आपल्या जगण्याची लढाई आपली आपल्यालाच लढायची असते. आपल्या वतीने ती इतर कुणालाही लढता येत नाही. निसर्गाचा तसा नियमच आहे! या निसर्गनियमाचं भान माणसाला राहीलेलं नाही. बुद्धीच्या बळावर ज्ञान-विज्ञानाची कास धरुन विकास करायला निघालेला माणूस स्वतःला निसर्गाहून वेगळं समजू लागला. तिथूनच त्याचं सगळं भान हरवलं असून आताच्या घडीला तो बेभान झालेला आहे. शिक्षणानं मानव सुसंस्कृत होणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र शिकलेली माणसं संस्कारहीन होताना दिसत आहेत. त्यांच्यातील परस्परसंवाद आटला आहे. प्रेम, आस्था, आपुलकी, करुणा, दया, विश्वास, सहानुभूती, समानुभूती, मदत, सहकार्य, ही मानवी उत्थानासाठी अत्यंत आवश्यक असणारी मूल्यं शिक्षणानंतर गळून पडत आहेत. वाढत्या विद्वत्तेसोबत त्यांची अहंताही वाढताना दिसत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून एका अज्ञानातून बाहेर पडलेली ही माणसं अहंतेच्या दुसर्या अज्ञानात गटांगळ्या खात असलेली दिसतात!
आपलं शिक्षण आणि त्यातुन मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे मिळालेली अधिकारसंधी ही जणू इतरांना लुटण्यासाठी मिळालेला अधिकृत परवानाच आहे असं समजून ही शिकलेली माणसं इतरांचं शोषण करायला लागली. हे पाहून शिक्षणानं शोषणाचा अधिकार मिळतो असा एक चुकीचा संदेश समाजात पोहोचला. त्यामुळं शिक्षणात प्रचंड मोठी स्पर्धा निर्माण झाली. काळाच्या प्रवाहात पुढे ही स्पर्धा मानवी जगण्याशी निगडित असलेल्या प्रत्येक क्षेत्रात सुरु झाली. हळूहळू तीव्र झालेल्या या सर्वदूर स्पर्धेमुळं माणूस सैरभैर होऊन भरकटत गेला. आता तर त्याच्या एकूण जगण्याची दिशाच भरकटली आहे. अशा भरकटलेल्या माणसाला आपल्या जीवनाची घडी बसवणं कठीण झालं आहे. हे असं का झालंय? आणि हे जे काही झालं आहे ते दुरुस्त कसं करता येईल? हा खरा प्रश्न आहे. प्रत्येक बाबतीत माणसाची द्विधावस्था झाली आहे की काय? असं वाटण्याजोगी ’टू बी ऑर नॉट टू बी’ अशी माणसाची एकूण परिस्थिती निर्माण झाली आहे
कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या वेळी अर्जुन असाच सैरभैर झाला होता. त्याची कारणं वेगळी असतील पण तोही असाच भरकटला होता. त्यालाही योग्य निर्णय घेणं कठिण झालं होतं. त्यावेळी अर्जुनानं वेगानं आपली संसारबंधनं तोडावीत आणि आपली सोडवण करून घ्यावी. असं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाला मात्र त्यांचं हे सांगणं अनाठायी आहे असंच वाटत होतं. अर्जुनाला त्यावेळी ते मुळीच गरजेचं वाटत नव्हतं. कारण श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणं कृती करणं अर्जुनाला सोयीचं वाटत नव्हतं. तेव्हा श्रीकृष्णानं अर्जुनाची अल्प आणि मूढ मती लक्षात घेऊन प्रत्यक्ष युद्धभूमीवरच त्याला गीताज्ञान दिलं. त्याला ब्रह्मांंडाचं दर्शन घडवलं. तेव्हा कुठं अर्जुन युद्धाला तयार झाला, त्यानं शस्त्र हाती घेतलं. नंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे! आपण इथं इतकंच म्हणूयात की, अर्जुनानं आपली सोडवण करून घेतली!
हे गीताज्ञान सामान्य जनांच्या आकलनापलीकडचं आहे. कारण त्याची भाषा कठीण आहे. हे लक्षात घेऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींनी आपुली आपण करा सोडवण, असं सोप्या शब्दांत सांगून हे भरकटलेलं जगणं जगणार्या जीवाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न शेकडो वषार्ंपूर्वीच केला. संसार बंधन तोडा वेगी या शब्दांत त्यांनी माणसाला त्याचं जगणं सुधारण्याचा उपायही सांगीतला. अगदी देव आणि देवपूजा निषिद्ध समजणार्या तथागत गौतम बुद्धांनीसुद्धा अत: दीप भव! असं म्हणत आपल्या जीवनातला अंधार दूर करण्यासाठी तू स्वतःच दिवा हो! असा संदेश समस्त मानवजातीला दिला आहे. अलीकडच्या काळात श्री वामनराव पै यांनीही तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार! असं समाजाला निक्षून सांगण्यात आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. इतरही अनेक संतांनी आणि बहुसंख्य समाजहितैषि विचारवंतांनी आपल्याला हेच सांगण्याचा अविरत प्रयत्न केला. या सर्वांचं सांगणं अत्यंत तळमळीचं असूनही त्यांच्या या सांगाव्याचा आपल्यापैकी अनेकांवर काहीच परिणाम झालेला दिसत नाही.
खरंतर ’महाजनो येन गतःस पंथा’ या उक्तीनुसार थोरामोठ्यांनी आपल्याला दिलेला हा मार्ग आपण आपल्या आचरणात आणायला हवा. गीतेत श्रीकृष्णांनी किंवा पुढे श्री संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला संसारबंधनं तोडण्याचा उपाय आपण अंमलात आणायला हवा. बुद्धांनी सांगिल्याप्रमाणं आपल्याला आपल्या अंधार्या जीवनातला दिवा होण्याची संधी यातूनच मिळू शकते. एव्हाना संसारबंधनं तोडायची म्हणजे नेमकं काय करायचं? हा प्रश्न आपल्या मनात उभा राहिला असेल आणि तसा तो राहिलाच पाहिजे!
इथं मला पोहायला शिकायचंय! असं म्हणत गावातल्या मुलांबरोबर विहीरीवर जाणार्या विजूची एक रंजक गोष्ट आठवते. हा विजू विहिरीच्या काठावर बसून पोहणार्या मुलांची नुसती गंमत पहायचा. एक दिवस काठावर बसून गंमत पाहाणार्या विजूला कोणीतरी विहिरीत ढकललं. अजिबात पोहता न येणारा विजू अचानक पाण्यात पडल्यानं खूप घाबरा झाला. त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं. तो मला वाचवा! मला वाचवा! असं मोठ्यानं ओरडू लागला. तेव्हा त्याला ज्यानं पाण्यात ढकललं होतं तो काठावर उभा असलेला मुलगा विजूला धीर देत म्हणाला – अरे! विजू, घाबरू नकोस. मी तूला पोहायला शिकवतो. तू फक्त तुझे हातपाय हलव. हे ऐकून आधीच घाबरा झालेला विजू म्हणाला – माझे हातपाय काही हलत नाहीत. काय हलवायचं ते तुम्हीच हलवा! आहे की नाही गंमत? ज्या विजूला पोहायला शिकायचंय, तो त्याचे स्वतःचे हातपाय न हलवता काठावरच्या माणसाला हातपाय हलवायला सांगतोय. असं केल्यानं विजूला पोहता येणार आहे का? मुळीच नाही. याच धर्तीवर जी व्यक्ती समस्येत आहे तिने स्वतः त्या समस्येची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी लागणारी मदत किंवा मार्गदर्शन बाहेरून घेता येईल; पण खरी लढाई त्या व्यक्तीनेच लढायला हवी.
कोणीतरी माझ्यासाठी काही प्रयत्न करेल किंवा माझ्या वतीने लढेल ही केवळ भ्रामक धारणा आहे. दुसरा कुणीही येऊन आला विकास करू शकत नाही कारण विकास हा ज्याचा त्यालाच करता येतो. जे कुणी तुमच्या विकासासाठी काही करण्याचे दावे करतात, ते सगळे एकतर गल्लाभरु आहेत किंवा तुमची फसवणूक करणारे आहेत हे नीट समजून घ्यायला हवं. माझ्यावाचून जगाचं अडेल असं म्हणत आपण मृत्यूलाही ’नको नको रे अवेळी’ असं विनवत असतो. जगातली प्रचंड मोठी आणि महान असणारी अनेक माणसं अकाली मरण पावलीत, पण त्यामुळं कुणाचंही काहीच अडलेलं नाही. माणूस आपली अहंता कुरवाळत असतो इतकंच. खरंतर ही अहंता त्यागण्यातच सर्वांचं खरंखुरं कल्याण सामावलेलं असतं. हे सर्व लक्षात घेऊन लेखाच्या पूर्वार्धात नमूद केल्याप्रमाणं महाजनांनी सांगितलेल्या मार्गानं आपली सर्व बंधनं तोडून टाकीत ज्यानं त्यानं आपली सोडवण करून घ्यायला हवी.
– अनिल उदावंंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
You solve it yourself…
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…