मुंबई/नवी दिल्ली : प्रतिनिधी
उत्तर भारतात मोसमी पावसाचे (मान्सून) आगमन झाले असले तरी महाराष्ट्रात मान्सूनने आता खर्या अर्थाने वेग घेतला आहे. राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी)ने 1 जुलै 2026 रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी पावसाचा अत्यंत महत्त्वाचा ’रेड अलर्ट’ जारी केला आहे. या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जून महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने आता जुलैच्या सुरुवातीलाच कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. विशेषतः मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्यासाठी सुट्टी जाहीर केली आहे.
राज्यातील या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्याच्या घटना समोर येत आहेत. मुंबईतील अंधेरी सब-वेसह नवी मुंबई आणि नालासोपारा येथील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र, दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणारा पवई तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू (ओव्हरफ्लो) लागल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. केवळ कोकणच नव्हे, तर बुलढाणा जिल्ह्यासह राज्याच्या इतर भागांतही पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. बुलढाण्यातील ढालसावंगी गावात अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले असून मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात असाच पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली असल्याने प्रशासनाकडून सर्व नागरिकांना सतर्कतेचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणार्या प्रमुख जलस्रोतांपैकी एक महत्त्वाचा असलेला पवई तलाव 1 जुलै 2026 रोजी पूर्ण क्षमतेने भरून दुथडी भरून वाहू (ओव्हरफ्लो) लागला आहे. तलाव क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे अपेक्षेपेक्षा लवकर जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून, यामुळे शहरावरील आगामी काळातील पाणीटंचाईचे संकट काही प्रमाणात दूर झाले आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी
भिवंडी तालुक्यात तासन्तास पडणार्या पावसाचा परिणाम मुंबई-नाशिक महामार्गावर स्पष्टपणे दिसून येत आहे. अपूर्ण बांधकाम, खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे. मुंबईच्या दिशेने जाणार्या मार्गावर राजनोली, पिंपळनेर आणि मानकोलीपासून खारीगाव टोल नाक्यापर्यंत सुमारे सात ते आठ किलोमीटरची वाहतूक कोंडी झाली आहे. ट्रक, बसेस, खाजगी वाहने आणि इतर गाड्या या कोंडीत अडकल्या होत्या. सततच्या पावसामुळे दृश्यमानता कमी झाली असून, रस्ते अपघातांचा धोका वाढला आहे. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत होते. प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील पाच दिवस मुसळधार
भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. प्रशासनाने नागरिकांना केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याचा, पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहण्याचा आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
पालघरमधील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरसदृश स्थिती आणि सुरक्षितता लक्षात घेता पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना 1 जुलै 2026 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली. दुसरीकडे, मुंबई आणि पुणे शहरांमध्ये सातत्याने होत असलेल्या पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईतील चेंबूर भागात काल एका स्कूल बसवर झाड कोसळले. त्यात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सखल भागातील पूरस्थिती आणि वाहतूक कोंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Rainfall intensity has increased in the state.
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…