♦ मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
♦ अनेक गावांचा संपर्क तुटला
♦ शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर
मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र अक्षरशः जलमय झाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. सलग पडणार्या या पावसामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रायगडमध्ये पावसाचा हाहाकार सुरू आहे. अंबा, कुंडलिका, पाताळगंगासह उल्हास नद्यांनी धोका पातळी ओलांडली. मुंबई-गोवा महामार्ग रविवारी (दि. 5) पूर्णतः ठप्प होता.
मुंबईसह ठाणे, पालघर, कल्याण-डोंबिवली तसेच कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी नद्यांना पूरदेखील आले आहेत. दरम्यान, मुंबईत पावसाची संततधार सुरूच आहे. अशातच सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना सोमवार म्हणजे उद्या, दि. 6 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईसह ठाणे जिल्ह्यातदेखील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली, बदलापूरमध्येदेखील शाळा- महाविद्यालयांना उद्या (दि. 6) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईत विक्रोळी, पवई, भांडुप आणि अंधेरीसह अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. विशेषतः विक्रोळीत सर्वाधिक सुमारे 263 मि.मी. पावसाची नोंद झाली. खबरदारीचा उपाय म्हणून अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. नालासोपारा आणि इतर स्थानकांवर ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या 15 ते 30 मिनिटे उशिराने धावल्या.
मुंबईच्या शेजारील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतही पावसाने हाहाकार उडवला. ठाण्यातील वंदना टॉकीज, घोडबंदर रोड, कळवा आणि मुंब्रा या सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. पालघर जिल्ह्यात नद्यांना आलेल्या पुरामुळे वसई, सफाळे आणि मनोर भागात रस्ते बंद झाले होते, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या.
वसई-विरार हद्दीतील सकवार आणि मांडवी गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या तब्बल 19 जणांची आपत्कालीन यंत्रणांकडून सुखरूप सुटका करण्यात आली.
रायगडात पाणी शिरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. कर्जत, नागोठणे, खोपोली, रोहा या शहरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. चिपळूणच्या जुना बाजार पुलाला नदीचे पाणी टेकले आहे. समुद्राला भरती असल्यामुळे वाशिष्टी नदीच्या पुराची चिंता वाढली आहे. याशिवाय, पुण्यातील मावळ तालुक्यातही मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. पुण्यात दोन दिवसांत तब्बल 30 झाडपडीच्या घटना घडल्या, यात वाहनांचं मोठे नुकसान झाले. शहरात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.
झाड कोसळून दोघांचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले, रस्त्यांवर पाणी साचले आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली, ज्यात आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. पहाटेपासूनच अंधेरी, विरार, माटुंगा, पवई यांसारख्या अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी साचले असून, त्यामुळे स्थानिकांना ये-जा करणेही अवघड झाले. पूर्व उपनगरांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला, त्यामुळे शहर आणि उपनगरांमध्ये 250 हून अधिक झाडे आणि त्यांच्या फांद्या उन्मळून पडल्या. कुर्ला पश्चिम येथील एका सरकारी शाळेजवळ झाड कोसळल्याने युनूस कुंडवाला नावाच्या 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर आरे कॉलनीत हसन रझा नावाच्या अठरा वर्षीय तरुणाचा झाड कोसळून मृत्यू झाला. दरम्यान, साकीनाका येथे गटारात पडून एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनांनी पालिकेच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
लोणावळा, माथेरानमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद
मुंबईजवळील पर्यटन स्थळे असलेल्या लोणावळा आणि माथेरान या शहरांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. लोणावळ्यात 24 तासांत 267 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, जो या हंगामातील सर्वाधिक पाऊस आहे. डोंगर आणि झर्यांच्या हिरवळीमुळे संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून, निसर्गाचे हे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक पोहोचले आहेत. यावर्षी आतापर्यंत लोणावळा आणि आसपासच्या परिसरात 1,090 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर गेल्या वर्षी 2,392 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र, शेतकर्यांच्या पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये दिलासा
मुसळधार पावसानंतर महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील पाणीटंचाईची समस्या कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईसोबतच नवी मुंबई, पालघर, ठाणे, कोल्हापूर, रायगड आणि लोणावळा यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पाणी साचले होते आणि वाहतूक कोंडी झाली होती, तर अनेक जिल्ह्यांमध्ये 24 तासांत 100 मिमी ते 400 मिमी पावसाची नोंद झाली. नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे तुर्भे रेल्वे स्टेशनखाली पाणी साचले होते, त्यामुळे प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागले.
पालीच्या अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरले
रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू ठेवली आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या आणि नाले ओसंडून वाहत असून, सखल भागात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच रायगडमधील प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली येथील ऐतिहासिक श्री बल्लाळेश्वर देवस्थानच्या मुख्य मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. गेल्या काही तासांत झालेल्या ढगफुटीसदृश आणि अतिमुसळधार पावसामुळे पाली शहरासह मंदिर परिसराला पुराच्या पाण्याने वेढलें आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील मुख्य सभागृहात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे स्थानिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे.
Maharashtra inundated; normal life disrupted by heavy rains.
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik