मिळनाडूतील द्रविड राजकारणात अभिनेता विजय थलपती यांच्या तामिळगा वेत्री कळघमच्या आगमनाने द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (अण्णाद्रमुक) हे प्रमुख पक्ष हादरले. अन्य प्रादेशिक पक्षांसोबतच राष्ट्रीय पक्षांनाही फटका बसला. केंद्रातील सत्ताधारी भाजपाची तामिळनाडूत तशी मोठी ताकद नाही. या पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी नवी चळवळ सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. भाजपाचा आक्रमक हिंदुत्ववादी नेता म्हणून तामिळनाडूत अण्णामलाई यांची ओळख होती. पक्ष सोडण्यापूर्वी त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. चर्चेचा तपशील त्यांनी दिला नाही. भाजपाला तामिळनाडूत आपले स्थान बळकट करायचे आहे. अण्णामलाई हे भाजपासाठी एक भक्कम आणि आक्रमक नेते होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षांना दक्षिण भारतीयांची, विशेषतः तमिळींची मते मिळावीत म्हणून अण्णामलाई यांना प्रचारासाठी आणण्यात आले होते, तेव्हा मराठी माणूस आणि मराठी भाषा हे मुद्दे प्रचारात होते. मुंबई (बॉम्बे) हे केवळ महाराष्ट्राचे शहर नसून, ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे, असे वादग्रस्त विधान अण्णामलाई यांनी केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णामलाई यांना ‘रसमलई’ म्हणत आक्रमक भाषा वापरली. मुंबईत हा बाहेरचा माणूस आहे, म्हणत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची ‘हटाओ लुंगी, बजाओ पुंगी’ ही घोषणा वापरली होती आणि मुंबईत फिरकू नका, अशी तंबी दिली होती. त्यावर अण्णामलाई यांनी मुंबईत परत येऊ, असे जाहीर केले होते. त्याच अण्णामलाई यांनी तामिळनाडूत ‘वी द लीडर्स’ या नावाने नवी चळवळ सुरू केली आहे. दक्षिणेत भाजपाला आत्तापर्यंत मोठी मजल मारता आलेली नाही, अपवाद कर्नाटकचा. तामिळनाडूमध्ये पक्षाने प्रयत्न जरूर केले, पण यश मिळाले नाही. ज्यांचा चेहरा पुढे आणून हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला, त्या अण्णामलाई यांनीच पक्षाला रामराम ठोकला. निवृत्त भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले अण्णामलाई 2020 मध्ये भाजपामध्ये दाखल झाले. त्याआधी 2009 मध्ये त्यांनी अण्णाद्रमुकमध्ये इंटर्नशिप केली होती. आक्रमक शैली, प्रभावी वक्तृत्व आणि भ्रष्टाचाराविरोधातील भूमिकेमुळे अल्पावधीतच त्यांनी स्वतःची वेगळी ओळख तयार केली होती. त्यांच्या नेतृत्वामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली होती. अण्णाद्रमुकशी युती करण्यास विरोध केल्याने अण्णामलाई यांचे प्रदेशाध्यक्षपद विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर काढून घेण्यात आले. त्यांना उमेदवारीही देण्यात आली नाही, त्यामुळे प्रचारातही ते फारसे सक्रिय नव्हते. अण्णाद्रमुक, भाजपा व सहकारी पक्षांचा राज्यात दारुण पराभव झाला. पक्षात अस्वस्थ असलेल्या या नेत्याने अखेर वेगळी वाट धरली. आता ते लोकांचे विविध प्रश्न मांडू लागले आहेत आणि त्यांच्या वी द लीडर्स चळवळीला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट नसली, तरी राज्यात एक प्रभावशाली नेता बनण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. जनतेशी थेट जोडलेले, पारदर्शक आणि तळागाळातील राजकारण उभे करण्यासाठी स्वतंत्र वाटचाल करण्याचा निर्णय त्यांनी आता घेतला आहे. या चळवळीत राजकारणात स्वच्छता, नैतिकता आणि नेतृत्वगुणांना प्राधान्य दिले जाईल. या चळवळीशी जोडल्या जाणार्या कार्यकर्त्यांना एपीजे अब्दुल कलाम एथिक्स इन पॉलिटिक्स या संस्थेमार्फत राजकीय आणि नैतिक नेतृत्वाचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. हेच आंदोलन भविष्यात एका नवीन पक्षाचे रूप घेईल, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. राजकीय पक्ष स्थापन झाल्यास घराणेशाही आणि घराणेकेंद्रित राजकारणाला आळा घालण्यासाठी कार्यकाळ मर्यादा लागू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर व्यक्त करताना अण्णामलाई म्हणाले की, त्यांच्या मनात मोदींबद्दल कायम सन्मान राहील. मात्र, एखाद्या विषयावर मतभेद झाल्यास ते स्पष्टपणे आपली भूमिका मांडतील. भाजपामध्ये असतानाही त्रिभाषा धोरणाला विरोध केल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पक्षातील काही उणिवा आणि आपली मते त्यांनी स्पष्टपणे मांडली, त्यानंतरच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. दूरून राजीनामा पाठवणार्यांपैकी मी नाही. पक्षनेतृत्वासमोर माझी भूमिका स्पष्ट केल्यानंतरच मी सन्मानपूर्वक बाहेर पडलो, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. वी द लीडर्स चळवळीच्या माध्यमातून त्यांनी नवीन राजकीय पक्षाची पायाभरणी केली आहे. तामिळनाडूतील घराणेशाहीच्या राजकारणाला त्यांचा विरोध आहे आणि याच चळवळीच्या माध्यमातून ते पक्ष मजबूत करतील. भविष्यातील रणनीती त्यांनी स्पष्ट केली नसली, तरी त्यांना भाजपाचा पाठिंबा असू शकतो आणि अण्णामलाई यांचा पक्ष भविष्यात भाजपाशीही हातमिळवणी करू शकतो. भाजपाच्या माध्यमातूनच त्यांची तामिळनाडूत राजकीय प्रतिमा निर्माण झाली आहे. तामिळनाडूत आधीच अनेक छोट्या-मोठ्या राजकीय पक्ष-संघटना आहेत, त्यात आता अण्णामलाई यांच्या वी द लीडर्स फाउंडेशनची भर पडली आहे. अल्पावधीत चळवळ मोठी करण्याची त्यांची कोणतीही योजना नाही, मात्र तळागाळात जाऊन चळवळीचा पाया मजबूत करण्याचा त्यांचा संकल्प दूरदृष्टीचा आहे. ते आपल्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना नेते बनवू पाहत आहेत वी द लीडर्सचा अर्थच आम्ही नेते, असाच आहे. राजकीय पक्षांची कमतरता नसलेल्या तामिळनाडूत अण्णामलाई आणि त्यांच्या चळवळीचे भवितव्य द्रविड जनतेच्या हाती आहे. जनतेचा पाठिंबा त्यांना कसा आणि किती मिळेल, यावरच बरेच काही अवलंबून आहे.
We are the leaders!
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…