विशेष मुलाखत
– देवयानी सोनार
सायबर गुन्हे, अमली पदार्थ, महिला सुरक्षा आणि सिंहस्थ नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य
नाशिक जिल्ह्याची ओळख कृषिप्रधान जिल्हा म्हणून असली, तरी बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीसह ग्रामीण भागातील गुन्हेगारीचे स्वरूपही झपाट्याने बदलत आहे. जमिनीचे आणि पाण्याचे वाद, शेतकर्यांची आर्थिक फसवणूक, वाढते सायबर गुन्हे, महिलांवरील अत्याचार, अमली पदार्थांचे वाढते जाळे आणि पर्यटनस्थळांवरील गुन्हे ही नाशिक ग्रामीण पोलिसांसमोरील प्रमुख आव्हाने आहेत. या सर्व आव्हानांचा सामना केवळ पोलिस यंत्रणेच्या बळावर नव्हे, तर नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच करता येईल, असा ठाम विश्वास नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दै. गांवकरीला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.
नाशिक शहरात उपायुक्त म्हणून उल्लेखनीय ठसा उमटविल्यानंतर डॉ. स्वामी यांनी नुकतीच नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकपदाची धुरा स्वीकारली आहे. कठोर, संवेदनशील आणि परिणामकेंद्रित कार्यपद्धतीमुळे त्यांनी अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली आहे. भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर अवघ्या बारा तासांत आरोपींना अटक करून त्यांनी पोलिस यंत्रणेच्या तत्परतेचा
प्रत्यय दिला.
आज गुन्हेगारीचे स्वरूप पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. त्यामुळे केवळ गुन्हा उघडकीस आणणे पुरेसे नाही; गुन्हा घडण्यापूर्वीच तो रोखणे हे आधुनिक पोलिसिंगचे खरे उद्दिष्ट आहे, असे डॉ. स्वामी म्हणाले.
शेतीमालाच्या व्यवहारात व्यापार्यांकडून फसवणुकीच्या घटना गंभीरपणे घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रत्येक प्रकरणात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र, व्यवहार करताना शेतकर्यांनी पावत्या, करारपत्रे, बँक व्यवहाराची नोंद आणि इतर कागदपत्रे काळजीपूर्वक जतन करणे अत्यावश्यक आहे. न्यायालयीन प्रक्रियेत याच पुराव्यांच्या आधारे गुन्ह्याचा तपास अधिक भक्कम होतो, असे त्यांनी नमूद केले.
सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती
ग्रामीण भागात सायबर फसवणूक, आर्थिक गुन्हे आणि डिजिटल माध्यमातून होणार्या फसवणुकीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गावागावांत, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, संशयितांवर देखरेख आणि गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्यावर विशेष भर दिला जात आहे.
अमली पदार्थांविरोधात झिरो टॉलरन्स
तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकू नये, यासाठी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला जात आहे. व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगतानाच अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत कठोर कारवाई, सातत्यपूर्ण छापे आणि जनजागृती अभियान राबविले जात आहे. व्यसनमुक्त तरुणाई हीच सुरक्षित समाजाची खरी ताकद आहे, असे ते म्हणाले.
जनता हीच पोलिसांची सर्वांत मोठी ताकद
गुन्हेगारीविरोधातील लढा हा केवळ पोलिसांचा नसून, संपूर्ण समाजाचा आहे, असे सांगताना डॉ. स्वामी म्हणाले, जनता ही साध्या वेशातील पोलिसच आहे. नागरिकांनी वेळेवर माहिती दिली, तर अनेक गंभीर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखता येतात. पोलिस आणि जनता यांच्यातील विश्वासाचे नाते जितके दृढ होईल, तितकी गुन्हेगारीवर प्रभावी लगाम बसू शकेल.
ग्रामीण भागातील गुन्हेगारीची बदलती आव्हाने
महामार्गांवरील अपघात, जमिनीचे व शेतीच्या बांधांचे वाद, पाण्यावरून होणारे संघर्ष, तीर्थक्षेत्रे आणि पर्यटनस्थळांवरील चोरी व जबरी चोरी ही ग्रामीण भागातील प्रमुख आव्हाने असल्याचे त्यांनी सांगितले. अनेकदा किरकोळ वाटणारे शेतीविषयक वाद गंभीर गुन्ह्यांत परिवर्तित होतात. त्यामुळे अशा संवेदनशील प्रकरणांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. पर्यटनस्थळांवर पोलिस गस्त वाढविणे, नाकाबंदी, हॉटेल तपासणी आणि संवेदनशील ठिकाणी पोलिसांची दृश्यमान उपस्थिती वाढविण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा घटना तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन त्यांनी केले.
महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रत्येक प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली जाते. शक्य तितक्या कमी कालावधीत दोषारोपपत्र दाखल करून दोषसिद्धी सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जातात. भरोसा सेल, पोलीस दीदी आणि वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून महिलांना समुपदेशन, कायदेशीर मदत आणि मानसिक आधार दिला जात आहे. शाळा, महाविद्यालये आणि आदिवासी पाड्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम नियमितपणे राबविले जात असून, महिलांच्या प्रत्येक तक्रारीची संवेदनशीलतेने दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंहस्थासाठी सर्वंकष सुरक्षा आराखडा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरक्षा, वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनाचा सर्वंकष आराखडा तयार करण्यात येत आहे. मुंबई-समृद्धी महामार्ग, जव्हार-मोखाडा-गुजरात, धुळे-मालेगाव आणि संभाजीनगर-पुणे या प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचे स्वतंत्र नियोजन करण्यात येत आहे.
शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहराबाहेर मोठ्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था केली जाईल. तेथून नियोजनबद्ध पद्धतीने वाहनांना प्रवेश दिला जाईल. त्र्यंबकेश्वर आणि प्रमुख घाट परिसरात पर्वणीच्या दिवशी विशेष पोलिस बंदोबस्त, बॅरिकेडिंग आणि क्विक रिस्पॉन्स टीम तैनात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिस दल सक्षम असेल तर समाज अधिक सुरक्षित राहील
पोलिस कर्मचार्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सक्षम राहावे, यासाठी नियमित प्रशिक्षण, रिफ्रेशर कोर्स, वैद्यकीय तपासण्या आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविले जात आहेत. महिला कर्मचार्यांच्या समस्यांवर विशेष लक्ष दिले जात असून, पुरुष कर्मचार्यांसाठी हृदयविकार व नेत्रतपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑल हँड्स मीट या उपक्रमातून कर्मचार्यांच्या समस्या थेट ऐकून त्यांचे तातडीने निराकरण केले जाते. उत्कृष्ट कामगिरी करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते.
सुरक्षित, सजग आणि गुन्हेमुक्त नाशिक ग्रामीण हेच ध्येय
पोलिस यंत्रणा आणि नागरिक यांच्यातील परस्पर विश्वास, संवाद आणि सहकार्य हीच सुरक्षित समाजाची खरी गुरुकिल्ली आहे. सिंहस्थाच्या काळात वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, प्रशासनाला सहकार्य करा आणि कोणतीही संशयास्पद बाब तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणा. जनसहभागातूनच सुरक्षित, सजग आणि गुन्हेमुक्त नाशिक ग्रामीण घडविणे शक्य आहे, असे ते म्हणाले.
Effective control of crime is impossible without public participation.
- अॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…
- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…
- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…
आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…
परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…
फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…