गेल्या काही वर्षांत भारतीय तरुणांवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. भारतात वाढत जाणारे घटस्फोटांचे प्रमाणही याचीच फलश्रुती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नॅशनल फॅमिली हेल्थ
सर्व्हेनुसार भारतात साधारणतः वीस वर्षांपूर्वी 0.6 टक्के विवाहित महिला घटस्फोटित किंवा विभक्त होत्या, आता हे प्रमाण 1 टक्का झाला आहे. पुणे स्टडी 1986-87 नुसार, घटस्फोटाच्या प्रकरणांपैकी 67 टक्के खटले पतीने दाखल केले होते. नवीन आकडेवारीनुसार घटस्फोट घेण्यासाठी खटले दाखल करणार्यांमध्ये 58 टक्के महिला आहेत.
मुंबई कौंटुबिक न्यायालयाच्या अभ्यासानुसार, 40% प्रकरणांत लग्नानंतर तीन वर्षांतच संबंध दुरावतात. घटस्फोट मागणार्या महिला बर्याचदा 25 ते 34 वयोगटातील असतात. दरवर्षी घटस्फोटांची जेवढी प्रकरणे न्यायालयात निकाली काढली जातात, तेवढीच किंबहुना त्याहून अधिक नवीन प्रकरणे न्यायालयांत नव्याने प्रविष्ट केली जातात. त्यामुळे येणार्या काळात देशाची कुटुंबव्यवस्था संकटात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तरुण पत्नी-पत्नी विभक्त झाल्याने सर्वाधिक परिणाम त्यांच्या अपत्यांवर होतो. अशा अपत्यांमध्ये एकलकोंडेपणा, द्वेष, चिडचिड करणे, सूडभावनेने वागणे यांसारखे दोष प्रकर्षाने दिसून येतात. घटस्फोटित पालकांची मुले नकळतपणे गुन्हेगारीकडे वळत असल्याचे निरीक्षणही अहवालात नोंदवण्यात आले आहे. पश्चिमी देशांच्या तुलनेने भारतात होणार्या घटस्फोटांची टक्केवारी कमी असली, तरी आज या प्रकारांवर नियंत्रण आणले नाही, तर भविष्यात ती भीषण स्वरूप धारण करू शकते, ज्याचा परिणाम सामाजिक व्यवस्थेवर होऊ शकतो. विवाह करताना प्रत्येक मुला-मुलीने आपल्या भावी आयुष्याबद्दल अनेक स्वप्ने रंगवलेली असतात. या स्वप्नांचा चुराडा करणारा घटस्फोट कुणालाही नको असतो. मात्र, तो आयुष्यात येण्यामागे कारणेही तितकी गंभीर असू शकतात.
शहरासारख्या ठिकाणी राहणार्या जोडप्यांमध्ये ग्रामीण भागाच्या तुलनेत घटस्फोटांचे प्रमाण अधिक आहे. शहरी भागात राहणारे बहुतांश तरुण पती-पत्नी दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करणारे आणि बर्यापैकी धन कमावणारे असतात. कार्यालयात उच्च पदावर असताना इतरांकडून मिळणारा मानसन्मान, सुधारित राहणीमान यामुळे राहणीमानाचा आणि पदाचा काही प्रमाणात अहंकार निर्माण होऊ लागतो. घरी जोडीदाराकडूनही अशाच सन्मानाची अपेक्षा केली जाते. तो तितक्या प्रमाणात न मिळाल्यास लहानसहान प्रसंगांतून खटके उडू लागतात. खटक्यांचे रूपांतर वादात होते. कधीकधी हे वाद विकोपाला पोहोचतात. सातत्याने असे प्रसंग घडू लागल्यास जोडीदारासोबत राहणे नकोसे वाटू लागते. माघार घेण्याची सवय नसल्याने वितुष्ट वाढत जाऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते. नोकरीच्या