संपादकीय

लाइक, शेअर आणि कमेंट

आजचे युग हे ‘लाइक, शेअर आणि कमेंट’चे आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आजची तरुण, प्रौढ आणि थोडीफार वयस्क मंडळी दिवसातील किमान एक तास तरी घालवत आहेत. आवडलेल्या पोस्टला, व्हिडीओला किंवा रीलला लाइक करणे, शेअर करणे अथवा कमेंट करणे, हे नित्याचे झाले आहे. अभिव्यक्तीचा हा बदलता फॉर्म आता सर्वांच्या अंगवळणी पडू लागला आहे.
मनापासून आवडलेली पोस्ट असेल तर लाइक करणे सहज होते. मात्र, न आवडलेल्या गोष्टीलाही लाइक करून पोस्ट टाकणार्‍याची मर्जी राखावी लागते. पूर्वी पारावर बसून लोक समोरासमोर गप्पा मारायचे. मनातील विचार मोकळेपणाने मांडायचे. एखादी कथा किंवा कल्पना सर्वांना सांगायचे. घडलेला प्रसंग कथन करायचे. आपले मत मनापासून व्यक्त करून समोरच्या सगळ्यांवर प्रभाव टाकायचे. बोलण्यातून आणि हावभावातून त्या व्यक्तीचा खरेपणा समजायचा. आज मात्र सगळे काही नाटकी झाले आहे. तीस सेकंदाचा स्वतःचा रील बनवून अनेक जण लोकांना सहज वेड्यात काढतात. तंत्रज्ञानाचा वापर करून रिटेक घेऊन तयार केलेला व्हिडीओ पाहणार्‍याचे मन सहज बदलवू शकतो. प्रत्यक्ष भेटींपासून खलिता, घोडेस्वार, कबुतर, पत्र, फोन, मोबाइल, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम अशी साधने वापरत माणूस वेगाने बदलत चालला आहे.आता लोक एकमेकांशी ऑनलाइन भांडतात. फेसबुक व इन्स्टाग्रामवर एकमेकांच्या कुळाचा उद्धार करतात. अंगावरचे कपडे काढून डोक्याला गुंडाळून लोक एकमेकांवर जहरी कमेंट्स करतात. व्हॉट्सअ‍ॅपवर झालेली भांडणे प्रत्यक्ष मैदानात उतरतात आणि दंगली भडकतात. एखाद्या पोस्टवर टाकलेल्या कमेंटवर पुन्हा कमेंट्स येतात आणि त्यातून एकमेकांना ’पाहून घेऊ’ अशी भाषा वापरली जाते. जात, धर्म, वंश, भाषा, राजकीय विचारसरणी या सगळ्या विषयांवर लोक तावातावाने, अतार्किक पद्धतीने व्यक्त होतात. एखाद्याचे मनोबल खच्ची करण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्याच्या सोशल मीडियाच्या वॉलवर नको त्या शब्दांत कमेंट करणे, हे आजचे प्रभावी अस्त्र बनले आहे. मॉर्फ करून तयार केलेले व्हिडीओ समाजात अशांतता निर्माण करू शकतात. एआयचा वापर करून बनवलेले व्हिडीओ एखाद्याला आयुष्यातूनच उठवू शकतात. लाइक, कमेंट आणि शेअर यांच्या माध्यमातून समाजात आनंद, प्रेम, शांतता आणि भाईचारा पसरवायचा की, अशांतता, हे आता समाजाच्या हातात आहे. 1990 च्या दशकात जन्माला आलेल्या अनेकांच्या डोळ्यांसमोर जन्मानंतर लगेचच कॉम्प्युटरचा स्क्रीन आणि इंटरनेट आले. ही पिढी आज 25 ते 30 वर्षांची असून, करिअर आणि सोशल मीडियात गुंतलेली आहे. त्यांच्या पाठोपाठ आलेली 15 ते 25 वयोगटातील तरुण पिढी ज्या अनुभवांतून जगते, त्यांचा गंधही 45 ते 70 वयोगटातील जुन्या पिढीला नाही. त्यामुळे या ‘जेन- झी’ पिढीला समजून घेणे आणि त्यांच्या अभिव्यक्तीच्या नव्या ट्रेंडला योग्य दिशा देणे, हेच वयस्कर पिढीसमोरील खरे आव्हान आहे. तंत्रज्ञान थांबणार नाही. बदलही थांबणार नाही. मात्र, ‘लाइक, शेअर आणि कमेंट’ या छोट्याशा कृतीमागे असलेली जबाबदारी प्रत्येकाने ओळखली, तर हाच सोशल मीडिया समाजजोडीचा मजबूत पूल ठरू शकतो.

Like, share and comment.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

16 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

24 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

29 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

35 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

41 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

55 minutes ago