संपादकीय

तरुवर ईश्वरासमान

फक्त वैद्यकीय व्यवसायात पैशांच्या लालचीपणापेक्षा जनसेवेची आवड हवी. आणि समाजप्रबोधनासाठी झोकून देण्याची तयारी हवी.
होळीच्या दिवशी फक्त काही विशिष्ट झाडांचीच लाकडे वापरण्याची प्रथा आहे (हल्ली सर्रास कुठलेही लाकूड तोडून किंवा बाजारातून लाकडे विकत आणून होळी साजरी नव्हे सेलिब्रेट करतात! या सेलिब्रेशनचे स्वरूप सुज्ञास सांगणे न लगे) असे का? ती लाकडी जाळल्याने पर्यावरणावर काय परिणाम होतात याचाही सखोल अभ्यास व्हायला हवा.
होळीनंतर होळीची राख आंघोळीच्या पाण्यात कालवून ते पाणी अंगावर घेतात. होळीत भाजलेले खोबरे औषध म्हणून खातात. विझत आलेल्या होळीवर तांब्याचे भांड्यात पाणी तापवून पहाटे थंडीत आंघोळ करण्याची प्रथा आहे असे का? होळीत कुठल्या काष्ठौषधी आहेत? ज्या तनामनाचे आजार दुर पळवतात संशोधन नक्कीच व्हायला हवे. नवरात्रात घट बसवून काही धान्य रुजविले जातात. नंतर नदीत अगदी वरच्या अंगाला त्याचे विसर्जन करतात. शास्त्र समाजात रुजवणे आवश्यक आहे. धान्यासोबतच गोडधोड आणि दह्या दुधाच्या पदार्थांमुळे नदीकाठची जमीन पोषक होते. शाडूचा गणपती बसवून दहा दिवस त्याच्यावर दही, दूध, पंचामृताचा अभिषेक शिंपडून करतात. शाडूत पोषक घटकांसोबत सहजीवी जिवाणूंची ही वाढ होते. सोबत खोबरे, साखर, गुळाचा नैवेद्य गणपतीसोबत विसर्जनानंतर नदीच्या वरच्या अंगापासून प्रवास करतो. आणि काही काळानंतर नदीकिनार्‍यावर स्थिरावल्यानंतर तिथल्या मृदेला सुपीकता प्रदान करतो. एकच तर तत्त्व आहे नवरात्रीचे आणि गणपती उत्सवाचे.
प्रत्येक सणाला घरावर लटकलेले आंब्याचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण त्या घरातली समृद्धी, परंपरांची उत्तम जपणूक, आणि कलात्मक दृष्टिकोन दर्शवतात. वटसावित्री पौर्णिमेची कथा काहीही असो, पण वडाच्या पारावर बसून वडाला पंचामृताचा अभिषेक करत खारीक, खोबरे ,गुळाचा नैवेद्य (हळदही असते) दाखवून गहू, तांदळाचे वाण वडाजवळच्या जमिनीत मिसळल्यानंतर वटमृदेची प्रतही सुधारते. वडाजवळची जमीन सगळ्यात सुपीक समजली जाते. एक टक्का कारण कदाचित हेसुद्धा असावे त्याकरता वडाच्या फांद्यांची कत्तल करून घरात हॉलमध्ये वडपूजा सेलिब्रेशन करून सोशल मीडियावर रील्स बनवून टाकण्याची आवश्यकता नाही. वडपूजेेचे आयुर्वेदिक पर्यावरणपूरक महत्त्व सुयोग्य पद्धतीने सोशल मीडियावर सांगितल्यास ते जास्त योग्य.
आमच्या वाणी समाजात माझ्या माहेरी लग्नानंतर नऊ वर्षे सुवासिनी पिंपळ पूजा करतात. वडासारखीच हीपण पूजा; पण प्रत्येक वर्षातले नऊ दिवस दूध, दही, तूप, मूग, सुकामेवा, फळे खाऊन त्या सुवासिनींच्या अंगावर, चेहर्‍यावर जे तेज येते ते अवर्णनीय असते? तसेच त्या नखशिखांत नटलेल्या, नाकात नथ मिरवणार्‍या, भरजरी सोवळ्यातल्या सोज्वळ स्त्रिया या नऊ दिवसांत घरादाराला अत्यंत कौतुकास पात्र असतात. त्यावेळी त्यांच्यातले भावुकपण हळवेपण श्रद्धाळूमन हेवा वाटावा इतके छान असते. पण हल्ली स्वतःला मॉडर्न समजण्याच्या नादात कित्येक सुना हे व्रत स्वीकारत नाहीत. किंवा मॉडर्न सासवा सुनेला करू देत नाहीत. एक सर्वांगसुंदर परंपरा विस्मरणात जाईल की काय? याची खंत वाटते.
शिळा सप्तमी, आवळी अष्टमी, महाशिवरात्र, श्रावणी सोमवार, शेतातले भोजन, वनभोजन यासाठी तर निसर्गाच्या सान्निध्यातच जावं लागते. त्यातील मजा ज्यांनी चाखली असेल त्यांचे अनुभव विचारा. देवधर्मासोबतच निसर्ग सन्निध्य, वृक्षदेवता सान्निध्याचाही लाभ होतो. पुराणात वार्णिल्याप्रमाणे जवळजवळ सगळ्याच साधूंनी झाडांखाली बसूनच सिद्धी प्राप्त केल्या. आणि त्या सिद्धींद्वारे जनउद्धार, समाज उद्धार केला. याला तर कुठलाही धर्म अपवाद नाही. डेरेदार वृक्षांखाली बसून ऋषिमुनी शिष्यांना शिकवताहेत किंवा काहीतरी वाचन मनन पठन सुरु आहे. किंवा साध्या भोळ्या गावकर्‍यांना प्रबोधन करत आहेत. हे दृश्यच किती छान आहे. डेरेदार वृक्षांची सावली पांथस्थांसाठी निवार्‍याची, टेकण्याची जागा असते. रणरण उन्हात चालल्यानंतर किंवा उन्हात घाम गाळून श्रम केल्यानंतर वृक्षांच्या दाट सावलीत टेकून थंडगार पाणी पिल्यानंतर तन मन आत्मा तृप्त होणारच.
बाकी पर्यावरणासाठी वृक्षांचे महत्त्व तर वह्या- पुस्तके न शिकलेल्या सुशिक्षित लोकांना जास्त समजते. आणि हे सत्यपण आहे. जंगलात राहणारे आदरणीय आदिवासी झाडांवर पुत्रवत प्रेम करतात. आणि झाडापेडांची माहिती कुठल्याही तज्ज्ञ माणसापेक्षा त्यांना जास्त असते हे अगदी त्रिवार सत्य आहे.
नाशिक हे शहर विपुल वृक्षराजीने अगदी गेल्या दोन-तीन दशकांपर्यंत संपन्न होते. यवन आणि राक्षसांची वृक्षतोडीची, सौंदर्य नासधूस परंपरा कदाचित या दशकात जोरात मूळ धरू लागली आहे. कधी रस्ता रुंदीकरण, कधी महामार्ग बनवण्यासाठी, कधी समृद्धी तर कधी उड्डाणपूल, कधी वाहतुकीला अडथळा होतो, कधी कारखानदारी, कधी स्वप्नातील घरकुले बनवण्यासाठी तर शाळा, कॉलेज, दवाखाने अशा कित्येक वैद्यकीय (?), शैक्षणिक (?) आणि तत्सम संस्था उभारणीसाठी लाखो झाडांची कत्तल आतापर्यंत शासनाने (जे निसर्गप्रेमी माणसांनीच बनलेले आहे) केली आहे. एकेकाळी पंचवटी (पंज म्हणजे भूभाग वटी : वडाचे झाड, वडाच्या झाडांनी गजबजलेला भूभाग म्हणजे पंचवटी) म्हणून जगाच्या नकाशावर मानाने नावलौकिक मिरवणार्‍या नाशकात वृक्षांची अमानुष कत्तल, वृक्षांचे पानिपत, अमानवी पारिपत्य होत आहे; कल्पनासुद्धा अंगावर सरसरून काटा आणणारी आहे. नाशिकचे धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय महत्त्व म्हणजे नाशकात दर बारा वर्षांनी भरणारा महा कुंभमेळा.
पण या वेळेला मात्र
’नेमेचि येतो मग महाकुंभमेळा’
न राहता तपोवनासारख्या पवित्र तपोभूमीत होऊ घातलेल्या प्रचंड वृक्षतोडीसाठी प्रचंड चर्चेत आला आहे. मोर्चे, संमेलनं, आंदोलनं, उपोषण यांपैकी एकाही गोष्टीला भीक न घालता शासन नावाचे मनमर्जी यंत्र त्यांनी ठरवलेले तंत्र पार पाडणारच याची तर त्या तपोभूमीलासुद्धा खात्री आहे. कुंभमेळ्याच्या कामांनी प्रचंड वेग पकडला आहे. मनोरंजनासाठी गोदापार्क सज्ज झाले आहे. परमपावन पापक्षालिनी, मोक्षदायिनी, जीवनदायिनी गोदावरी जलशुद्धीकरणासाठी शासन सरसावले आहे. साधू यात्रेकरू यांच्या येण्याची राहण्याची, खाण्याची, झोपण्याची सोय करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आज काय म्हणे! वस्त्रांतरगृह पाडण्यात आले. (उज्जैन, ओंकारेश्वरच्या नदीकाठावर फिरताना तिथे कपडे बदलण्यासाठी तात्पुरते उभारण्यात आलेले छोटेखाणी तंबु मात्र कौतुकास्पद वाटले) गोदाकाठ रुंदीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेकानेक बांधकामे आणि इतर अधिक अत्यावश्यक सुविधा तयार करण्याची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. पण त्या बदल्यात कित्येक वृक्ष आणि निसर्गाची सर्रास कत्तल होणार आहे. ही तयारी बघून कुंभमेळ्याचे प्रयोजन म्हणजे जे शिक्षण, जनमानस संघटन, ओळख