अग्रलेख

‘कॉकरोेच’ भावनिकतेने घेऊ नका!

कॉकरोच जनता पार्टीची (सीजेपी) देशभरात मोठी चर्चा आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीत निरीक्षण नोंदविताना झुरळांचा उल्लेख केला. त्यावरून ’सीजेपी’ या उपहासात्मक डिजिटल संघटनेची स्थापना झाली. देशातील बेरोजगार तरुणांना झुरळाशी जोडले गेल्यानेच अभिजित दीपके नावाच्या तरुणाने स्थापन केलेल्या या पार्टीला तरुणांचा अमाप प्रतिसाद मिळाला, तसा विरोधही झाला. या पार्टीची सोशल मीडिया खाती का आणि कोणाच्या सांगण्यावरून बंद करण्यात आली, याविषयी कोणताही समर्पक खुलासा नसला, तरी तरुणाई बेभान झाली तर तिला आवर घालणे कठीण जाईल, असा विचार केला गेला असावा. सीजेपीच्या विरोधात काही मंडळींनी थेट भूमिका घेऊन कारवाईची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ज्या सरन्यायाधीशांनी एका खटल्यात झुरळांचा उल्लेख केला होता, त्याच सरन्यायाधीशांनी सीजेपीविरोधातील याचिकेला महत्त्व दिले नाही. सीजेपी उपक्रम आणि बनावट वकिलांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी त्या याचिकेत करण्यात आली होती. या विषयाला इतके भावनिकतेने घेऊ नका, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि. 25 मे रोजी) केली. सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या पीठाने याचिकाकर्त्यांचे वकील एन. के. गोस्वामी यांना या मुद्द्याकडे इतक्या भावनिकतेने न पाहण्यास सांगितले. सरन्यायाधीशांनी यापूर्वी स्पष्टीकरण दिले असतानाही सोशल मीडियावर अद्याप एक विकृत आणि द्वेषयुक्त कथानक पसरवले जात आहे, असा युक्तिवाद वकील गोस्वामी यांनी केला. या गोष्टी इतक्या मनाला लावून घेऊ नका, असे मत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी मांडून याचिकेला विशेष महत्त्व दिले नाही. याच प्रकरणात दुसर्‍या एका वकिलाने बनावट पदव्यांच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. तसेच न्यायालयातील अंतर्गत संभाषणाचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी केला जाऊ शकत नाही, असा युक्तिवादही केला. यावर सरन्यायाधीशांनी महत्त्वपूर्ण विधान केले- यात एवढी कोणतीही मोठी आणीबाणी किंवा घाई नाही. आम्ही यावर नंतर विचार करू. या विधानातून सीजेपीला महत्त्व देण्याचे कारण नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तोंडी टिप्पण्यांचा व्यावसायिक गैरवापर करणार्‍यांवर कारवाई करण्याची आणि बनावट पदव्यांच्या आधारे वकिली करणार्‍यांची चौकशी करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली होती. न्यायालयातील टिप्पण्यांचा वापर प्रसिद्धी मोहिमांसाठी केला जात आहे, असेही याचिकेत म्हटले होते. दि. 15 मे रोजी एका वकिलाला ’वरिष्ठ वकील’ दर्जा देण्याबाबतच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी झुरळे आणि परजीवी असा उल्लेख केल्याचा वाद समोर आला होता. सरन्यायाधीशांच्या टिप्पणीचा वापर प्रसिद्धी आणि व्यावसायिकतेसाठी करण्यात आला, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे असले, तरी सीजेपीला मिळालेला अमाप प्रतिसाद याचिकाकर्त्यांच्या डोळ्यांत सलत असल्याचे दिसत आहे. आपल्या टिप्पणीवर मत व्यक्त करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचे सरन्यायाधीशांनी फार काही न बोलता अप्रत्यक्षरीत्या मान्य केल्याचे दिसते. समाजात आधीच असे काही परजीवी आहेत, जे व्यवस्थेवर हल्ला करतात. तुम्हाला त्यांच्याशी हातमिळवणी करायची आहे का? काही बेरोजगार तरुण हे झुरळांसारखे असतात, ज्यांना नोकर्‍या मिळत नाहीत आणि आपल्या व्यवसायात स्थान मिळत नाही. ते नंतर माध्यमे, सोशल मीडिया किंवा माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात आणि प्रत्येकावर हल्ला करू लागतात, असे विधान सरन्यायाधीशांनी केले होते. यावर त्यांनी नंतर खुलासाही केला होता. सीजेपीचा संस्थापक अभिजित दीपके याला धमक्याही देण्यात आल्या. त्याने आपल्या अधिकृत खात्यावरून छायाचित्र प्रत शेअर करत दावा केला की, त्याला एका संदेश अनुप्रयोगावरून अनोळखी क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अभिजितवर विदेशी निधीसंदर्भात गंभीर आरोप करण्यात आले. सीजेपीचे 49 टक्के अनुयायी पाकिस्तानी असल्याचा थेट आरोप करण्यात आला. मात्र, या आरोपांना कोणताही आधार नाही. एखादी चळवळ उभारी घेत असेल तर तिच्यावर बेलगाम आरोप होत असतातच. धमक्यांमुळे अभिजितच्या कुटुंबाची चिंता वाढली. आपल्या मुलाने या राजकीय चिखलफेकीत न पडता केवळ स्वतःच्या कारकीर्द आणि नोकरीवर लक्ष केंद्रित करावे आणि सुरक्षितपणे घरी परत यावे एवढीच आमची अपेक्षा आहे, अशी भूमिका त्याच्या पालकांनी घेतली. सीजेपीचे फारसे मनावर घेऊ नका, असे सरन्यायाधीशांनी म्हटले असले, तरी अभिजितने एका उपक्रमातून तरुणांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. कॉकरोचचा विषय संपला, संपविला किंवा त्याला महत्त्व दिले नाही, तरी तरुणांच्या डोक्यात घुसलेला कॉकरोेच बाहेर काढणे अवघड आहे. कॉकरोेचला महत्त्व द्यायचे की नाही, मनावर घ्यायचे की नाही, हे ज्याने- त्याने ठरवावे. सीजेपीची बीजे सरन्यायाधीशांच्या टिप्पणीत रोवली गेली. त्याच सरन्यायाधीशांनी हे प्रकरण इतक्या भावनिकतेने घेऊ नका, असे सांगून या प्रकरणावर पडदा टाकताना कॉकरोेचचे समर्थन करणार्‍यांना आणि विरोध करणार्‍यांनाही कोठेही महत्त्व दिले नाही. घरातील कॉकरोचवर उपाय म्हणून अनेक पर्याय आहेत. मात्र, तरुणांच्या डोक्यात शिरलेला कॉकरोेच बाहेर काढण्यासाठी कोणता उपाय करणार? सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सीजेपीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना याचिकाकर्त्याला हे प्रकरण इतक्या भावनिकतेने घेऊ नका, असा सल्ला दिला. या वक्तव्याने झुरळासंबंधीचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. खुद्द सरन्यायाधीशांनीच भावनिकतेने घेतले नसते तर झुरळांसाठी झाकण उघडले गेले नसते. या एका वाक्यात न्यायव्यवस्थेची प्रगल्भता दिसते, पण त्याचबरोबर समाजातील खोलवर रुतलेली निराशा आणि संतापही उघड होतो. सीजेपी ही सोशल मीडियावरील उपहासात्मक चळवळ असल्याचे मान्य केले, तरी तिने तरुणांच्या मनातील जोश बाहेर आणला आहे. तरुणांच्या अस्वस्थतेची दखल घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

 

Don’t take ‘cockroaches’ emotionally!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago