नीट पेपरफुटीवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर, व्हिडिओद्वारे संवाद साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी जेन-झेड म्हणजे युवा पिढीशी संवाद साधत आहेत. एका व्हिडिओ संदेशात त्यांनी चुकलेल्या विद्यार्थ्यांना माफ करण्याची तयारी दर्शविली. रविवारी (2 ऑगस्ट 2026) फ्रेंडशिप डे असल्याचे औचित्य साधून त्यांनी शनिवारी आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हाय फ्रेंड्स, आज तो मन करता है बस आपसे ही बातें करूं…हे त्यांचे मैत्री दिनानिमित्त पहिले वाक्य. आपल्या व्हिडिओ संदेशांनी युवा पिढी प्रभावित झाल्याचे पंतप्रधानांना वाटणे स्वाभाविक आहे, मात्र पेपरफुटीवरून देशभरात आंदोलन करणार्या आणि मोदींविषयी अपशब्द वापरणार्या विद्यार्थ्यांना/तरुणांना पोलिस हुडकून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत. याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांवर व तरुण पिढीवर होत असलेली कारवाई थांबविली तरच विद्यार्थी/युवा पिढी प्रभावित होईल आणि त्यांच्यावर खरोखर फ्रेंड्स शब्दाची मोहिनी पडेल. शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी एका व्हिडिओद्वारे चौथ्यांदा संवाद साधला, त्यावेळी त्यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाचा उल्लेख केला. पहिल्या तीन व्हिडिओंमध्ये त्यांनी आंदोलनाचा कोठेही उल्लेख केला नव्हता. जंतरमंतरवर जे घडले, ते सर्व जगाने पाहिल्याचा उल्लेख त्यांनी केला आणि आंदोलनकाळात आपल्याला व आपल्या दिवंगत आईच्या नावाने अपशब्द वापरले गेल्याचेही सांगितले. काही मुलींनी असभ्य भाषा वापरल्याने संस्कृतीला धक्का बसला, असे त्यांनी आपल्या फ्रेंड्सना सांगितले आणि युवा पिढीची दिशाभूल केली गेल्याचेही म्हटले. त्यांचा पहिला व्हिडिओ तांत्रिक कारण देऊन मेटा कंपनीने फेसबुकवरून काढून टाकल्याने मोठा गैरसमज निर्माण झाला होता, जो व्हिडिओ काढून टाकण्यात आला होता, तो मेटाने पुन्हा टाकला. या व्हिडिओत पंतप्रधानांनी पेपरफुटीविरोधात सरकार कडक भूमिका घेणार असल्याचे सांगितले होते. पेपरफुटी प्रकरणातील एकाही दोषीला सोडले जाणार नाही, सरकार त्यांच्यावर अत्यंत कडक कायदेशीर कारवाई करत आहे, असे ते म्हणाले होते. पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी कडक कायदा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले खरे, पण आपल्या संदेशात जंतरमंतरवरील आंदोलनाचा, पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा वा अश्रुधुराचा कोठेही उल्लेख केला नाही. इतकेच नव्हे, तर
पेपरफुटीमुळे निराशेतून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचाही उल्लेख केला नाही. विद्यार्थी व तरुणांनी व्हिडिओंतील उणिवा समोर आणल्या. संसदेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) कायदा, 2024 या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक करण्यासाठीचे विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधानांनी पुन्हा एक व्हिडिओ जारी करून दिलासा दिला. पंतप्रधान एकापाठोपाठ एक व्हिडिओ संदेश देत असल्याने देशाचे व युवकांचे त्यांच्या संदेशाकडे निश्चितच लक्ष वेधले गेले. शुक्रवारी त्यांनी आणखी एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला, ज्यात त्यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाचा उल्लेख करून लोकांच्या भावनांना हात घातला आणि विद्यार्थ्यांनी, युवकांनी वापरलेल्या अपशब्दांचा मुद्दा उपस्थित करून त्यांना माफ करण्याचे शब्द दिले. दिल्लीतील जंतरमंतर आंदोलनादरम्यान आपल्याविरोधात आणि आपल्या दिवंगत मातोश्रींबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणार्या आंदोलक विद्यार्थ्यांना माफ करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवीगाळ किंवा गैरवर्तनाने कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. आपण सर्वांनी मिळून देशाला पुढे नेले पाहिजे, असा संदेश त्यांनी तरुणांना दिला. पेपरफुटीविरोधात देशभर आंदोलन सुरू असताना तरुणांनी काही वक्तव्ये केली. त्यांत मोदी आणि त्यांच्या आईविषयी अपशब्द वापरले गेले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधानांनी जे मत व्यक्त केले, त्याआधीच त्यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करणार्या विद्यार्थ्यांना/युवकांना हुडकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली होती. मोदींविषयी आक्षेपार्ह आणि अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी नोएडातील सेक्टर-168 येथे राहणार्या आणि स्वतःला स्पा/सलून कर्मचारी सांगणार्या रुचिका सिंग नावाच्या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थी अपशब्द वापरत असल्याचे व्हिडिओ आता समोर येत असून, पोलिस त्यांच्यावर कारवाई करत आहेत. सोशल मीडियावर अपलोड झालेल्या हजारो व्हिडिओंची तपासणी करून, कॅमेर्यात अपशब्द वापरताना दिसलेल्या विद्यार्थ्यांचा पोलिस आता शोध घेत आहेत. या दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी सरकारला धारेवर धरले. त्यांनी प्रश्न विचारला, या देशात अपशब्द वापरणे गुन्हा कधीपासून झाला? तुम्ही एका मुलीला उदाहरण म्हणून लक्ष्य करत आहात. तरुणांना लक्ष्य करणे थांबवा. पोलिस त्यांना लक्ष्य करत आहेत; हे योग्य नाही. पंतप्रधानांनी मानहानीचा खटला दाखल करावा, असे आव्हान त्यांनी दिले. पोलिसांचा वापर फक्त तरुणांना लक्ष्य करण्यासाठी केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. न्यायालयाने या मुलीचे संरक्षण केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. आंदोलनादरम्यान कोणी शिवीगाळ केली, तर त्याचा निषेध करता येतो, पण मुलांना लक्ष्य करण्यासाठी गुन्हेगारी यंत्रणेचा वापर करणे योग्य नाही. या देशात रोज ये-जा करताना लोक एकमेकांना शिवीगाळ करतात. लोकसभेत बसलेल्या पन्नास टक्के खासदारांवर गंभीर गुन्हेगारी खटले आहेत. बलात्कार, खून आणि दरोड्यासारखे गुन्हे दाखल असूनही खासदार सभागृहात येतात, यावर काहीही केले जात नाही; पण कोणी थोडे अपमानकारक शब्द उच्चारले, तरी त्यांना लक्ष्य केले जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधानांविषयी आणि त्यांच्या आईविषयी अपशब्द वापरणे चूकच आहे. अपशब्द वापरणार्या विद्यार्थ्यांना माफ करून त्यांना चांगल्या मार्गावर आणण्याची संधी पंतप्रधान देऊ पाहत असतील, तर त्या मुलीवर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याचा आदेश पंतप्रधानांनी दिला पाहिजे. इतकेच नव्हे, तर सोशल मीडियावर अपलोड केलेल्या हजारो व्हिडिओंची तपासणी करून, कॅमेर्यात अपशब्द वापरताना दिसलेल्या विद्यार्थ्यांचा पोलिस जो शोध घेत आहेत, तोही थांबवला गेला पाहिजे. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना माफ केले असेल तर कारवाईची गरज काय? पंतप्रधान जे बोलत आहेत, ते योग्य असले तरी त्यांचे मुद्दे खोडून काढण्यात कॉक्रोच जनता पार्टीचे नेते तयारच आहेत. पंतप्रधानांनी इन्फ्ल्युएन्सर व्हावे, असेही दास यांनी एका व्हिडिओवरील प्रतिक्रियेत म्हटले. कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन संपले आहे; त्यानंतर आणखी वाद वाढणार नाहीत, आरोप-प्रत्यारोप होणार नाहीत, याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. अपशब्द वापरणार्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांनी माफ केले असेल, तर व्हिडिओ तपासून विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गरजच नाही. पंतप्रधान त्यांना माफ करण्यास तयार झाले असताना पोलिसांनी विद्यार्थ्यांवर कारवाई केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तर ते विद्यार्थी आणखी संताप व्यक्त करतील, हे लक्षात घेता तपास, चौकशी व कारवाई थांबली पाहिजे. एकीकडे फ्रेंड्स म्हणून संवाद साधायचा आणि दुसरीकडे त्याच फ्रेंड्सवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू ठेवायची, असे झाले तर काहीच साध्य होणार नाही. जंतरमंतरवरून संसदेकडे 20 जुलै रोजी निघालेल्या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पेलेट गन्सचा वापर केला (असा आरोप आहे) त्या वेळी विद्यार्थ्यांनीही दगडफेक केल्याचा आरोप आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले, पोलिसही जखमी झाले.
Friends
- प्रशांत पोतदार ‘नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार, ’काका, मला वाचवा!’ असा झाला आक्रोश फार.’ इतिहासात…
- अशोक थोरात देशात अनेक संकटे आहेत पुर्वी बाहेरगावी निरोप कसा द्यावा खुप अडचणी येत…
- देवयानी सोनार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार…
- मुकुंद बाविस्कर नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक…
- गोरख काळे नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा सुखावला असून, जायकवाडीतील पाणीपातळी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली…
- जगन घाणेकर वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे यश! आजच्या तरुण पिढीला आयुष्यात…