औद्योगिक सांडपाण्यामुळे ग्रामस्थ संतप्त; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
सिन्नर : प्रतिनिधी
माळेगाव औद्योगिक वसाहतीतून नाल्यांद्वारे येणारे दूषित पाणी सरदवाडी धरणात मिसळत असून, त्यामुळे 5 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतावरच संकट ओढावले आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
लोणारवाडी, जामगाव, पास्ते, सरदवाडी आणि भाटवाडी या गावांच्या पाणीपुरवठा योजना सरदवाडी धरणावर अवलंबून आहेत. सध्या धरणात मृत साठा शिल्लक असतानाच माळेगाव बंधार्यात जमा होणारे सांडपाणी व औद्योगिक दूषित पाणी नाल्यांमार्फत धरणात पोहोचत आहे. बहुतेक कंपन्यांनी अंडरग्राउंड पाइप टाकून त्यातून हे पाणी माळेगाव परिसरातील नाल्यात सोडले आहे. तेच पाणी थेट सरदवाडी धरणात पोहोचत असल्याने धरणातील शिल्लक पाणीसाठा प्रदूषित होत असून, परिसरातील विहिरींनाही केमिकलयुक्त पाणी उतरले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे पाच गावांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि माळेगाव ग्रामपंचायत यांना तातडीने पत्र पाठवून दूषित पाण्याला अटकाव घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संबंधित यंत्रणांनी त्वरित कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
आंदोलनाचा इशारा
सरदवाडी धरणावर अवलंबून असलेल्या पाच गावांतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. दूषित पाण्याचा प्रवाह तातडीने बंद करून जबाबदारांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाटवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोज महात्मे, लोणारवाडीचे सरपंच डॉ. सदाशिव लोणारे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.
अनेक वर्षांपासूनचा प्रश्न
ग्रामस्थांच्या मते, माळेगाव औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी) प्रभावीपणे न वापरता दूषित पाणी थेट नाल्यांमध्ये सोडत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे प्रदूषित पाणी सरदवाडी धरणात पोहोचत असून, पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत आहे. यापूर्वीही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या, मात्र दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
Contaminated water enters Sardwadi dam; Drinking water crisis for five villages
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…