नाशिक

सियावर रामचंद्र की जय!

रथावर राजकीय नेतेमंडळींची मांदियाळी.
मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या.
रथावर भाविकांकडून पुष्पवृष्टी.

श्रीराम व गरुड रथोत्सव उत्साहात

गरुड रथाचे मार्गक्रमण
श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा, नाग चौक, हत्तीपूल, जुना आडगाव नाका, गणेशवाडी, रोकडोबा मारुती, नेहरू चौक, वंदे मातरम् चौक, मेनरोड, बोहरपट्टी, सराफ बाजार, कापड बाजार, बालाजी कोट, कपूरथळा मैदान, गाडगे महाराज पूल, रामसेतु, सरदार चौक, अहिल्याराम व्यायामशाळा, रामकुंड, अवभृतस्नान, पूजा. विश्रांतीनंतर कपालेश्वर, मालवीय चौक, शनी चौक, कार्तिक स्वामी मंदिर, श्री काळाराम मंदिर उत्तर दरवाजा, असे होते.

मिरवणूक मार्गावर चोख बंदोबस्त
मिरवणूक मार्गावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ- 1 मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, उमेश पाटील, विश्वास पाटील, अशोक शेरमाळे, सुनील पवार, वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी, होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पंचवटी : प्रतिनिधी
नाशिकचे ग्रामदैवत प्रभू श्रीराम व गरुड रथाला सुमारे 250 वर्षांची जुनी परंपरा आहे. पारंपरिक श्रीराम रथयात्रेने रविवारी (दि. 29) नाशिककरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ’सियावर रामचंद्र की जय’, ’पवनसुत हनुमान की जय’, ’जय सीता…राम-सीता’ असा जयघोष करीत शेकडो वर्षांची परंपरा असलेली श्रीराम व गरुड रथ मिरवणूक रात्री उशिरापर्यंत रंगली.
चैत्र कामदा एकादशीला येणारा नाशिकचा ग्रामोत्सव म्हणजे श्रीराम व गरुड रथोत्सव. तो नाशिककरांसाठी मोठ्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा भाग आहे. यंदाचे उत्सवाचे मानकरी असलेल्या नरेंद्रबुवा पुजारी यांना
सफेद फेटा बांधण्यात आला. परंपरेनुसार असणारे मानकरी रवींद्र दीक्षित यांच्या वाड्यात जाऊन परंपरेनुसार त्यांना निमंत्रण देण्यात आले. मानकरी नरेंद्रबुवा पुजारी यांना तेथे पारंपरिक गंधलेपन व पूजन केले. त्यानंतर काळाराम मंदिराच्या आवारात श्री काळाराम संस्थानच्या अध्यक्ष न्या. रेखा पांढरे, विश्वस्त राघवेंद्र पुजारी, प्रतीक पुजारी, शुभम मंत्री, शांताराम अवसरे, अ‍ॅड. अक्षय कलंत्री, मिलिंद तारे, कौशिक कोठिया, अमित कोठावदे यांच्या उपस्थितीत श्रीराम पंचायतनाची महापूजा करण्यात आली. पूजा झाल्यानंतर नारळ फोडून आरती झाली. हनुमान मूर्ती मंदिराबाहेर काढण्यात आली. श्रीराम मूर्ती, चांदीच्या पादुका हातात घेऊन मानकरी नरेंद्रबुवा पुजारी यांनी मंदिराला प्रदक्षिणा घालून मूर्ती चांदीच्या पालखीत ठेवली. नंतर कहार मंडळींनी परंपरेनुसार पालखी पूर्व दरवाजाने गरुड रथापर्यंत आणली. त्या ठिकाणी पालखी येताच उपस्थित भाविकांनी श्रीरामाचा जयघोष केला. महाआरती करून मूर्ती श्रीराम रथात ठेवण्यात आल्या.
यावेळी श्रीराम रथ आणि गरुड रथ दोन्ही समांतर उभे केले. त्या ठिकाणी आरती करण्यात आली. आरतीनंतर गरुड रथ सायंकाळी 6.30 वाजता, तर श्रीराम रथ 6.50 ला निघाला. रथाच्या पुढे सनई-चौघडा, ढोल-ताशांचे पथक होते. मस्तकावर छत्री धारण केलेले यंदाचे मानकरी नरेंद्रबुवा पुजारी रथाकडे तोंड करून उलट्या दिशेने मार्गक्रमण करत पुढे निघाले होते. श्रीराम रथ आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्या घराजवळ गेल्यावर आमदार ढिकले, त्यांचे चिरंजीव आर्यन व शौर्य यांनी पूजा केली. यावेळी प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने अवघा पंचवटी परिसर रामनामात न्हाऊन निघाला. रथावर खा. राजाभाऊ वाजे, स्वामी संविदानंद सरस्वती, महंत भक्तिचरणदास, सुधीरदास महाराज, नगरसेवक कमलेश बोडके, सुरेशअण्णा पाटील, सुनील बागूल, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांसह नाशिककर भाविकांनी रथाचे दर्शन घेण्यासाठी व रथ ओढण्यासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रथासमोर भगवे ध्वज, पताकांसह सनई चौघडा, ढोल-ताशे वाजवून वातावरण भक्तिमय केले जात होते. कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी दोन्ही रथांवरून चंदन पुजारी व नंदकुमार मुठे नागरिकांना सूचना करत होते. यावेळी अनेक नागरिक आपल्या मोबाइलमध्ये सेल्फी, व्हिडिओ आणि फोटो घेताना दिसत होते. श्रीराम रथ जसजसा पुढे सरकत होता तसतशी गर्दीदेखील वाढत होती. रथाचे ठिकठिकाणी पूजन व आरती करण्यात येत होती. फुलांची उधळण केली जात होती. गरुड रथाचे रोकडोबा तालीम येथे आगमन झाल्यावर आरती झाली. त्यानंतर गरुड रथ शहराच्या दिशेने मार्गस्थ झाला. श्रीराम रथ नदी पार करत नसल्याने तो गौरी पटांगणात उभा राहिला. शहराची प्रदक्षिणा करून गरुड रथाचे गौरीपटांगणावर आगमन झाले असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दोन्ही रथांचे आगमन रामकुंड येथे झाल्यावर उत्सवमूर्तींची अमृतपूजा, पंचामृत, अभ्यंगस्नान, अवभृतस्नान आणि महापूजा करण्यात आली. श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी व यात्रेचा आनंद लुटण्यासाठी शहर परिसरातून लहानांसह भाविकांनी विशेषतः महिलांंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दुपारपासूनच पंचवटीतील रस्ते भाविकांनी फुलून गेले होते.
गरुड रथाची परंपरा
श्री काळाराम मंदिरातील प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना बालाजी मंदिर येथील सत्पुरुष तिमय्या महाराज यांच्या हस्ते करावी, असा दृष्टान्त ज्यांनी मंदिर बांधले त्या सावकार ओढेकरांना झाला. त्याप्रमाणे तिमय्या महाराजांंनी देवाज्ञा मनात गर्भगृहात मूर्ती स्थानापन्न केल्या. ते करण्यासाठी त्यांच्या हातात असलेली जपाची माळ व काठी तेथेच ठेवली. आजही ही माळ व काठी प्रभू रामचंद्रांच्या गर्भगृहात आहे. श्रीराम नवमीचा उत्सव झाल्यावर कामदा एकादशीला अवभृत स्नानासाठी श्रीराम मंदिरातून रथाची मिरवणूक निघते. मात्र. नाशिक येथे प्रभू श्रीराम वनवासात होते. त्यामुळे ते नदी ओलांडत नाहीत. म्हणून श्रीराम मंदिरातून दोन रथ निघतात. पुढे गरुड रथ असतो. त्यात मारुतीची मूर्ती असते. हा रथ नदी ओलांडून कापडपेठेतील बालाजी मंदिराची आरती घेण्यासाठी म्हणून गावात येतो. येथे विधिवत देवाची आरती बालाजीवाले कुटुंबीयांतर्फे
केली जाते.

Siyavar Ramachandra Ki Jai!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

19 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

19 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

19 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

19 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

19 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

20 hours ago