आणि निसर्गओळख, संवर्धन हे आहे तेच नाहीसे झाल्यासारखे वाटते आहे. इतकी शेकड्याने झाडांची अमानुष कत्तल बघितल्यानंतर अतिशय उदात्त, समाजोद्धारक हेतूने भरवला जाणारा कुंभमेळा सेलिब्रेशन असेल की नाशिककरांसाठी शाप ठरेल हे काळच ठरवेल. डोंगरदर्‍या, जंगल, हिमालय इत्यादी ठिकाणी राहणार्‍या निरिच्छ वृत्तीच्या ऋषी, संत, महंतांसाठी, ’वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे…’ या मंत्राची जोपासना करणार्‍या आणि आचरणातही आणणार्‍या निरामय वृत्तीच्या साधूंसाठी शेकडो वृक्षांचा बळी देऊन ’साधुग्राम’ बनवणे ते पण ’तपोवन’सारख्या ’तपोभूमी’त या हृदयद्रावक कारणासाठी आज संपूर्ण मनाने ’नाशिककर’ असलेले सर्वच जनमानस मनोमन नक्कीच खंतावले आहेत. तपोवनच्या नैसर्गिक सुंदर हवेचा आस्वाद ज्यांनी घेतला आहे ते नक्कीच हळहळत आहेत. दीड ते दोन वषार्ंत इथे साधुग्राम वसणार; नंतर त्याचे काय? याचा तर्क कुठलाही सुज्ञ व्यक्ती सांगू शकतो.
बाकी कुंभमेळ्यादरम्यान शहराचे सुशोभीकरण, शहरात स्वच्छता, सुविधा, वाहतुकीची, रहदारीची यातायात यासाठी शासनाचे जे अथक अथांग प्रयत्न असतात त्यासाठी शासनाचा मनापासून आदर वाटतो. त्या काळात शासकीय अधिकारी जे अथक अथांग परिश्रम घेतात त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. या सर्व अधिकार्‍यांना मनःपूर्वक सलाम. त्यादरम्यान नागरिकदेखील शासनात जमेल तितकी मदत करतात. कुठे अन्नदान तर कधी निवार्‍यास जागा, तरुण मुले (आणि मुलीसुद्धा) स्वयंसेवक स्नानार्थींच्या मदतीसाठी गंगेत कमरेइतक्या पाण्यात साखळी करून तासन् तास उभे असतात. या सर्वांच्या कार्याला मनापासून सलाम. पाणीपुरवठा, वीजपुरवठा सुयोग्य पद्धतीने सजगतेने डोळ्यात तेल घालून करणार्‍या यंत्रणेलाही मनापासून सलाम.
फक्त यंदा वृक्ष कत्तलीला आळा घातला किंवा वड, पिंपळ यांसारख्या स्थानिक झाडांचे आदरणीय साधू-संतांकडूनच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि संवर्धन केले तर हा महाकुंभ संपूर्ण जगासाठी अविस्मरणीय ठरेल.
’नरवर कृष्णासमान’ याप्रमाणे ’तरुवर ईश्वरासमान’ मानले तर मानवाच्या सुंदर, सुसह्य, दीर्घायुष्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन नक्कीच वरदान असेल.

    – सुजाता येवले

 

Then godlike

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

भाजीपाला खरेदीसाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले

सिडको : प्रतिनिधी भाजीपाला खरेदीसाठी पायी जात असलेल्या 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि…

7 minutes ago

शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावली

सिडको : प्रतिनिधी जेवण झाल्यानंतर घरासमोर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या 72 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची…

15 minutes ago

मालेगावात प्रतिबंधित औषधांचा साठा जप्त

तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…

22 minutes ago

तरुणाचा आयफोनचा हट्ट; संभाजीनगरात संपले कुटुंब!

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…

27 minutes ago

राज्यातील पोलीस ठाण्यांच्या रचनेत मोठे बदल

सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…

38 minutes ago

‘पॅलेट गन’प्रकरणी गुन्हा दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…

50 minutes ago