संपादकीय

रस्ते दुरुस्तीचा दावा ठरणार का खरा?

– गोरख काळे
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरातील 28 रस्त्यांची कामे एकाचवेळी हाती घेतल्याने नाशिककरांना सध्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यातून सुखरूप वाट काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यामुळे नाशिककरांमध्ये संताप दिसून येत आहे. शहरात यापूर्वी कधीही अशी स्थिती उद्भवली नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर प्रशासनाच्या चुकलेल्या नियोजनाचा फटका नाशिककरांना बसतो आहे. सध्या शहरात खोदलेले रस्ते, मातीचे ढीग, खडीचे ढीग, धुळीचे साम्राज्य असे चित्र संपूर्ण शहरातल्या मुख्य रस्त्यांचे झाले आहे. रस्ते दुरुस्तीची कामे झाली नाही तर पावसाळ्यात काय परिस्थिती असेल? हे सांगणे कठीण आहे. या प्रकारामुळे पालिका प्रशासन नागरिकांच्या टीकेचे धनी बनले असताना, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी रस्तेदुरुस्तीच्या कामांना वेग देण्याच्या सक्त सूचना मक्तेदारांना दिल्या आहेत. तर शहरातील रस्ते दुरुस्ती रविवार(दि.31)पर्यंत पूर्ण होण्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दावा खरा ठरणार की फोल, याचे उत्तर रविवारी मिळणार आहे.

रस्ते खोदताना प्रशासनाने वाहनधारकांसाठी पर्यायी रस्त्यांची व्यवस्थाच ठेवली नसल्याने हा गोंधळ आणखी वाढल्याने नागरिकांत प्रशासनाविरोधात रोष दिसतो आहे. यास पालिकेचे संबंधित विभागांचे अधिकारीच जबाबदार आहेत. नाशिकच्या रस्त्यांवरून उद्धवसेनेचे माजी मंत्री व आ. आदित्य ठाकरे यांनी प्रशासनासह भाजपवर टीकेची झोड उठवली. रस्ते सर्वत्र खोदल्याने नागरिकांची पावसाळ्यात काय स्थिती असेल व त्यांच्या सुरक्षेचे काय? अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सिंहस्थाच्या रस्तेकामांत कुठल्या ठेकेदारांना कामे दिली आहेत, यावर त्यांनी आरोप केले होते. सिंहस्थ कामांना नाशिककरांचा अजिबात विरोध नाही. रस्ते खोदून ठेवल्याने दळणवळणाची समस्या उद्भवली आहे. मार्च 2027 पर्यंत रस्ते निर्माणाचे आव्हान प्रशासनासमोर आहे. सिमेंटसह डांबरीकरणाचे रस्ते शहरभर केले जात आहेत. मात्र, या कामांमुळे नागरिकांना अनेकाविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने जानेवारी महिन्यात 18 प्रमुख रस्त्यांवर आणि फेब्रुवारीमध्ये उर्वरित 10 रस्त्यांवर युटिलिटी डक्टची कामे हाती घेण्यात आली होती. या डक्टमध्ये पाणीपुरवठा वाहिन्या, ड्रेनेज लाइन्स, पीएनजी, ऑप्टिकल फायबर केबल, महावितरण केबल्स, पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्था आदी कामांचा समावेश आहे. पुढील 10 ते 15 वर्षांत वेगवेगळ्या सेवांसाठी पुन्हा पुन्हा रस्ते खोदावे लागू नयेत, हा यामागील मुख्य उद्देश आहे. सध्याच्या घडीला बहुतांश युटिलिटी डक्टची कामे पूर्ण झाली असून, आता खोदलेला भाग पूर्ववत करण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित आणखी पाच ते सहा रस्त्यांवरही काम सुरू असून, ते लवकरच पूर्ण होऊ शकतात. मात्र, पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व मुख्य आणि अंतर्गत रस्ते वाहन चालविण्यास योग्य स्थितीत बनवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. आधीच खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहनचालकांची मोठी कसरत होत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने खड्डे दुरुस्ती मोहीम हाती घेतली आहे. परंतु, पावसाचे पाणी त्या खडी-मुरुमाने बुजवलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता आहे. त्यावेळी प्रशासनाचा खरा कस लागेल. रस्त्यावर पावसामुळे चिखल होता कामा नये, यामुळे अपघात होण्याची भीती असेल. या पावसाळ्यात वाहनचालक व महापालिका प्रशासन या दोघांचीही कसोटी लागणार आहे. पावसाळा तोंडावर आल्याने या खोदलेल्या रस्त्यांत पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीला गती देण्याच्या सूचना महापालिकेच्या बांधकाम विभागाने ठेकेदारांना दिल्या आहेत. महापालिका अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, सिंहस्थ कुंभमेळा पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत विकसित होत असलेल्या 28 प्रमुख रस्त्यांपैकी काही रस्त्यांवर कंत्राटदारांनी दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. आयुक्त यांनी अधिकार्‍यांना खोदलेले सर्व रस्ते समतल करण्यास, तातडीने खड्डे बुजवण्यास आणि रस्त्यांच्या कडेला साचलेला मातीचा व इतर अवशेषांचा ढिगारा हटवण्यास निर्देश दिले आहेत. वाहनचालक आणि पादचारी यांना सुरक्षितपणे प्रवास करण्यातील सर्व अडथळे दूर करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी स्वतः सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित सर्व रस्ते व प्रकल्पांची प्रगती तपासण्यासाठी पाहणी दौरे करत आहेत. कामे नियोजित वेळेत पूर्ण होत आहेत का, याची खात्री त्या करत आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व विभागांना दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देत रविवारपर्यंत खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याचे आणि रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत रस्ते दुरुस्ती झाली का नाही? हे सोमवारी दिसून येणार आहे. पावसाळ्यात रस्त्यावरून वाहनधारकांना कुठलीही समस्या उद्भवल्यास पालिका प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे अशी कुठलीही परिस्थिती उद्भवू नये याकरिता प्रशासन सध्यातरी रस्ते दुरुस्तीच्या कामांना वेग देत आहे.

Will the claim for road repairs be true?

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

13 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

13 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

13 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

13 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

13 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

13 hours ago