हॉर्मुझ सामुद्रधुनी आणि ओमानच्या आखातात अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीदरम्यान भारतीय खलाशी असलेल्या तीन व्यापारी जहाजांवर हल्ले झाले. त्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला. या घटनेने भारत-अमेरिका मैत्रीच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. अमेरिका-इस्रायलने 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर हवाई हल्ले केल्यापासून पश्चिम आशियात तीव्र झालेल्या संघर्षाचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसला. खनिज तेल आणि गॅसच्या किमती भडकल्या. त्यातच इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला. मात्र, इराणने आपल्या मित्र देशांना विशेषतः भारत व चीनला, सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला. सामुद्रधुनी बंद केली गेल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पित्त खवळले. सामुद्रधुनी खुली केली नाही, तर गंभीर परिणामांचा इशारा त्यांनी इराणला दिला. इराणला नमविण्यासाठी त्यांनी सामुद्रधुनीत नाकेबंदी करण्याचा इशारा दिला होता. नाकेबंदीसाठी युरोपियन देशांनी आखातात जहाजे तैनात करण्याचे आवाहन ट्रम्प यांनी केले होते; परंतु फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ‘तुमचे तुम्ही पाहून घ्या’, असे युरोपियन देशांना बजावत ट्रम्प यांनी हात वर केले होते आणि नाकेबंदी सुरू केली. सामुद्रधुनी खुली व्हावी, अशी भूमिका भारताने घेतलेली आहे. दरम्यान, 8 एप्रिल 2026 रोजी पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा तात्पुरता युद्धविराम जाहीर झाला आणि 21 एप्रिल 2026 रोजी ट्रम्प यांनी तो अनिश्चित काळासाठी वाढवला होता. तथापि, जून 2026 मध्ये पुन्हा दोन्ही बाजूंकडून हल्ले झाल्याने हा करार धोक्यात आला आहे. नवा शांतता करार करण्यास इराण तयार असल्याचा दावा ट्रम्प करत आहेत; परंतु इराणकडून प्रतिसाद मिळत नसल्याचेही दिसत आहे. याच तणावादरम्यान ओमानच्या आखातात तैनात असलेल्या अमेरिकन जहाजांकडून नाकेबंदी म्हणून व्यापारी जहाजांवर हल्ले होत आहेत. ओमानच्या आखातात भारतीय खलाशी असलेल्या तीन जहाजांवर अमेरिकेने हल्ले केले. एमटी मॅरिव्हेक्स या तेलवाहू जहाजावर 8 जून रोजी हल्ला झाला. जहाजावर 24 भारतीय खलाशी होते. अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली, पण ओमानच्या हवाई दलाने हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्व 24 भारतीय खलाशांना सुखरूप वाचवले. 10 जून रोजी एमटी सेटेबेलो या तेलवाहू जहाजाच्या इंजिन रूमला अमेरिकन लढाऊ विमानाने लक्ष्य केले. या जहाजावरील 24 भारतीय खलाशांपैकी 21 जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला. एमटी जलवीर या जहाजावर 11 जून रोजी हल्ला झाल्यानंतरही सर्व वीस भारतीय खलाशी सुदैवाने पूर्णपणे सुरक्षित राहिले. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाजांना लक्ष्य करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला असल्याने याबाबत भारताने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. ओमानच्या किनारपट्टीवर भारतीय खलाशी असलेल्या व्यापारी जहाजांवर अमेरिकन सैन्याने केलेले हे प्राणघातक हल्ले अनुचित असल्याचे स्पष्ट करीत भारताने शुक्रवारी (दि.12 जून) अमेरिकेचे दिल्लीतील प्रभारी राजदूत जेसन मिक्स यांना पुन्हा समन्स बजावून तीव्र आक्षेप नोंदवला. अमेरिकेच्या या कारवाईत एका टँकरवरील तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याचे सरकारने स्पष्ट केल्यानंतर, दुसर्याच दिवशी मिक्स यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात पाचारण करण्यात आले होते. यापूर्वी बुधवारी (दि. 