महाराष्ट्र दिनाचा सूर्य मावळण्याआधीच दोन अल्पवयीनांवर झालेल्या भीषण अत्याचार आणि खुनांच्या घटनांमुळे पुणे जिल्हा हादरला. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका 65 वर्षीय नराधम व्यक्तीने आपल्या नातीच्या वयाच्या अवघ्या चारवर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केला. चाकणजवळील म्हाळुंगे येथे एका सोळा वर्षांच्या परप्रांतीयाने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा खून केला.
महाराष्ट्रदिनीच घडलेल्या या दोन भीषण घटनांनी केवळ पुणे जिल्हाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. नसरापूर आणि चाकणमधील घटना मानवतेला काळिमा फासणार्याच आहेत. या घटनांनी तळपायाची आग मस्तकात गेली असून, संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. नसरापूरमधील नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत.
शनिवारी (दि.2) रात्री नसरापूर व परिसरातील संतप्त नागरिकांनी पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर ठिय्या आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संतप्त नागरिकांनी आंदोलन मागे घेतले असले, तरी नागरिकांचा रोष कमी झालेला नाही. नसरापूरमधील घटनेने महाराष्ट्र हळहळला असून, मानवतेला काळिमा फासणार्या या घटनेने राज्यात महिला तसेच मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अर्थात, महाराष्ट्रात घडलेली ही पहिलीच घृणास्पद घटना नाही. मागील काही वर्षांत तर अशा घटनांची मालिकाच सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी बदलापूर येथील शाळेत चार वषार्ंच्या चिमुरडीवर शाळेतीलच एका कर्मचार्याने बलात्कार करून खून केला. या घटनेनंतरही संपूर्ण महाराष्ट्रात असा उद्रेक पाहायला मिळाला होता. त्याआधीही महाराष्ट्रात अशा अनेक घृणास्पद घटना घडल्या की, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. कोपर्डीची घटना तर अजूनही ताजीच आहे. अर्थात, वर उल्लेख केलेल्या घटना या फक्त प्रातिनिधिक आहेत. अशा घटना आपल्या राज्यात दररोज घडत असतात. दररोजच्या वर्तमानपत्रांत महिला अत्याचाराची एकतरी घटना वाचायला मिळतेच. घटना घडून गेल्यावर शासनाकडून घटनेच्या चौकशीचे आणि पोलिसांकडून आरोपींना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन दिले जाते.
घटना घडून गेल्यानंतर आरोपींना पकडून शिक्षा देण्यापेक्षा महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत. नसरापूर प्रकरणात आरोपी असलेल्या नराधमाने याआधीही अशा घृणास्पद घटना केल्याची बाब समोर आली आहे. पोक्सो कायद्यांंतर्गत त्याला तुरुंगाची वारी करावी लागलेली आहे. पोक्सो कायद्यासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या नराधमास अशा प्रकारे मोकळे सोडले तर तो पुन्हा असा प्रकार करू शकतो, हे माहीत असूनही त्याला तुरुंगाच्या बाहेर का सोडण्यात आले? असा प्रश्न पडतो. पोक्सो प्रकरणात तुरुंगाची वारी भोगूनही हा नराधम पुन्हा तेच कृत्य करतो आणि एका चिमुरडीचा जीव घेतो याचाच अर्थ या नराधमांना कायद्याचा धाक उरलेला नाही. कायद्याचा धाक नसल्यानेच हे नराधम असे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. कायद्याचा धाक नसल्यानेच दिवसाढवळ्या महिलांची, मुलींची अब्रू लुटून त्यांची हत्या करण्याची नराधमी प्रवृत्ती अलीकडे जोर धरू लागली आहे. दिवसाढवळ्या अशाप्रकारचे नराधमी कृत्य करण्याची हिंमत या नराधमांमध्ये निर्माण होते, याचाच अर्थ या नराधमांना कायद्याचा आणि सुरक्षा यंत्रणांचा धाक राहिला नाही. आपण कितीही मोठा गुन्हा केला तरी कायदा आपले काहीही करू शकत नाही, पैशाच्या जोरावर आपण कायदा आणि सुरक्षा यंत्रणांना वाकवू शकतो अशीच धारणा या नराधमांची झाली आहे. म्हणूनच ते असे मानवतेला काळिमा फासणारे कृत्य करत आहेत. शिव, शाहू, फुले व डॉ. आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना शोभनीय नाहीत. पुरोगामी महाराष्ट्राला खाली मान घालायला लावणार्या या घटना आहेत. महिलांकडे उपभोगी वस्तू म्हणून पाहण्याची पुरुषी मानसिकता वाढू लागली आहे. हीच मानसिकता यामागे कारणीभूत आहे.
शिव, शाहू, फुले व डॉ. आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आज कोणतीच महिला सुरक्षित नाही मग ती तीन वर्षाची चिमुरडी असो की, सत्तर वर्षाची आजी. शाळा, कॉलेज, कामाचे ठिकाण, सार्वजनिक ठिकाण, सार्वजनिक वाहन, स्वतःचे घर इतकेच काय, तर पोलिस स्टेशनदेखील महिलांसाठी सुरक्षित नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी ही लाजिरवाणी बाब आहे. पूर्वी अशा घटनांसाठी बिहार, उत्तर प्रदेश ही राज्ये प्रसिद्ध होती. आता त्यात महाराष्ट्राची भर पडते की काय, अशी शंका येऊ लागली आहे. महाराष्ट्राचा बिहार, उत्तर प्रदेश होऊ नये यासाठी सरकारने आणि पोलिस दलाने महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात. तसेच संबंधित गुन्ह्यात दोषी आढळणार्या नराधमांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी. तसे झाले तरच राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांना आळा बसेल आणि पुरोगामी महाराष्ट्र ही महाराष्ट्राची ओळख कायम राहील.
An incident that tarnishes humanity
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…
ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…
नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…
माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…