– मुकुंद बाविस्कर
नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक भाविक आणि पर्यटक येण्याची शक्यता आहे. या निमित्ताने केवळ धार्मिक केंद्रांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण नाशिक जिल्ह्याला एक जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना करता येईल.
कुंभमेळ्याच्या काळात येणार्या भाविकांना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहराबाहेरील इतर पर्यटन स्थळांकडे आकर्षित करण्यासाठी विविध पर्यटन सर्किट्स तयार करण्यात यायला हवे. रामकुंड, पंचवटी, त्र्यंबकेश्वर यांच्यासोबतच इगतपुरीतील कावनई (कपिलमुनी तपोभूमी), सर्वतीर्थ टाकेद (जटायू मंदिर) आणि चक्रतीर्थ या ऐतिहासिक स्थळांचा विकास करणे आवश्यक आहे. कारण सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून नाशिक जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला पुढील अनेक दशकांसाठी नवी दिशा देणारा महाउत्सव आहे. दीर्घकालीन नियोजनामुळे कुंभमेळ्यानंतरही नाशिक हे बारमाही पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येऊ शकते. मात्र त्या दृष्टिने प्रयत्न करण्याची गरज आहे.
हा विचार आताच मांडण्याची कारण म्हणजे, याच आठवड्यात जिल्ह्यातील ज्येष्ट मंत्री छगन भुजबळ यांनी इगतपुरी तालुक्यातील कावनाई येथे एका कार्यक्रमात विकास कामांचा उल्लेख केला. यापूर्वीही मंत्री भुजबळ यांनी इगतपुरी हे शहर आणि महाबळेश्वर – पाचगणी किंवा लोणावळा- खंडाळा- माथेरान प्रमाणे हिल स्टेशन होऊ शकते ,असे म्हटले होते. त्याचप्रमाणे इगतपुरी तालुक्यात फिल्म सिटी तथा चित्रपट नगरी उभारण्याचाही अनेकदा घोषणा झाल्या. परंतु हे काम अद्यापही रखडलेले आहे. वास्तविक पाहता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संधीचा फायदा घेऊन नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी कायमस्वरूपी पर्यटन केंद्रांचा धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या कायमस्वरूपी पर्यटन केंद्र म्हणून अत्याधुनिक पद्धतीने विकास झाल्यास केवळ देशातीलच नव्हे तर प्रदेशातील पर्यटकांचाही देखील मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो , मात्र त्यासाठी सरकार प्रशासन शासन प्रशासन यांची इच्छाशक्ती हवी आहे, असे पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान म्हणून ओळखल्या जाणार्या इगतपुरी तालुक्यातील पवित्र कपिलधारा (कावनई) तीर्थक्षेत्रावर गंगापूजन, भूमिपूजन व वृक्षारोपण सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कावनई परिसरासाठी 46 कोटी आणि टाकेद परिसरासाठी 47 कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सुमारे 28 हजार कोटी रुपयांची विकासकामे होणार आहेत. कुंभमेळ्याची कामे उच्च दर्जाची आणि पारदर्शक झाली पाहिजेत. जगद्गुरू कल्कीमहाराज आयोजित या कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांचा आढावा घेतला. परंतु आता ही विकास कामे जलद म्हणून तिने होणे आवश्यक आहे.
हिंदी-मराठी गाण्यांचा
संस्कृतमध्ये आगळा प्रयोग:
झुकझुक आगीनगाडी, मधुमास नवा, रहे ना रहे हम यांसारखी लोकप्रिय हिंदी-मराठी गाणी संस्कृत भाषेत ऐकण्याचा आगळा अनुभव श्रोत्यांना आला. निमित्त होते, संस्कृत भाषा सभेच्या वतीने आयोजित महाकवी कालिदास दिनानिमित्त आयोजित मैफलीचे. कुसुमाग्रज स्मारक येथे हा कार्यक्रम झाला. संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विद्यावाचस्पती पदवीप्राप्त ज्ञानेश्वर कासार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सहस्त्रचंद्रदर्शन वर्षात पदार्पण केल्याबद्दल डॉ. साधना गोखले यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमात गायिका आसावरी खांडेकर यांनी संस्कृतमध्ये भाषांतरित करण्यात आलेल्या मराठी व हिंदीतील लोकप्रिय गीतांचे सुरेल सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
स्वराधीश मुकेश मैफलीत स्वरांजली अर्पण:
भारतीय हिंदी चित्रपटसृष्टील महान पार्श्वगायक मुकेशचंद माथूर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी अजरामर केलेल्या जुन्या लोकप्रिय सुपरहिट गाण्यांची मैफल अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे आयोजित करण्यात आली. महाकवी कालिदास नाट्यगृहात स्वराधीश मुकेश ही विनामूल्य मैफल रंगली. स्वर्गीय मुकेश यांना त्यांच्याच गाजलेल्या गाण्यांमधून स्वरांजली अर्पण करण्यात आली. प्रसिद्ध गायक हरीश ठक्कर, उमेश मालवी यांच्यासह प्रकाश रत्नाकर, अनिल गुरव, सुनील गांगुर्डे, गोविंद चंदे यांनी गाणी सादर केली. त्यांना युगुलगीतात साथ देण्यासाठी गायिका दीपा चंदे, सुरभी गौड-सूर्यवंशी, उर्मिला वंजारी, सुगंधा शेलार, शिल्पा छाजेड, मीनाक्षी भुतडा या सहभागी झाल्या होत्या.
अभंगवाणीने भक्तीमय वातावरण :
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, पंचवटी केंद्राच्या वतीने आषाढी एकादशी महापर्वानिमित्त शौनक आश्रम, पंचवटी येथे अभंगवाणी या भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संतवाङ्मयातील अभंगांच्या सुमधुर सादरीकरणाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. मुंबई येथील पं. गजानन बुवा जोशी यांचे शिष्य असलेले पंडित सतीश जोशी यांनी गणेशस्तवनाने गायनाला प्रारंभ केला. यावेळी त्यांनी अबीर गुलाल…, इंद्रायणी काठी… यांसह पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेले अनेक लोकप्रिय अभंग सादर केले. त्यांच्या ओजस्वी आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.
त्रिवेणी योगावरे गीतरामायण सादर:
लोकप्रिय गायक, संगीतकार बाबुजी सुधीर फडके यांची जयंती, गीतरामायणाला 71 वर्षे पूर्ण झाली आणि आषाढी एकादशी या त्रिवेणी योगावर 71 विद्यार्थ्यांनी गीतरामायणाचे सादरीकरण केले. सरगम म्युझिक अकॅडमीतर्फे संचालक नंदकुमार देशपांडे यांनी विविध वयोगटातील तरुण, ज्येष्ठ विद्यार्थी गायकांकडून गीतरामायण सादर करुन घेतले. पंचवटीत मुठे यांच्या श्री गोरेराम मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाने नव्या उपक्रमाला प्रारंभ झाला. संत भार पंढरीत या गीताने व बाबुजी यांनी गायलेल्या विठ्ठलाच्या गाण्यांनी प्रारंभ करण्यात आला. कानडा राजा पंढरीचा…, विठ्ठला तू वेडा कुंभार…, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा या गाण्यांनी व ग. दि. माडगुळकर यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतरामायणातील निवडक गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.
मोहम्मद रफींना स्वरांजली:
लोकप्रिय गायक मोहम्मद रफी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चिराग दिल का जलाओ, बहोत अंधेरा है… या मैफलीचे आयोजन करण्यात आले. संयोजक नितीनकुमार यांनी स्वागत केले. यावेळी रफींनी गाऊन अजरामर केलेल्या 31 गाण्यांची स्वरांजली रफींच्या स्मृतींना अर्पण करण्यात आली. सुनील कोचर, अविनाश येवलेकर, के.डी.पाटील, देवेंद्र विभुते, सुरेश पुजारी, अरुण आव्हाड, देवेंद्र विभुते, मेहबूब खान, अविनाश येवलेकर, मनोहर देवरे, एस. एस. सोनार, शाम कांबळे, प्रमोद आपटे, कृष्णकुमार वाजपेयी, नितीन केदारे या गायकांनी व मेधा सोनवणे, उमा अग्रवाल, स्वराली चव्हाण, शुभांगी विभुते, अनिता पाटील, प्रभा दवंगे, स्नेहल कुलकर्णी, संगीता वाघ या गायिकांनी सुरेल गाणी सादर केली.
नाशिक कवीच्या काव्य मेळाव्याला प्रतिसाद :
नाशिक कवी आयोजित काव्य मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य देवदत्त बोरसे उपस्थित होते. बाहेर पावसाच्या जोरदार सरी कोसळत असतांना कालिदास कलामंदिराच्या प्रांगणामध्ये भक्तिरसात चिंब भिजलेल्या कवितांचे सादरीकरण एका वेगळ्या विश्वात घेऊन गेले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक कवीचे कार्याध्यक्ष सुभाष सबनीस होते. देवदत्त बोरसे यांनी आपल्या खास शैलीतल्या गझलने कार्यक्रमाची रंगत वाढवलीच परंतु अंतर्मुख करायला लावणार्या गझलने उपस्थित भारावून गेले. यावेळी संजय आहेर, रतन हिरे आणि पोतदार यांच्या तीन उत्कृष्ट कवितांना सन्मानित करण्यात आले.
अवघा विठ्ठल कार्यक्रमातून भक्तिरसाची अनुभूती:
गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड येथे झालेल्या अवघा विठ्ठल या आगळ्यावेगळ्या भक्तिसंगीत कार्यक्रमात सादरकर्ते रागिणी कामतीकर आणि नरेंद्र टांगळे ,करण शिंदे संतवाङ्मयातील अभंग, भारुडे आणि भक्तिगीते शब्दांच्या अर्थगर्भ निवेदनासह सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात सुंदर ते ध्यान या अभंगाने झाली. त्यानंतर टाळ बोले चिपळीला, आम्हा नकळे ज्ञान, विठू माऊली तू , हेचि दान देगा देवा या अभंगांनी सभागृह भक्तिमय झाले.
गुरुपौर्णिमा भक्तिभावाने साजरी:
भोंसला मिलिटरी स्कूल येथे डॉ. मुंजे सभागृहात गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्या समाधी समोर सर्व शिक्षक व रामदंडी विद्यार्थ्यांनी ध्वजपूजन आणि गुरुपूजन करून केली. यानंतर पारंपरिक व्यासपीठ पूजन करण्यात आले. प्रियांशू कुमार यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगताना विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या घडणीत शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रेरणा आणि निस्वार्थ योगदान याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
There should be a sustained increase in the flow of tourists to historical sites.
- प्रशांत पोतदार ‘नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार, ’काका, मला वाचवा!’ असा झाला आक्रोश फार.’ इतिहासात…
- अशोक थोरात देशात अनेक संकटे आहेत पुर्वी बाहेरगावी निरोप कसा द्यावा खुप अडचणी येत…
- देवयानी सोनार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार…
- गोरख काळे नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा सुखावला असून, जायकवाडीतील पाणीपातळी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली…
- जगन घाणेकर वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे यश! आजच्या तरुण पिढीला आयुष्यात…