अग्रलेख

मायदेशी परतण्याचे आव्हान

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय जाहीर केल्याने, त्यांच्या देशात पुन्हा एकदा हिंसाचार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेख हसीना मायदेशी परतल्यानंतर पुढे काय होईल, हे सांगता येत नाही. हसीना यांचे विरोधक सत्तेवर असल्याने, परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, त्या देशातील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी हसीना यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला होता, त्यामुळे त्यांनी देश सोडून भारतात आश्रय घेतला होता. पंतप्रधान असताना हसीना यांनी धर्मनिरपेक्ष भूमिका घेऊन हिंदूंना संरक्षण दिले होते, परंतु त्यांची भूमिका तेथील कट्टरपंथीयांना मान्य नव्हती. त्यांनी हिंदूंवर अत्याचार सुरू केला होता, तसेच हिंदू मंदिरांचेही नुकसान केले होते. कट्टरपंथीयांना तेथील खलिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा छुपा पाठिंबा होता. हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यानंतरही कट्टरपंथीयांनी हिंदूंवर अत्याचार करणे सुरूच ठेवले. बांगलादेशातील विविध मानवाधिकार संघटना आणि संस्थांच्या अहवालानुसार, ऐंशीपेक्षा जास्त हिंदूंच्या हत्या झाल्या. बांगलादेशातील अराजकाचा फटका त्या देशात राहणार्‍या अल्पसंख्याक हिंदूंनाही जबर बसला. त्यांची घरे, दुकाने जाळली गेली. आता दोन वर्षांनंतर सगळे शांत झाले असे वाटत असतानाच, नव्याने हिंसाचार होण्याची शक्यता दिसत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्च 2021 मध्ये बांगलादेशच्या मुक्तिदिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ढाका येथे गेले होते. तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या निमंत्रणावरून ते 26 आणि 27 मार्च 2021 रोजी दोन दिवसांच्या अधिकृत दौर्‍यावर गेले होते. मोदींच्या या दौर्‍याला कट्टपंथीयांनी विरोध केला होता. कट्टरपंथीय संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी मोठ्या प्रमाणावर हिंसक निदर्शने केली होती. भारतात मोदी सरकारची धोरणे अल्पसंख्याकांच्या विरोधात आहेत, असा दावा कट्टरपंथीयांनी केला होता. त्यांच्या दौर्‍यादरम्यानही हिंदूंवर अत्याचार झाले होते व मंदिरांचे नुकसान करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी भारतात परतल्यानंतर बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक समाज आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर कट्टरपंथीयांकडून मोठे हल्ले करण्यात आले. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या कट्टरपंथीयांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आणि भारताविरोधातील संताप व्यक्त करण्यासाठी हिंदूंना लक्ष्य करण्यात आले होते. हिंदूंची घरे, दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने पेटवून देण्यात आली होती. मोदींचा दौरा बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करण्यासाठी होता, परंतु अंतर्गत कट्टरतावाद आणि राजकीय विरोधापायी त्याचे पर्यवसान मोठ्या हिंसेत आणि हिंदू समाजावरील अत्याचारात झाले. शेख हसीना भारतात आल्यानंतर, नोबेल शांतता पुरस्काराचे मानकरी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन झाल्यानंतरही हिंदूंवर अत्याचार होतच होते. दरम्यान, सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी खलिदा झिया यांचे निधन झाले, परंतु त्यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला बहुमत मिळाले. झिया यांचे पुत्र तारिक रहमान पंतप्रधान झाले. त्यांनी हिंदूंच्या सुरक्षेची हमी भारत सरकारला दिली. दुसरीकडे, शेख हसीना यांना आपल्या सरकारच्या स्वाधीन करण्याची मागणी त्यांनी केली. शेख हसीना भारतात 5 ऑगस्ट 2024 रोजी आल्या होत्या. त्यानंतर बरोबर दोन वर्षांनी, म्हणजे 5 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी मायदेशी परत जाण्याचा निर्णय जाहीर केला. मला तुरुंगात टाकले जाण्याची किंवा मृत्युदंडाची भीती दाखवली तरी मी माझ्या लोकांसाठी मायदेशी परतणार आहे, असे विधान त्यांनी केले. या पत्रकार परिषदेमुळे ढाक्यातील तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्वाचित सरकार आणि दोन वर्षांपूर्वी हसीना यांना पदच्युत करणार्‍या क्रांतीचे नेतृत्व करणारे घटक प्रचंड संतप्त झाले आहेत. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने लागलीच अधिकृत निवेदन जारी केले. तसे करताना त्यांनी थेट भारताच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवला. बांगलादेशात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या फरार व्यक्तीला भारतीय भूमीवरून राजकीय विखारी भाषणे करण्याची परवानगी देणे, हा बांगलादेशच्या सार्वभौमत्वाचा आणि जुलै क्रांतीतील हुतात्म्यांचा अपमान आहे, असा गंभीर आरोप बांगलादेशने केला. पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले बांगलादेशचे माजी क्रिकेटपटू आणि अवामी लीगचे माजी खासदार शाकिब अल हसन यांच्या बांगलादेशातील मागुरा येथील निवासस्थानावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. दुसरीकडे, हसीना यांच्या अवामी लीगने या घटनेला नव्या फॅसिझमचा उदय असे संबोधून बांगलादेशातील सत्ताधार्‍यांवर, म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीवर प्रतिहल्ला चढवला. शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद जॉय यांनी बांगलादेश आता पाकिस्तान बनला आहे, असे वक्तव्य केले, तसेच पुढील दहशतवादी बांगलादेशमधूनच उदयास येतील, असा दावाही केला. तारिक रहमान आणि शेख हसीना यांच्यात तीव्र संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. संभाव्य संघर्षात हिंदूंवर पुन्हा एकदा अत्याचार होणार नाही, याकडे भारताला पाहावे लागेल. हसीना यांना ताब्यात देण्याची मागणी तत्कालीन हंगामी सरकारने भारताकडे केली होती. हंगामी सरकार लोकशाही मार्गाने स्थापन झालेले नाही, असे कारण देऊन भारताने हसीना यांना आश्रय दिला. बांगलादेशात आता लोकशाही सरकार आहे. तारिक रहमान यांनी जुन्या हंगामी सरकारच्या भूमिकेप्रमाणेच मागणी कायम ठेवली आहे. भारतीय उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांनी 10 ऑगस्ट 2026 रोजी ढाका येथे बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांची भेट घेतली, तेव्हा बांगलादेश सरकारकडे हसीना यांना हवाली करण्याची मागणी त्यांनी केली. दोन वर्षे भारतातील आश्रयानंतर हसीना यांनी मायदेशी परत जाण्याचा निर्णय घेतल्याने बांगलादेशात अस्थिरता निर्माण होऊ पाहत आहे, त्यात हिंदूंवर अत्याचार होणार नाही, याची दक्षता भारताला घ्यावी लागणार आहे. तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नवीन सरकारचे भारताने स्वागत करून मैत्रीचे संबंध कायम ठेवण्याची भूमिका आधीच घेतली होती. हसीना यांना बांगलादेशच्या स्वाधीन करण्याबाबत भारताने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. हसीना यांना मायदेशी जायचेच असल्यास, त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या देशात पोहोचवण्याची जबाबदारी भारताचीच आहे. त्या मायदेशी गेल्याच तर पुढे काय, हा खरा प्रश्न आहे. ही परिस्थिती भारताच्या मुत्सद्देगिरीची परीक्षा पाहणारी आहे. अधिकृतपणे हसीना यांच्या पत्रकार परिषदेपासून भारताने अंतर राखले असले, तरी हसीना यांना भारतीय भूमीवरून वक्तव्ये करू देणे हे बांगलादेशातील भारतविरोधी जनमताला खतपाणी घालणारे ठरू शकते. भारताने हसीना यांना मानवतावादी दृष्टिकोनातून आश्रय दिला, पण त्यांच्या देशातील नव्या सरकारशीही राजनैतिक संबंध ठेवावे लागणार आहेत. बीएनपीच्या खलिदा झिया यांचे निधन झाले असले, तरी त्यांचे पुत्र तारिक रहमान हे पंतप्रधान झाले. आपल्या पुत्राला पंतप्रधान करण्याचे त्यांचे स्वप्न होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे हसीना यांना सत्ता सोडावी लागली. हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद जॉय राजकारणात सक्रिय आहेतच. भावी पंतप्रधान म्हणून हसीना आपल्या पुत्राकडे पाहत असतील, तर त्यांना बांगलादेशात जावेच लागणार आहे. त्या मायदेशी कशा परतू शकतील, परतल्याच तर तेथील सरकार त्यांना कशी वागणूक देणार, असे काही प्रश्न आहेत. शेख हसीना यांना ढाका येथील विशेष आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने विविध आरोपांवरून फाशीची (मृत्युदंडाची) शिक्षा सुनावलेली आहे.

The challenge of returning to the homeland

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

17 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

17 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

17 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

18 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

18 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

18 hours ago