निमित्ताने कार्यालयातील सहकारी तसेच कार्यालयाशी संबंधित व्यक्ती यांच्याशी सातत्याने संपर्क येत असल्याने काही वेळा पती किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध निर्माण होतात. त्यामुळे जोडीदारांत वाद होऊन नात्यात भेग निर्माण होते. काही वेळा विवाहाआधी घडलेले प्रसंग, आजार किंवा जीवनातील एखादी गंभीर घटना याविषयी समोरच्यांशी मोकळेपणाने बोलले जात नाही. या गोष्टी विवाहानंतर लक्षात आल्यावर विश्वासघाताची भावना मनात निर्माण होऊन नात्यातील जवळीकता लोप पावू लागते. त्याचे पर्यवसान पुढे वादांत आणि भांडणांत होऊन प्रकरण न्यायालयापर्यंत जाते. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांना सरकारकडून प्रोत्साहन आणि संरक्षण दिले जात असले, तरी विवाहानंतर अचानक बदललेले राहणीमान, तेथील चालीरीती, खाण्यापिण्याच्या सवयी यांचा स्वीकार करताना संघर्ष होतो. आंतरधर्मीय विवाह करताना काही वेळा जोडीदारावर धर्मपरिवर्तन करण्यास सक्ती केली जाते. असे विवाहही फार काळ टिकत नाहीत. याखेरीज पती-पत्नींची मानसिक स्थिती, त्यांच्या सवयी, वागण्या- बोलण्याच्या पद्धती, परस्परांच्या नातेवाइकांशी असलेली वर्तणूक यासुद्धा काही प्रमाणात घटस्फोटास कारणीभूत ठरू लागल्या आहेत. जोडीदाराला असलेली व्यसने, त्याचा मित्रवर्ग या गोष्टीही लग्नाआधी ज्ञात नसल्यास गंभीर वादास कारणीभूत ठरतात.
पती-पत्नीचे नाते बहरण्यासाठी एकमेकांना समजून घेणे, एकमेकांना गुणदोषांसह स्वीकारणे, परस्परांशी मनमोकळेपणाने बोलणे, एकमेकांना प्रोत्साहन देणे, आवश्यक तिथे तडजोड करणे, माघार घेणे, परस्परांत विश्वासाचे नाते निर्माण करणे या गोष्टी प्राथमिक टप्प्यावर अत्यंत आवश्यक असतात. आपला अहंकार जपत राहिल्यास लहानसहान प्रकरणात विनाकारण मनात क्लेश निर्माण होऊन नात्यातील प्रेम लोप पावू लागते.
आताच्या पिढीवर अनैतिकता पसरवणारे चित्रपट, कुटुंबव्यवस्थेला छेद देणार्या मालिका, वासनांधतेने भरलेल्या वेबसिरीज यांचा प्रभाव अधिक आहे. विवाहसंस्था व कुटुंबव्यवस्था यांना तुच्छ लेखणार्या या चित्रपट-मालिकांमध्ये विवाहबाह्य संबंध, गृहकलह, घटस्फोट यांसारखे विषय चवीने चघळले जातात. लिव्ह इन रिलेशिनशिपसारख्या पाश्चिमात्य विकृतीला देशात कायद्याचे संरक्षण असल्याने घटस्फोट घेणे किंवा एक जोडीदार असताना दुसर्यासोबत राहणे आजच्या आधुनिक म्हणवणार्या पिढीला तितकेसे चुकीचेही वाटत नाही. भारतीय कुटुंबव्यवस्था टिकवायची असेल, तर या व्यवस्थेचे लाभ महाविद्यालयीन शिक्षणातून शिकवले जायला हवेत. त्यासोबतच चित्रपट, मालिका, वेबसिरीज यांतून भारतीय संस्कृतीला छेद देणारे प्रसंग, कथानक, संवाद यांवर निर्बंध आणणे आज आवश्यक बनू लागले आहे.
The increasing divorce rate is worrying
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…