संपादकीय

नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार…

– प्रशांत पोतदार
‘नारायणाच्या पोटात
सुमेरसिंगाची तलवार,
’काका, मला वाचवा!’
असा झाला आक्रोश फार.’
इतिहासात काही घटना अशा असतात की त्या काळाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक पिढीला प्रश्न विचारत राहतात. इतिहासातील या ओळी केवळ एका ऐतिहासिक हत्येची कथा सांगत नाहीत, ती माणसाच्या स्वार्थाची, सत्तेच्या हव्यासाची आणि विश्वासघाताची शोकांतिका सांगतात. काळ बदलला, राजवाडे बदलले, माणसे बदलली; पण प्रवृत्ती बदलली का? इतिहासातील ही तलवार आज संग्रहालयात असेलही, पण तिची धार अजूनही समाजाच्या मनात जिवंत आहे. ती धार आता पोलादाची राहिलेली नाही, तर शब्दांची, अफवांची, गटबाजीची आणि विश्वासघाताची झाली आहे. शरीरावर होणार्‍या जखमा भरून निघतात, पण विश्वासावर, मनावर झालेल्या जखमा आयुष्यभर ठसठसत राहतात. इतिहासात एका व्यक्तीच्या पोटात खुपसली गेलेल्या तलवारीने फक्त एका माणसाचा जीव घेतला नाही, तर विश्वास, नातेसंबंध आणि सत्तेच्या लालसेचे भयावह रूपही जगासमोर आणले होते.
आज तलवारींचा काळ संपला आहे, असे आपण म्हणतो. पण खरेच संपला आहे का? तलवारींचे रूप बदलले आहे, एवढेच. आज शब्द तलवारीसारखे वापरले जातात. अफवा हे शस्त्र बनले आहे. चारित्र्यहनन, शाब्दिक वार, आरोप प्रत्यारोप हा हल्ल्याचा नवा मार्ग झाला आहे. समोरून लढण्याऐवजी पाठीमागून वार करण्याची प्रवृत्ती समाजात वाढताना दिसते. तलवारींचे रूप बदलले आहे. पण वार अजूनही होत आहेत. आज कुणाच्या पोटात तलवार खुपसली जात नाही तर त्याच्या चारित्र्यावर वार होतो. त्याच्या प्रामाणिकपणावर वार होतो. त्याच्या आत्मविश्वासावर वार होतो. आणि हे वार अनेकदा शत्रू करत नाहीत तर ते आपल्या माणसांकडूनच होतात. एकेकाळी राजवाड्यांत सत्तेसाठी कट रचले जात होते. आज ते कार्यालयांत, संस्थांत, राजकारणात, उद्योगविश्वात आणि कधी कधी घरातही रचले जातात. गुणवंत व्यक्ती पुढे येऊ लागली की तिच्या पायात अडथळे टाकले जातात. तिच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे केले जाते. आज कित्तेक कार्यालयात, संस्थेत, समाजात किंवा अगदी कुटुंबातही एक अदृश्य रणांगण तयार होताना दिसते. समोरून हल्ला करण्याचे धैर्य कमी झाले आहे पण पाठीमागून वार करण्याचे कौशल्य वाढले आहे. एखादा सक्षम माणूस पुढे येऊ लागला की त्याला थांबवण्यासाठी अफवा पसरवल्या जातात, गैरसमज निर्माण केले जातात, त्याच्या विषयी संशय निर्माण केला जातो. कारण अनेकांना स्वतः मोठे होण्यापेक्षा दुसर्‍याला लहान करण्यामध्ये अधिक समाधान वाटते. सत्तेची, अधिकाराची लालसा ही फक्त विशिष्ठ क्षेत्रापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. आज ती खुर्च्यांमध्ये, पदांमध्ये, प्रतिष्ठेत आणि अहंकारात शिरली आहे. म्हणूनच अनेक ठिकाणी गुणवत्ता हरते आणि लबाडी जिंकते. प्रामाणिक माणूस एकटा पडतो आणि संधीसाधूंचा आवाज मोठा होतो. सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे आजचा ‘नारायण’ कोण आहे, हे त्यालाही कळत नाही. तो आपल्या माणसांवर विश्वास ठेवतो. पण त्याच विश्वासाचा वापर त्याच्याविरुद्ध केला जातो. आणि ‘सुमेरसिंग’ कोण आहे, हेही चेहर्‍यावरून ओळखता येत नाही. कारण आज तो तलवार घेऊन येत नाही तर तो हसतमुखाने, खांद्यावर हात ठेवून, मैत्रीच्या नावाखाली जवळ येतो.
आजचा ‘नारायण’ प्रत्येक प्रामाणिक कर्मचारी असू शकतो, निष्ठावान सहकारी असू शकतो किंवा प्रत्येक सचोटीने काम करणारा अधिकारी असू शकतो, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारा कोणताही माणूस असू शकतो. आणि ‘सुमेरसिंग’ ही एखादी व्यक्ती नसून एक प्रवृत्ती आहे, मत्सराची, हिणतेची, स्वार्थाची, गटबाजीची आणि विश्वासघाताची. इतिहासातील नारायणाला तरी शत्रू कोण होता हे माहीत होते. पण आजचा ‘नारायण’ अनेकदा भयग्रस्त, अज्ञात आणि गोंधळलेला असतो. कारण त्याच्यावर वार करणारा माणूस त्याचाच सहकारी, मित्र किंवा विश्वासातील व्यक्ती असू शकते. चेहर्‍यावर हसू आणि मनात मत्सर घेऊन वावरणार्‍या लोकांची संख्या वाढत चालली आहे. म्हणूनच आजचा विश्वासघात अधिक वेदनादायक ठरतो. आपण सतत इतिहासातील विश्वासघाताचा निषेध करतो, पण स्वतःच्या वर्तनात नकळत त्याच चुका करत नाही ना ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. कारण प्रत्येक काळात नारायण जन्माला येतो, पण प्रत्येक काळात सुमेरसिंगही जन्माला येत असतो. फरक एवढाच की आज तलवारी दिसत नाहीत. जखमा मात्र खोल होतात.
समाजाचा खरा विकास रस्ते, इमारती किंवा तंत्रज्ञानामुळे होत नाही, तो परस्पर विश्वासामुळे होतो. ज्या समाजात प्रामाणिक माणूस सुरक्षित वाटतो, मतभेद असूनही संवाद टिकून राहतो आणि गुणवत्तेला न्याय मिळतो, तोच समाज खर्‍या अर्थाने प्रगती करतो. इतिहास आपल्याला केवळ घटना सांगत नाही, तो आपल्याला इशाराही देतो. ‘नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार…’ ही ओळ आजही आपल्याला सावध करते की, माणसाला संपवणारी सर्वात घातक तलवार लोखंडाची नसते तर ती विश्वासघाताची असते. आणि अशी तलवार पुन्हा उगारली जाणार नाही, याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. कारण समाजाचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो अनेकदा आपल्या मनातल्या स्वार्थात, मत्सरात आणि सत्तेच्या मोहात लपलेला असतो. इतिहास बदलता येत नाही. पण भविष्य नक्की बदलता येते. त्यासाठी तलवारी नव्हे, तर विश्वास जपणारे हात हवेत.
इतिहास आपल्याला केवळ भूतकाळ सांगत नाही; तो भविष्याची सावधगिरीही शिकवतो. जर या प्रवृत्तीला वेळीच आवर घातला नाही, तर उद्या समाजाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यातून नवे ‘सुमेरसिंग’ जन्माला येतील आणि प्रत्येक युगात एखादा निरपराध ‘नारायण’ मदतीसाठी आक्रोश करत राहील किंबहुना मारला जाईल. म्हणून आज गरज नवीन ‘नारायण’ शोधण्याची नाही, तर आपल्या मनातील ‘सुमेरसिंग’ प्रवृत्ती ओळखून तिचा पराभव करण्याची आहे. कारण समाजाचा खरा विजय एका व्यक्तीच्या पराभवात नसतो, तो विश्वास, प्रामाणिकपणा आणि माणुसकीच्या विजयात असतो. जर या प्रवृत्तीला वेळीच आवर घातला नाही, तर समाजाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यातून नवे सुमेरसिंग जन्माला येतील आणि प्रत्येक काळात एखादा निरपराध नारायण आक्रोश करत राहील – ’काका, मला वाचवा!’ मग प्रश्न इतिहासाचा राहणार नाही, तो आपल्या समाजाच्या भवितव्याचा असेल.

Sumer Singh’s sword in Narayana’s stomach…

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोबाईलमुळे भविष्य संकटात

- अशोक थोरात देशात अनेक संकटे आहेत पुर्वी बाहेरगावी निरोप कसा द्यावा खुप अडचणी येत…

12 minutes ago

नाठाळांच्या माथी हाणा काठी!

- देवयानी सोनार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार…

22 minutes ago

ऐतिहासिक स्थळांवर कायमस्वरूपी पर्यटकांचा ओघ वाढावा

- मुकुंद बाविस्कर नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक…

28 minutes ago

खड्ड्यांचे पाप कोणाचे?

- गोरख काळे नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा सुखावला असून, जायकवाडीतील पाणीपातळी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली…

36 minutes ago

ऊर्जेची बचत, यशाची गुरुकिल्ली!

- जगन घाणेकर  वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे यश! आजच्या तरुण पिढीला आयुष्यात…

54 minutes ago

फ्रेंड्स

नीट पेपरफुटीवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर, व्हिडिओद्वारे संवाद साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी जेन-झेड…

1 hour ago