पोटनिवडणुका नेहमीच चर्चेत असतात. वेगवेगळ्या कारणांनी पोटनिवडणुका घ्याव्या लागतात. विद्यमान लोकप्रतिनिधीचा राजीनामा, लोकप्रतिनिधीला न्यायालयाने अपात्र ठरविणे, लोकप्रतिनिधीचे निधन, अशी काही कारणे पोटनिवडणुकीची असतात. लोकप्रतिनिधीचे निधन झाले असेल तर होणार्या पोटनिवडणुकीत दिवंगत लोकप्रतिनिधीच्या घरातील व्यक्तीला संबंधित राजकीय पक्षाकडून उमेदवारी दिली जाते. साहानुभूती म्हणून त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन संबंधित राजकीय पक्षाकडून इतर पक्षांना केले जाते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून दिवंगत लोकप्रतिनिधीच्या घरातील उमेदवाराला सर्वच पक्ष वेळप्रसंगी पाठिंबा देतात. काही वेळा अपक्ष उमेदवार व लहान पक्ष रिंगणात उडी घेत असल्याने पोटनिवडणूक बिनविरोध होत नाही. आजच्या घडीला महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुका बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व बारामतीचे लोकप्रतिनिधी अजित पवार यांचे विमान अपघातात 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाल्याने पोटनिवडणूक घेण्याची वेळ आली. राहुरीचे भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे 17 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले. त्यामुळे पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत उमेदवारी माघारीची मुदत संपल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. राहुरीत बिनविरोध निवडणूक करण्याचे प्रयत्न कमी पडले. बारामतीत पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकारण तापविण्यात आले. बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी दुःखात असताना शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री झाल्या. हा मुद्दा उपस्थित करून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पोटनिवडणूक लढविण्याची घोषणा केली, तेव्हापासून बारामती तापायला लागली. हाके यांनी नंतर माघार घेतली. महायुतीतील भाजपा व शिवसेना यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिलाच होता. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीत उमेदवार द्यायचा नाही, असे आधीच ठरवून टाकले होते. दुसरीकडे, आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी सुनेत्रा पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून औपचारिक चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी सहानुभूती म्हणून पाठिंबा देऊन टाकला. सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही दूरध्वनी करून पाठिंबा मागितला होता. सपकाळ यांनी लगेच निर्णय घेतला नाही. दरम्यान, राज्यपातळीवर काँग्रेसने बारामतीची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन आकाश मोरे यांना उमेदवारी दिली. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला. काँग्रेसला निवडणूक लढविण्याचा अधिकार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी आकाश मोरे यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करून काँग्रेसचा डाउनफॉल सुरू झाल्याची टिप्पणी केली. यावर सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसच्या योगदानाची आठवण करून दिली. पार्थ पवार यांच्या
विधानावर पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले तेव्हा त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, ‘मला असं वाटतं की, राजकारणामध्ये काही महत्त्वाच्या निर्णयांवर स्टेटमेंट करायला एकप्रकारची परिपक्वता लागते. ती कितपत आहे, हे आज मी सांगू शकत नाही.’ पार्थ पवारांनी लहान तोंडी मोठा घास घेतला, असाच शरद पवार यांच्या विधानाचा अर्थ. काँग्रेसने बारामतीत उमेदवार दिला, त्यावर पार्थ यांनी भाजपाच्या सुरात प्रतिक्रिया व्यक्त करण्याची गरज नव्हती. बारामतीचे राजकारण पवार घराण्याभोवती फिरणारे आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची (शरद पवार) सून आणि सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या दादांची पत्नी म्हणून हे राज्य सांभाळण्याची ताकद मला नक्कीच मिळेल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. शरद पवार यांच्या पक्षाने उमेदवार दिला नाही म्हणून त्यांनी सुप्रिया सुळे यांचे आभारही मानले. अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल एफआयआर दाखल करण्याचे आश्वासन मिळावे, अशी अट काँग्रेसने घातली होती. पण नंतर काँग्रेसने आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेतली. हा निर्णय दिल्लीतून झाल्याचे दिसते. आमचा भाजपाला विरोध आहे म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माघारीनंतर सांगितले. भाजपा हा महायुतीतील सर्वांत मोठा पक्ष आहे. याच पक्षाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असून, त्यांच्याकडे गृहखाते आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सातत्याने करीत आले आहेत. शेवटी त्यांनी कर्नाटकात जाऊन एफआयआर दाखल केला. कर्नाटकात काँग्रेेसचे सरकार आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असूनही एफआयआर दाखल का होत नाही? हाच प्रश्न काँग्रेस उपस्थित करून भाजपाला निशाण्यावर घेत आहे. रोहित पवार यांची यापेक्षा वेगळी भूमिका नाही. काँग्रेसचे आकाश मोरे रिंगणात असते, तरी सुनेत्रा पवार यांचाच विजय झाला असता. काही अपक्ष उमेदवार रिंगणात असले, तरी महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांचा मार्ग सुकर आहे. त्यांना अप्रत्यक्षरीत्या महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. पवारांच्या बारामतीत करामती होत असताना राहुरीत पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. बारामतीत सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. तसे आवाहन त्यांनी शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्याबाबतीत केले नाही. शरद पवार यांनी प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी राहुरीत पक्की केली होती. भाजपाने तनपुरे यांनाच गळाला लावण्याचा प्रयत्न केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. तनपुरेंची मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करवून देण्यात आली. त्यामुळे आता प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर तनपुरे यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने शरद पवार यांनी शेवटच्या क्षणी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली. बारामतीत सुनेत्रा पवार यांचा अपक्षांशी सामना असून, राहुरीत अक्षय कर्डिले आणि मोकाटे यांच्यात चुरशीची लढत होईल. बारामतीच्या बाबतीत सुप्रिया सुळे यांनी ज्या काँग्रेसच्या योगदानाची आठवण करून दिली त्या काँग्रेसचा पाठिंबा राहुरीत मोकाटे यांना मिळेल. राहुरीत सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महायुती म्हणून भाजपाला पाठिंबा देण्याची असेलच. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग सोपा असला, तरी राहुरीत भाजपासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान आहे. राहुरीत काँग्रेसचा पाठिंबा मिळावा म्हणूनच सुप्रिया सुळे यांनी बारामतीच्या बाबतीत बोलताना काँग्रेसच्या योगदानाची महती पार्थ यांच्या लक्षात आणून दिली, असे म्हणता येते.
Baramati-Rahuri
‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…
अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…
बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…
पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…