संपादकीय

संघर्षाचा प्रवास

– गणपत हाडपे

गोदाकाठचा आमदार गोकुळ गिते

राजकारण म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर समाजसेवेचे प्रभावी माध्यम. या विचाराला कृतीत उतरवणारे नाव म्हणजे गोकुळ गिते. तळागाळातील सामान्य कार्यकर्ता ते विधान परिषदेचे आमदार असा त्यांचा प्रवास संघर्ष, जनसंपर्क आणि सातत्यपूर्ण समाजसेवेची साक्ष देणारा आहे.
गोकुळ गिते यांना समाजसेवेचा वारसा कुटुंबातूनच लाभला. आध्यात्मिक वातावरण, उत्तम संस्कार आणि वडिलोपार्जित शेती व्यवसायामुळे त्यांची जडणघडण ग्रामीण संस्कृतीशी जोडलेली राहिली. त्यांचे काका दिगंबर गिते यांनी राजकारणात निर्माण केलेली ओळख आणि जनतेशी असलेले घट्ट नाते याचा प्रभाव त्यांच्या कार्यपद्धतीवरही दिसून येतो.
शेती हा मूळ व्यवसाय असला तरी जनसेवेची ओढ त्यांना सतत लोकांमध्ये घेऊन गेली. प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. स्पष्टवक्तेपणा, सखोल अभ्यास, संयमी नेतृत्व आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ते प्रथमच बिनविरोध संचालक झाले. त्यानंतर दुसर्‍यांदा आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवून आपल्या नेतृत्वाची छाप पाडली. संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा यामुळे त्यांचे राजकीय स्थान अधिक मजबूत झाले.
गोकुळ गिते यांनी सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही उल्लेखनीय काम केले आहे. विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, साधू-संतांना सहकार्य आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांना आदराचे स्थान मिळाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांशी त्यांनी जपलेले सौहार्दपूर्ण संबंध ही त्यांच्या राजकारणाची मोठी ताकद मानली जाते. मतभेद असले तरी मनभेद नसावेत, या भूमिकेमुळे ते सर्वपक्षीय नेत्यांमध्ये स्वीकारार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांचे बंधू गणेश गिते यांनी नाशिक महानगरपालिकेत केलेल्या उल्लेखनीय कामाचा वारसा पुढे नेत गोकुळ गिते यांनीही लोकाभिमुख राजकारणाला प्राधान्य दिले. सहकारी बँकेच्या माध्यमातून अनेक होतकरू आणि गरजू युवकांना व्यवसायासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देत स्वावलंबनाचा मार्ग खुला करण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध राहणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. गावोगाव फिरून लोकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, ही त्यांची कार्यशैली जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करून गोकुळ गिते यांनी विधान परिषदेत प्रवेश केला. या विजयामुळे निफाड तालुक्याला आमदार दिलीप बनकर यांच्यासोबत आणखी एक सक्षम प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यामुळे विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आमदार दिलीप बनकर आणि आमदार गोकुळ गिते यांच्या नेतृत्वाखाली निफाड तालुका कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात नवी झेप घेईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. निफाडचा कॅलिफोर्निया हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी हे दुहेरी नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे. तळागाळातील कार्यकर्त्यापासून विधान परिषदेच्या सभागृहापर्यंतचा गोकुळ गिते यांचा प्रवास हा जिद्द, समाजसेवा आणि लोकविश्वासाचा प्रवास आहे. आगामी काळातही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत विकासाला नवी दिशा देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आशेने पाहिले जात आहे.

A Journey of Struggle

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

7 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

7 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

8 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

8 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

8 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

8 hours ago