमनेर आणि अहिल्यानगर शहरासह अनेक ठिकाणी भोंदूबाबांनी लोकांची फसवणूक केल्याचे उघड झाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाने सांगली जिल्ह्यात भोंदूबाबांविरोधात पुरावे गोळा करून पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. जिकडेतिकडे भोंदूबाबांच्या अशा कहाण्या ऐकायला मिळत आहेत. धुळे जिल्ह्यातून अशीच एक बातमी आली ती, शनि अमावस्येच्या पूजेची. धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील जैताणे गावात योगेश (भय्या) बापू खैरनार (वय 33) याने शनि अमावस्येचा काळा मुहूर्त साधून आपल्या आश्रमात आलेल्या मित्रमैत्रिणीचा खून केला. कौटुंबिक वाद आणि नोकरीच्या समस्यांमुळे त्रस्त झालेली जयश्री रजनीकांत काकुस्ते (रा. कासारे, ता. साक्री) ही महिला एका खासगी फायनान्स कंपनीत काम करत होती. ती आपला मित्र अक्षय गंगाधर सोनवणे याच्यासह 16 मे रोजी खैरनारच्या आश्रमात आली होती. त्याच दिवशी असलेली शनि अमावस्या दोघांसाठी काळरात्र ठरली. अक्षय हा स्थानिक ग्रामपंचायतीत शिपाई होता. तो वडिलोपार्जित केबलचा व्यवसायही सांभाळत होता. महिलेवर विधी पूर्ण झाल्यानंतर तिला दुचाकीवरून घरी सोडण्यासाठी खैरनार निघाला, तेव्हा जंगलात त्याने अमावस्येच्या रात्री तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. तिने विरोध करून आरडाओरडा केला, तेव्हा खैरनारने कपड्याने तिचा गळा दाबून खून केला. तिचा मृतदेह रायपूर-भादगाव रस्त्याशेजारी दगडांआड लपवला. हा खून नसून अपघात वाटावा, यासाठी त्याने मृतदेहावर एक बेवारस दुचाकी ठेवली. आश्रमात परतल्यावर आपला गुन्हा लपवण्यासाठी लोखंडी रॉडने मारून त्याने अक्षयचाही खून केला. त्याचा मृतदेह बैलगाडीतून नेऊन दोन टेकड्यांमधील जंगलात फेकून दिला. निजामपूर परिसरातील रायपूर-भडगाव रस्त्यावरील टेंबे फाट्याजवळ एका शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला, तेव्हा या प्रकरणाला वाचा फुटली. महिलेचे तोंड रुमालाने बांधलेले होते. जवळ सापडलेल्या मोबाइलवरून ती जयश्री काकुस्ते असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना एक केसरी रंगाचा रुमाल आढळला. याच रुमालाचा वास श्वानपथकाला दिला असता, पथकाने थेट खैरनारच्या आश्रमाचा माग काढला. पोलिसांनी खैरनारला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. सुरुवातीला त्याने थापा मारत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कठोर चौकशीअंति त्याने गुन्ह्याची संपूर्ण कबुली दिली. अक्षयचा मृतदेह आश्रमाजवळील उंबरांडी शिवारात पुरल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी तातडीने तेथून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह वाहून नेण्यासाठी बैलगाडी वापरल्याचे जमिनीवर उमटलेल्या चाकांच्या खुणांवरून स्पष्ट झाले. निजामपूर पोलिसांनी भोंदू योगेश बापू खैरनार याला अटक केली. भोंदूबाबांचे ढोंग आणि तथाकथित चमत्कारांचे सत्य वेळोवेळी समोर येऊनही लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात, यामागे माणसांची मानसिक हतबलता असते. आजारपण, आर्थिक संकट किंवा कौटुंबिक कलहाने माणूस जेव्हा खचतो, तेव्हा त्याची तर्कशक्ती मागे पडते. अशा हतबल माणसाला चमत्काराची आशा दाखवून भोंदूबाबा गैरफायदा उठवतात. जैताणेतील खैरनारला पैसे कमवायचे असतीलच, पण त्याची नियत फिरल्याने त्याने रात्री महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. तो फसल्यानंतर प्रकरण दाबण्यासाठी त्याने महिलेचा आणि नंतर तिच्या मित्राचाही खून केला. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन बाबाबुवांच्या तथाकथित चमत्कारावर विश्वास ठेवणार्या सुशिक्षित आणि अशिक्षित अशा सर्वांनीच या घटनेतून बोध घेतला पाहिजे. खरातनंतर अनेक भोंदूबाबांचे मुखवटे गळून पडले, तरी लोकांची मानसिकता बदलत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समित्यांनी कितीही प्रबोधन केले, जनजागृती केली, तरी काही लोक चोरून-लपून बाबाबुवांकडे जातातच. पोलिसांनी मात्र यावर अधिक दक्षता घेतली पाहिजे. अवैध धंदे आणि जुगारअड्डे जसे लपूनछपून चालतात, तसेच भोंदूबाबांचे धंदेही चालतात. अवैध धंदे आणि जुगारअड्ड्यांवर पोलिस जसे स्वतःहून छापे घालतात, तशाच प्रकारे भोंदूबाबांच्या अड्ड्यांवरही छापे घातले पाहिजेत. जैताणेचा खैरनार पोलिसांचा डोळा चुकवून धंदा करत राहिला आणि त्याची परिणती दोन मित्र-मैत्रिणीच्या खुनात झाली. कोठेही एखादा संशयास्पद बाबा दिसला, तर पोलिसांनी चौकशी केली पाहिजेच. इतकेच नव्हे, तर लोकांनीही पोलिसांना खबर दिली पाहिजे. कितीतरी भोंदूबाबांचे कारनामे उघडकीस आले असून, लोकांनी शहाणे झाले पाहिजे.
The night of Saturn’s new moon
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…