अग्रलेख

बेभरवशाचे राजकारण

राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो. प्रेम, युद्ध आणि राजकारण यांत सर्वकाही क्षम्य असते, असे म्हणतात. त्याचा प्रत्यय नेहमीच येतो, राजकारणात तर येतोच. अलीकडच्या काळात आमदार, खासदारांची पक्षांतरे बरीच चर्चेत आली. राजकीय तत्त्वप्रणालीला काही महत्त्व राहिले नाही. उद्या कोण कोणत्या पक्षात असेल वा नसेल, याचा काही भरवसा राहिला नाही. कोण कोणाची भेट घेत आहे, यावरून लगेच तर्क काढले जाऊन भाकीत केले जाते. सत्ता मिळत असेल तर पक्ष कोणता, याला काही महत्त्व राहिले नाही. महाराष्ट्रात हेच चार-पाच वर्षांपूर्वी दिसून आले होते. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत फूट पडली, तेव्हा लोकांना सर्वच काही समजले. राजकारण किळसवाणे झाले, असे म्हटले तरी त्याला काहीच अर्थ नाही. भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष एकजीव असल्याचे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची वाताहत झाली. आता तर महायुतीला विरोध करणारे कोणी राहतील की नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीत जे काही सुरू झाले, ते पाहता राजकारणात असंस्कृतपणा आहे काय, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांनी 8 जुलै 2026 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते व आक्रमक नेते संजय राऊत यांचा पारा चढला. संजय राऊत यांनी पवार-शिंदे भेटीला जोरदार आक्षेप घेतला. संजय राऊत यांनी या भेटीला गद्दारांचे उदात्तीकरण असे संबोधले. ज्या एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले, शिवसेना फोडली, त्यांच्याच छताखाली जाऊन शरद पवारांनी बैठक घ्यावी, हे शिवसैनिकांच्या आणि आघाडीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पचनी पडणारे नाही; त्यामुळेच संजय राऊत यांचा संताप झाला, यात नवल नाही. राजकारणात कुरघोड्या आणि उलथापालथी होतच असतात, पण नैतिकतेला महत्त्व असते. नैतिकतेचे सगळे निकष बाजूला ठेवून सोयीनुसार मैत्री केली जाते, तेव्हा निष्ठावंतांना ते रुचत नाही आणि त्यांच्या मनात संशयाचे वारे शिरते. पवार आणि शिंदे यांच्या भेटीमुळे तेच झाले. शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. चांगले किंवा वाईट, आपली चर्चा होतेय, याचा अर्थ आपले नाणे अजून खणखणीत आहे. काही विधाने बोलायला, ऐकायला आणि वाचायलाही चांगली वाटतात. त्यातलेच हे एक विधान, असे त्या म्हणाल्या. त्यांनी सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उघडपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा सदस्य (खासदार) फुटण्याची शक्यता व्यक्त केली. पाच ते सहा खासदार अस्वस्थ आहेत, त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे, त्यामुळे हा पक्ष फुटण्याची शक्यता त्यांनी वर्तवली असतानाच, ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भाजपाचे विनोद तावडेंना पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटल्याच्या बातम्या आल्या, तेव्हा संशयाची पाल जास्त चुकचुकली. नेत्यांना वाटतेय की राजकारण म्हणजे केवळ संख्याबळ आणि सत्तेचे समीकरण आहे. जर राजकारणातून भावना, निष्ठा आणि नैतिकता वजा केली तर कशालाच काही अर्थ राहत नाही. राजकारणात संवाद होतो, भेटीगाठी होतात. एकनाथ शिंदेंच्या मते अशा निखळ भेटी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ते मान्य आहे; पण भेटीगाठींतून वेगळेच काही घडत असेल तर? संजय राऊत यांचा तोच संशय. या प्रकरणात संजय राऊत यांचा गैरसमज झाला असल्याचे सुप्रिया सुळे म्हणतात. हा गैरसमज केवळ राऊतांचा नाही, तर महाराष्ट्रातील लाखो मतदारांचा आहे, कारण त्यांनी महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते. राजकारण कसे फिरते, हे लोकांना कळत नाही. पवार-शिंदे यांच्या भेटीनंतर शरद पवारांचे विश्वासू जयंत पाटील राज्याचे अर्थमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे. महायुतीत अर्थमंत्रिपदावर सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्यानंतर, जयंत पाटील यांचे नाव पुढे आल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत अनपेक्षित घडामोडींचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुप्त भेटीगाठींमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपा नेते विनोद तावडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भेटींनंतर जयंत पाटील यांच्या नावावर सहमती झाल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अर्थखाते देण्याबाबतचा तिढा सुटल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भेटीगाठींमुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येण्याची चर्चा होत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा सलोखा निर्माण करण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. केंद्रातील महत्त्वाच्या विधेयकांना पाठबळ मिळावे आणि राज्यातील सत्तासमीकरण अधिक मजबूत व्हावे, यासाठीही या घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. यापूर्वी जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर शरद पवार, एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भेटींमुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले. या सर्व भेटी वेगवेगळ्या कारणांसाठी झाल्याचा संबंधित नेत्यांचा दावा असला, तरी त्यामागे मोठी राजकीय रणनीती असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. लोकसभेत महिला आरक्षणाला जोडून मतदारसंघ पुनर्रचना (परिसीमन) घटनादुरुस्ती विधेयक मांडण्याच्या दिशेने भाजपाची पावले पडत असून, त्यासाठी दोनतृतीयांश बहुमताची जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वळविण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. सुप्रिया सुळे यांनी महिला आरक्षणाचे समर्थन केले आहे. केंद्रात त्यांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एक झाले तर पवार परिवारातील दुरावा संपेल आणि सत्तेतही सहभाग राहील. संसदेचे अधिवेशन सुरू होत असताना महाराष्ट्रात मोठी घडामोड घडली तर नवल नाही, असे बोलले जात आहे. सध्याच्या बातम्या पाहता, कोणाचा कोणावर भरवसा नाही.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

18 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

18 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

18 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

18 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

19 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

19 hours ago