भारत आणि पाकिस्तान यांच्या क्रिकेट सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले जाते. दोन्ही देश एकमेकांचे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी असल्याने दोन्ही देशांतील तिकीटप्रेमींच्या अंगात क्रिकेटज्वर भरतो. जितेगा भाई जितेगा, अशा घोषणा दोन्ही बाजूंकडून दिल्या जातात. दोन देशांतील सामन्याला प्रेक्षकांची कमतरता नसते. याशिवाय, क्रीडावाहिन्या अॅप्लिकेशन्सवर क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळलेल्या असतात. भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे यजमानपद भूषवत असलेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील गटातील साखळी सामन्यात भारताविरुद्ध खेळण्यास पाकिस्तानने नकार दिला होता. भारतात आपल्या खेळाडूंच्या जीवितास धोका पोहोचू शकतो, हे कारण देत बांगलादेश सरकारने त्यांच्या संघाविरुद्धचे सामने श्रीलंकेत घेण्याची मागणी केली होती. ती नाकारण्यात आल्याने बांगलादेशने स्पर्धेतून अंग काढून घेतले. बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला. दुसरीकडे, पाकिस्तानने बांगलादेशच्या मागणीला पाठिंबा दिला होता. पाकिस्ताननेही भारताविरुद्धच्या श्रीलंकेतील सामन्यावर बहिष्कार घातला होता. दोन पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी यांच्यात सामना होणार की नाही, हा प्रश्न उपस्थित झाला होता. ‘टी-20 विश्वचषकाचे राजकारण’ या मथळ्याखाली याच सदरात भारत-पाकिस्तान सामन्याविषयी विवेचन करून पाकिस्तानला होणार्या नुकसानीचा अंदाज व्यक्त केला होता. भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घातल्यास होणार्या परिणामांचा विचार करून पाकिस्तानने आपला निर्णय मागे घेतला. यामुळे 15
फेब्रुवारी रोजी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे दोन पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमींना या सामन्याची पर्वणी पाहायला मिळणार आहे, तर जगभराचे या लढतीकडे लक्ष असेल. स्पर्धेला वादविवादाचे आणि राजकारणाचे गालबोट लागले. त्याला पाकिस्तानच जबाबदार आहे. भारत आणि पाकिस्तान एकमेकांच्या देशात जाऊन क्रिकेट खेळत नाहीत. त्रयस्थ देशात मोठ्या स्पर्धांत हे देश आमनेसामने येतात. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला या स्पर्धेमध्ये सहभाग घेता यावा म्हणून ही स्पर्धा संयुक्तपणे भरवण्यात आली. नाहीतर ही स्पर्धा फक्त भारताच्या मैदानांवरच खेळवली जाणार होती. पाकिस्तानची सोय व्हावी म्हणून श्रीलंकेला सहयजमान करण्यात आले. असे असतानासुद्धा बांगलादेशला पाठिंबा देताना पाकिस्तानने क्रिकेटच्या मैदानात राजकारणाचा आखाडा भरवला होता. सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध चांगले नाहीत. या पार्श्वभूमीवर आयपीएलमधील लिलावामध्ये एका बांगलादेशी खेळाडूला सहभागी करून घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला विरोध दर्शवला होता. या खेळाडूला त्या लिलावातून आणि आयपीएलमधून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर किंवा प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशने आम्ही भारतात ‘टी-20 विश्वचषक’ स्पर्धा खेळायला जाणार नाही, अशी घोषणा केली. सुरक्षेच्या कारणावरून आम्ही भारताचा दौरा करणार नाही, आमचे सामने इतरत्र नियोजित करावेत, अशी बांगलादेशची मागणी होती. पण ऐनवेळी ते शक्य नसल्याने आयसीसीने बांगलादेशला या स्पर्धेतूनच बाजूला काढले आणि त्यांच्या जागी दुसर्या देशाला संधी दिली. खरेतर हा विषय येथेच संपत असताना पाकिस्तानने बांगलादेशला पाठिंबा देत आम्हीसुद्धा भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही, अशी घोषणा केली होती. या निर्णयाचा पाकिस्तानलाच फटका बसणार होता. साखळीत पाकिस्तानला गुण