10 जून) रात्रीही मिक्स यांना समन्स बजावण्यात आले होते. या हल्ल्यांंमुळे आधीच तीन निष्पाप भारतीयांना आपला जीव गमवावा लागला आहे, जो अत्यंत क्लेशदायक आणि टाळता येण्याजोगा होता, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, भारताने नोंदवलेल्या निषेधाची दखल अमेरिकेने फार गांभीर्याने घेतली नाही. उलट हल्ल्यांंचे समर्थन केले, ही चिंताजनक बाब आहे. व्यापारी जहाजांवरील हल्ले इराणविरुद्धच्या सागरी नाकेबंदीचा भाग असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. ज्या जहाजांवर अमेरिकेने क्षेपणास्त्रे डागली, ती जहाजे या नाकेबंदीचे उल्लंघन करत होती आणि भारताची नसून विदेशी ध्वजाची होती, असे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले. भारताच्या मालकीच्या जहाजांवर हल्ले केलेले नाहीत, असा अमेरिकेचा दावा आहे. ज्या जहाजांवर (उदा. एमटी मॅरिव्हिक्स, एमटी सेटेबेल्लो, एमटी जलवीर) हल्ले झाले, ती विदेशी ध्वज लावून चालत होती आणि अमेरिकेने प्रतिबंधित केलेल्या यादीतील होती, असाही अमेरिकेचा दावा आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांनी व्यापारी जहाजांवरील लष्करी कारवाईचा अभिमान व्यक्त केला, तसेच या तणावाच्या काळात होर्मुझ सामुद्रधुनीतून बाहेर पडणार्या भारतीय जहाजांवर इराणने ड्रोन हल्ले केल्याचा प्रत्यारोपही केला. आंतरराष्ट्रीय सागरी वाहतूक मार्ग मुक्त ठेवण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. मात्र, अमेरिकेची भूमिका दुटप्पी असल्याचे दिसत आहे. हल्ले झालेली जहाजे भारतीय नव्हती, असे सांगत असतानाच अमेरिका त्या हल्ल्यांंचे समर्थनही करत आहे आणि त्याच वेळी इराणने भारतीय जहाजांवर हल्ले केल्याचा कांगावाही करत आहे. भारत हा आपला मित्र आहे, असे म्हणणार्या अमेरिकेने दुटप्पी भूमिका घेऊन एकप्रकारे भारताचा विश्वासघातच केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताने व्यापारी जहाजांवर झालेल्या तिन्ही हल्ल्यांंचा निषेध केला आणि असे हल्ले थांबले पाहिजेत, हे ठणकावून सांगितले, पण अमेरिकेवर काहीच परिणाम झाला नाही. व्यापारी जहाजावरील हल्ल्यांचे अमेरिकेने कितीही समर्थन केले, तरी हे हल्ले हेतुपुरस्सर घडवून आणले जात आहेत का, असा संशय घेण्यास जागा आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतापुढे अनेक समस्या आधीच उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यात व्यापारी जहाजांवरील या हल्ल्यांची भर पडली आहे. आखाती प्रदेशात भारतीय ध्वज असलेली 13 जहाजे आणि 18 हजारांहून अधिक भारतीय खलाशी आहेत. आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीस खलाशी पुरवणारा भारत हा प्रमुख देश आहे आणि एकूण जागतिक खलाशांपैकी 15 टक्के भारतीय आहेत. हॉर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदीचा भाग म्हणून अमेरिकेकडून व्यापारी जहाजांवर असे हल्ले होत राहिले, तर भारतीय जहाजे आणि खलाशी यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत भारताने जागतिक मंचावर अमेरिकेला जाब विचारला पाहिजे. हल्ल्यात मृत्यू पावलेल्या तीन जणांच्या कुटुंबीयांना अमेरिकेकडून मदत मिळवून देणे आणि हल्ल्याच्या निष्पक्ष आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणीही भारताने करायला हवी. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले निकटचे मित्र म्हणवतात. त्यामुळे मोदी यांनीही ट्रम्प यांच्याकडे या हल्ल्याबाबतची नाराजी स्पष्टपणे व्यक्त करायला हवी. अमेरिकेने इराणला आर्थिक कोंडीत पकडण्यासाठी हे पाऊल उचलले असले, तरी त्यामुळे भारताचे नुकसान होत असून, भारतीय खलाशी धोक्यात सापडले आहेत. भारत व इराण एकमेकांना मित्र मानतात. अमेरिका व भारताचेही मैत्रीचे संबंध आहेत आणि भारत इस्रायललाही आपला मित्र मानतो. युद्धजन्य परिस्थितीत या मैत्रीचा कुठेतरी फायदा व्हायला पाहिजे. इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला, पण नाकेबंदीचा भाग म्हणून अमेरिकाच भारतीय जहाजांना सोडत नसेल, तर अमेरिका-भारत मैत्रीला अर्थ नाही!
Friendship is meaningless!
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…