संपादकीय

पाणी वाचवा-पाणीबाणी टाळा!

पूर्वी कधीही न अनुभवलेला उकाडा यंदा राज्यातील नागरिकांना सहन करावा लागला. तारखेनुसार पावसाळा सुरू झाला असला तरी आज जून महिना अर्धा संपला, तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे राज्यातील नागरिकांसह पशु-पक्षीही हैराण झाले आहेत. उष्माघाताने यंदा अनेक पशु- पक्ष्यांंचा बळी घेतला. काहींच्या मते यंदा राज्यात अभूतपूर्व दुष्काळ अनुभवायला मिळणार आहे. भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. पाण्याचे दुसरे नावच जीवन आहे.
पाण्याविना जगणे केवळ असह्य आहे. केवळ पिण्यासाठीच नव्हे, तर कपडे धुणे, भांडी घासणे, दैनंदिन स्वच्छता यांसाठी पाण्याला पर्याय नाही. पाण्याचा एकमेव स्रोत म्हणजे पाऊस आणि तोच लांबल्याने पाणी पुरवठ्याची सर्व गणिते कोलमडू लागली आहेत, त्यामुळे अनेक शहरी भागांत पाणीकपात सुरू आहे. काही भागांत एक दिवसाआड, तर काही भागांत आठवड्यातून एकदा पाणी पुरवले जात आहे. वाढती लोकसंख्या, शहरांत सुरू असलेली विकासकामे यांमुळे उपलब्ध पाणीसाठ्यावर प्रचंड ताण येत असतो. उन्हाळा सुरू झाला की राज्य तसेच जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी पाणी वाचवण्याचे आवाहन करण्यात येते. आगामी काळात जगायचे असेल, तर आज पाण्याची बचत करणे अनिवार्य झाले आहे. बर्‍याचदा शेजारीपाजारी अन्य कोणी पाण्याची बचत करताना दिसत नाही. मग मीच का पाणी वाचवावे, असा विचार मनात येतो. मात्र, शेजारची व्यक्ती पैशाची उधळपट्टी करते म्हणून त्याचे पाहून आपण ती करत नाही. कारण पैशाचे महत्त्व, पैसे वाचवण्याचे महत्त्व, पैसे कमावण्यासाठी लागणारी मेहनत याबाबतची जाण आपल्या प्रत्येकाला आहे.
आज पाणी सहज उपलब्ध होत आहे याचा अर्थ भविष्यातही ते सहज उपलब्ध होईलच असे नाही. त्यामुळे पाण्याच्या बचतीचे महत्त्वही आपण लक्षात घ्यायला हवे. आपल्या लहानसहान कृतीतून पाण्याची बचत आपल्याला करता येते. पाणी वाचवणे म्हणजे अस्वछ राहणे असे मुळीच नव्हे. आपल्या दैनंदिन स्वच्छतेसाठी उदा. आंघोळ, तोंड धुणे, हात धुणे आणि अन्य स्वच्छतेसाठी किती पाणी आपण व्यय करतो, हे प्रत्येकाला ज्ञात असते. त्यामध्येही उन्हाळ्यात जर आपण शॉवरचा वापर करत असू तर बादलीचा वापर करून कित्येक लिटर पाणी आपण वाचवू शकतो, हात धुताना हाताला हँडवॉश अथवा साबण लावेपर्यंत आपण नळ चालूच ठेवत असू तर तो बंद करायला हवा. कपडे आणि भांडी धुतानाही हाच नियम पाळूया. भांड्यांना साबण लावताना नळ बंद ठेवूया. पिण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी घेऊया, जेणेकरून पाणी पिऊन झाल्यानंतर पेल्यात उरलेले पाणी अन्यत्र टाकावे लागणार नाही. कपडे धुण्यासाठी व भांडी घासण्यासाठी शक्य असल्यास काही दिवस यंत्राचा वापर न करता हाताने धुण्याचा प्रयत्न करूया. घरातील एखादा नळ बिघाड झाल्याने त्यातून पाणी गळत असेल, तर तो तत्परतेने दुरुस्त करून घेऊया. झाडांना आवश्यक तेवढेच पाणी देऊया. एखाद्या ठिकाणी पाइपलाइनमधून पाण्याची गळती होत असेल तर त्वरित पाणी खात्याला कळवून त्याठिकाणी दुरुस्ती करून घेऊया. पाणी वाचवण्याचे महत्त्व आपल्या घरातील लहानग्यांनाही सांगूया. आपण जर सोसायटीत राहत असू तर सोसायटीची मीटिंग घेऊन पाणी वाचवण्याचे प्रयत्न सामूहिकपणे करण्याचा प्रयत्न करूया! पाण्याला जीवन असे म्हटले जाते. फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये महागडे जेवण जेवल्यानंतरही ते पचण्यासाठी जेवणानंतर किमान ग्लासभर पाणी तरी आपल्याला हवेच असते.
पाण्याविना जीवनाची आपण कल्पनाही करू शकत नाही. काही देशांमध्ये पाणीटंचाईमुळे इंधनाच्या दरात पाणी विकले जात असल्याच्या बातम्या आजवर आपण वाचल्या आहेत. आज आपण पाणी नाही वाचवले तर भविष्यात भारतातही अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठी पाणी वाचवण्याची सवय आतापासून अंगवळणी पाडूया! ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे आणि ज्या प्रमाणात पाण्याचा व्यय होत आहे ते पाहता उपलब्ध जलसाठे दरवर्षी अपुरेच पडतात. गेल्या काही वर्षांचा अंदाज घेता हवामान खाते आणि पाऊस यांचे गणित कधी जुळताना दिसत नाही. त्यामुळे यंदाही पुरेसा पाऊस पडेल याची काहीच शाश्वती नाही. राजकीय मंडळींकडून महाराष्ट्र राज्य समृद्ध पथावर असल्याचे कितीही सांगण्यात येत असले, तरी राज्याच्या काही भागांतील नागरिकांना दरवर्षी भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. पाच-सहा किलोमीटर अंतर पायपीट करून पाणी आणावे लागते. पाण्याच्या एका थेंबासाठी
दरवर्षी कितीतरी पशु-पक्ष्यांचा बळी जातो. भगवंताच्या कृपेमुळे आपल्याला पुरेसे पाणी मिळते. त्याबद्दल आपण कृतज्ञ राहूया आणि आतापासूनच पाणी बचतीची सवय स्वतःला व आपल्या कुटुंबाला लावून घेऊया जेणेकरून भविष्यात पाणीबाणी निर्माण झालीच तर तिचा सामना आपल्याला समर्थपणे करता येईल.

Save water—avoid a water crisis!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

9 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

9 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

9 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

9 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

9 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

9 hours ago