गमवावे लागले असते, प्रायोजकांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक दंडही लावला गेला असता, एखादा संघ न पटणार्या एखाद्या कारणासाठी या स्पर्धेत सहभागी झाला नाही तर तो करार भंग मानला जातो आणि सर्व प्रायोजकांकडून अशा संघाविरोधात आर्थिक नुकसानभरपाईची मागणी केली गेली असती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच सर्वांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारा सामना असतो. जाहिरातदार ब्रॉडकास्ट कंपन्या सर्वांसाठीच हा सामना म्हणजे कमाईची मोठी संधी असते. पण पाकिस्तानने ऐनवेळी असा निर्णय घेतल्यामुळे सर्वांना मोठ्या प्रमाणात उत्पन्नाला मुकावे लागले असते, तर त्याची भरपाई पाकिस्तानकडूनच वसूल केली गेली असती. याव्यतिरिक्त शिस्तभंग केल्याचे कारण देऊन आयसीसीकडूनसुद्धा पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले गेले असते. भारताविरुद्ध काही भूमिका घेतली तर पाकिस्तानी लोकांचा पाठिंबा मिळतो, याचा विचार करून पाकिस्तान सरकारने भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला होता. होणार्या परिणामांचा विचार करून पाकिस्तानने माघार घेऊन सामना खेळण्याचा निर्णय घेतला. भारताविरुद्ध आगामी टी-20 विश्वचषकातील सामना न खेळल्यास पाकिस्तानला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकणार होते. तरीही पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी मतावर ठाम राहत भारताविरुद्ध न खेळण्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. जवळपास गेले 10 दिवस विविध नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. आर्थिक स्थितीचा विचारही हा निर्णय घेताना पाकिस्तानला करावा लागला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अशी 2027 पर्यंत केलेल्या करारानुसार भारत-पाकिस्तान यांच्यातील कोणतेही सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाही टी-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे होणार आहे. तसेच पाकिस्तान त्यांचे सर्व सामने श्रीलंकेतच खेळणार आहे. आयसीसीला जागतिक स्पर्धेत सर्वाधिक महसूल हा भारत-पाकिस्तान सामन्याद्वारे मिळतो. पाकिस्तानने ही लढत न खेळल्यास आयसीसी त्यांना स्पर्धेतून पूर्णपणे बाहेरदेखील करू शकली असती. त्याशिवाय, पाकिस्तानला प्रक्षेपणकर्ते स्टार स्पोर्ट्स समूहाला नुकसानभरपाई द्यावी लागणार होती. बांगलादेशप्रमाणेच त्यांच्यावरही द्विराष्ट्रीय मालिकांवर निर्बंध आले असते. पाकिस्तानला मोठा फटका पडण्याची शक्यता होती. भारताविरुद्धच्या लढतीदरम्यान तसेच लढतीनंतर खेळाडूंनी हस्तांदोलन करावे, अशी मागणी पीसीबीने केली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ती फेटाळून लावली. तसेच, भारताविरुद्ध द्विराष्ट्रीय अथवा तिरंगी मालिका आयोजित करण्याची पाकिस्तानची मागणीही फेटाळण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वार्षिक महसुलातील हिस्सा वाढविण्याचीही मागणीही
फेटाळण्यात आली. भारताविरुद्ध सामना खेळण्यासाठी अटी घालून, त्या मंजूर करून घेण्यातही पाकिस्तानला यश आले नाही. भविष्याचा विचार करून त्यांनी भारताविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला. शेवटी पाकिस्तानला ताठा सोडावा लागला. क्रिकेट जिंकले, पाकिस्तान हरले, असे दिसत आहे. रविवारी भारताविरुद्ध जिंकण्याचे खरे आव्हान त्या देशासमोर आहे. रविवारी होणार्या सामन्याचा निकाल काहीही
लागला तरी दोघांनाही सुपर एट गटात (आठ उत्कृष्ट संघ गट) दोन्ही संघांना सहज प्रवेश मिळणार आहे. याचे कारण अ गटात दोन्ही देशांव्यतिरिक्त अमेरिका, नामिबिया, नेदरलँड्स हे अत्यंत कमकुवत संघ आहेत.
Cricket won, Pakistan lost!
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik