नाशिक

वादळाचा कहर; घरे, फळबागा, वीजयंत्रणा, शेतीचे नुकसान

सिन्नरच्या पूर्व भागात घरांची छपरे उडाली, जनावरे दगावली; अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्याच्या पूर्व भागात शनिवारी (दि. 6) सायंकाळी आलेल्या वादळी पाऊस आणि जोरदार वार्‍याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक गावांमध्ये घरांची छपरे उडाली, झाडे उन्मळून पडली, वीजवाहिन्या तुटल्या तसेच शेतकर्‍यांच्या फळबागा, कांदा चाळी, पोल्ट्री शेड आणि शेतीपिकांचे नुकसान झाले. अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला असून, महसूल विभागाने पंचनाम्यांचे काम सुरू केले आहे.

महसूल विभागाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार शहा, उजनी, एकलहरे, देवपूर, निमगाव देवपूर, धारणगाव, पांगरी बुद्रुक, मिठसागरे, पिंपळगाव, फर्दापूर आणि किर्तांगळी या गावांमध्ये विविध प्रकारच्या नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. बहुतांश ठिकाणी जीवितहानी टळली असली तरी एका गायीचा मृत्यू झाला असून, एका मुलीला दुखापत झाली आहे.
शहा येथील बाळासाहेब सूर्यभान वाकचौरे, विजय सूर्यभान वाकचौरे आणि अर्जुन राणोबा सोनवणे यांच्या घरांचे नुकसान झाले. उजनी येथील चांगदेव पुंजाहरी साबळे आणि एकलहरे येथील दगू मुरलीधर घुले यांच्या घरांनाही वादळाचा फटका बसला. किर्तांगळी येथील रंगनाथ खंडू चव्हाणके यांच्या घराचेही नुकसान झाले आहे.
निमगाव देवपूर येथे सुभाष कचरू शेलार यांची गाय अंगावर वीज पडल्याने दगावली. देवपूर येथील विठ्ठल प्रभू गडाख व सागर किसन नरोडे यांचे पत्र्याचे शेड उडून गेले. धारणगाव येथे विजय तुकाराम शिरोळे यांच्या ट्रॅक्टरवर झाड कोसळल्याने नुकसान झाले.
पांगरी बुद्रुक येथील माणिक रामचंद्र पांगारकर यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडून गेले, तर मिठसागरे येथील संदीप चांगदेव कासार यांच्या कांदा चाळीचे लाकडी छत उडाले. फर्दापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर विठोबा रानडे यांच्या शेवगा पिकाचे नुकसान झाले आहे. पिंपळगाव येथील गोरक्षनाथ दादा डुंबरे यांच्या घराचे नुकसान झाले असून, त्यांची 11 वर्षीय मुलगी प्रांजल डुंबरे जखमी झाली आहे.

महावितरणचे कोट्यवधींचे नुकसान

वादळामुळे महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेलाही मोठा फटका बसला आहे. देवपूर सेक्शनमधील 33 केव्ही लाइनचा एक पोल कोसळला असून, विविध फीडरवरील अनेक 11 केव्ही पोल पडले आहेत. लघुदाब वाहिनीचे 22 पोल, उच्चदाब वाहिनीचे 13 ठिकाणचे कंडक्टर आणि लघुदाब वाहिनीचे 32 ठिकाणचे कंडक्टर तुटले आहेत. वडांगळी, पाथरे, रामपूर, भरतपूर-राहणे आणि मलढोण परिसरातील शेकडो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

मदतीची अपेक्षा; पंचनामे सुरू

वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. महसूल विभागाची पथके नुकसानग्रस्त गावांमध्ये दाखल झाली असून, पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी सांगितले की, सर्व नुकसानीची माहिती संकलित केली जात असून, प्राथमिक अहवालांच्या आधारे मदत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

फळबागांना मोठा फटका

उजनी येथील प्रगतिशील शेतकरी राम सुरसे यांच्या मिलीया डुबिया बागेतील शेकडो वृक्ष वादळी वार्‍याने उन्मळून पडले. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच पिंपळगाव येथील संतोष रामचंद्र शिरोळे यांच्या द्राक्षबागेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Storm havoc; damage to houses, orchards, power systems, agriculture

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

6 hours ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

6 hours ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

6 hours ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

6 hours ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

6 hours ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

7 hours ago