प्रतिमा

तिला स्ट्राँग व्हावं लागतं…

– रेश्मा देशमुख

गर्दी तशीच होती… आवाज तसाच होता…
पण त्या सगळ्यातही ती एकटीच उभी होती.
चेहऱ्यावर हसू… डोळ्यांत शांतता… आणि मनात एक न बोललेला गोंधळ…कधी कधी वाटतं…ती हसते तेव्हा खरंच आनंदी असते का…?की ते हसूही तिनं सरावाने शिकलेलं असतं…?
“तिच्या डोळ्यांत समुद्र आहे… पण ओठांवर हसू आहे…”
ती strong आहे म्हणे…हो, आहेच. पण त्या ‘strong’ असण्यामागे किती तुटलेले क्षण दडलेत…हे कुणाला दिसतं का…? ती सगळ्यांसाठी उभी राहते…घरासाठी, नात्यांसाठी, स्वप्नांसाठी…
पण जेव्हा तीच आतून कोसळते…तेव्हा तिच्यासाठी कुणीच नसतं…
“ती तुटते… पण आवाज करत नाही…”
त्या दिवशी पाऊस खूप होता…
रस्ते ओले झाले होते… आणि मनही…
ती ऑफिसमधून घरी परतत होती…
नेहमीसारखीच — शांत, स्थिर, ‘strong’…
घरी पोहोचल्यावर तिनं दरवाजा बंद केला…
आणि अचानक सगळं बदललं…
हातातली बॅग खाली पडली…
आणि ती स्वतःही…
पहिल्यांदाच
ती खूप वेळ रडली…
कोणासाठी नाही…
कोणाला दाखवण्यासाठी नाही…
फक्त स्वतःसाठी…
त्या अश्रूंमध्ये तिचं सगळं साचलेलं दुःख होतं…
न बोललेले शब्द… अपूर्ण अपेक्षा… आणि थकलेलं मन.. प्रश्न विचारत होत स्त्री ला च का स्ट्रॉंग राहावं लागत….
“ती शांत दिसते म्हणून समजू नका ती निश्चल आहे,
तिच्या डोळ्यांत लपलेली वादळं कुणालाच कधी दिसत नाहीत…”
पहाट अजून डोळे चोळत असते, सूर्य अजून क्षितिजावर यायचा असतो… आणि ती मात्र आधीच उठलेली असते. स्वयंपाकघरातल्या भांड्यांचा आवाज म्हणजे तिच्या दिवसाची सुरुवात… फोडणी च्या धुरासोबत तिची स्वप्नंही कुठेतरी विरघळत जातात.
दिवस भर रांधा वाढा उष्टी काढा.. पार लाहान मुलां पासून तर म्हाताऱ्या लोकांना पर्यंत सगळ्यांची मर्जी सांभाळायची.. त्यांच्या आवडी निवडी जपत जपत
जगण्यासाठी जगणं नव्हे, तर इतरांसाठी जगणं हेच तिचं खरं अस्तित्व.. म्हणून
स्वतः च अस्तित्वच विसरून जायच तरी स्ट्रॉंग रहायचं.. घरच सगळं आवरून स्वयंपाककरून बाकीच्यांच्या हातात देता देता स्वतः एक घास पोटात ढकलनं तर दूर पण, तोंडाला लावलेला चहा चा अर्धा कप ऑफिस ला वेळ होतो म्हणून तसाच खाली ठेवते, आपल्या आयुष्याला विश्रांती नाही ,अस मनातल्या मनात मानायचं अन त्यासाठी स्ट्रॉंग रहायचं.
मर मर करत ऑफिस मध्ये यायचं, आपल्याला दिलेलं काम पण सिन्सियर पणे वेळेत करायच आणि जरा कुठे मन हलक करायला मैत्रिणींशी बोललं तर पुरुषांचे टोमणे ऐकायचे “ह्या बायका नुसत्या गप्पा मारता, गॉसिप करतात यांना काही कामाच नको.. ह्या बायकांना काय कळत”. हे ऐकून सुद्धा मनाला होणारा त्रास सहन करायचा व “कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना…” अस म्हणत स्ट्रॉंग रहायचं. वर्क लोड त्यात सुट्टी च टेन्शन असतांना घरून फोन येतो की “उदया पाहुणे येणार आहे त्यांच्या पाहुणचारा साठी सुट्टी टाकायची. नसलं जमत तर काही गरज नाही. काम सोडून घरी रहा” हे ऐकल्यावर घर व ऑफिस यांच्या कात्रीत सापडलेल्या ती ने अवंढा गिळून हळूच ‘हो’ म्हणायचं. पण डोळ्यातून एक टिपूर न गळता स्ट्रॉंग रहायचं… ओठांवर हसू ठेवून ती जगत राहते,
मनातल्या वेदनांना मात्र शांतपणे झाकत राहते…
बायको मुलांना सोडून जबाबदारी ढकलून नवरा जेव्हा स्वतःच तोंड काळ करून त्यांना वाऱ्यावर सोडून कायमच निघून जातो, तेव्हा त्या आईला निरागस चिमुकल्या डोळ्यातले प्रश्न वाचता येत असूनही जेव्हा उत्तर देता येत नाही तेव्हा त्या प्रश्नाचे चटके सहन करत हृदयात दडलेले त्या हजारो वादळांचे आवाज शांत करत तिने स्ट्रॉंग रहायच. ‘कमवू तेव्हा खाऊ’ अशी परिस्थिती असतांना जेव्हा त्या ओल्या बाळंतीणी ला ते एवढुस लेकरू थंडी वाऱ्यात झोळीत ठेवून लगेच पोटा पाण्यासाठी कामाला जुंपाव लागत तेव्हा पोटाच्या खळगी साठी अन त्या तान्ह्या लेकराच्या दुधा साठी तिला स्ट्रॉंग व्हावं लागत. मोल मजूरी करणारी, नाेकरी करणारी, ऑफीसर असो वा गृहिणी असो आपल्या लेकरा साठी “पायात काटे, डोळ्यांत अश्रू, तरी चालत राहते वाट, मातृत्वाच्या बळावर ती जिंकते प्रत्येक आघात…”
खर तर स्त्रीला स्ट्रॉंग राहण्याची वेळ वय बघून येत नाही. कधी कधी आयुष्य इतकं कठोर असतं की ते एका कोवळ्या मुलीलाही वेळेआधी मोठं करून टाकतं. ज्या वयात खेळण्यांशी खेळायचं असतं, त्या वयात काही मुलींना जबाबदाऱ्यांशी खेळावं लागतं. दोरीवर चालणाऱ्या त्या डोंबाऱ्याच्या छोट्याशा मुलीकडे बघितलं की मन सुन्न होतं. खाली पडण्याची भीती, पोटाची खळगी भरण्याची गरज आणि हातात तोल सांभाळण्याची काठी… तिचं आयुष्यही त्या दोरीसारखंच असतं. एका बाजूला बालपण आणि दुसऱ्या बाजूला जबाबदारी. चूक करण्याची मुभा नसते, थांबण्याचा पर्याय नसतो. तिच्या एका चुकीच्या पावलाची किंमत संपूर्ण कुटुंबाला मोजावी लागू शकते. म्हणून चेहऱ्यावर हसू ठेवून, भीती मनात दडवून स्वप्नांच्या रंगीत दुनियेत हरवून जायच्या वयात वास्तवाच्या उन्हाचे चटके सहन करत तिला स्ट्रॉंग व्हावंच लागत. काही दिवसांपूर्वी बातमी वाचली आईच्या निधना नंतर नियतीने अचानक घाला घातला अजून शाळेत शिकणाऱ्या त्या मुलीला, तिच्या तीन भावंडांची आई बनवल. आणि जेव्हा ती आपल्या तान्ह्या भावाला सांभाळायला घरी कोणी नव्हतं म्हणून त्याला कडेवर घेऊन शाळेत पोहोचली. एका हातात पुस्तक आणि दुसऱ्या हातात भावाचं भविष्य… तेव्हा ती खऱ्या अर्थाने अनंत काळाची माता बनली.नियतीने तिच्या हातातून बालपण काढून घेतलं पण त्याच हातात जबाबदारीचं आभाळ ठेवलं. आणि त्या आभाळाचं ओझं पेलतांना तिलाही स्ट्रॉंग व्हावं लागलं…
खरी कसोटी तर तिथे असते जिथं स्त्रीच स्त्री ची शत्रू होते. गोड गोड बोलणाऱ्या त्या चेहऱ्या मागचा खरा कपटी काळा, दुसऱ्याच आयुष्य उध्वस्त करून टाकणारा खरा चेहरा बाहेर येतो तेव्हा पाया खालची जमीन सरकते. विश्वासघाताचा तो आघात शरीरावर नसतो, पण मनाच्या खोल जखमा करून जातो. पण निदान आपले असे दोन चेहरे नाहीत, आणि जाणीवपूर्वक कधी कुणाचं वाईट केलं नाही, ही जाणीव मनाला उभारी देते. मग आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी जमिनीवर खंबीर पाय रोवून पुन्हा तीला एकदा स्ट्रॉंग व्हावं लागतं.”
मग ती स्त्री कुठल्याही स्तरावर ची असो तीला छोटया काय आणि मोठया काय कुठल्याच प्रसंगात रडणं. दुबळ होण तीला अलाऊडच नाही. हा विचार करत असतांना तिचा दृष्टीकोण इतका व्यापक झाला की मोल मजुरी करणाऱ्या स्त्री पासून तर लहान लेकरू पाठीला बांधून लढणाऱ्या झाशी ची राणी लक्ष्मी बाई असो, शत्रूंचा कर्दनकाळ ठरलेल्या वाघाला जन्म देऊन, स्वराज्याचा दीप प्रज्वलित करणाऱ्या मातृशक्तीचे मूर्तिमंत रूप राजमाता जिजाऊ असो, ताकदीसोबत संवेदनशीलतेचं सुंदर संतुलन साधून राज्य करणाऱ्या कठीण परिस्थितीतही डगमग न होणाऱ्या स्त्रीशक्तीचं जिवंत उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर असो,बिकट परिस्थिती मध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या सोबत खंबीर उभ्या राहणाऱ्या रमाई असो, शेण फेकून सुद्धा नेटाने खंबीर आपले कार्य चालू ठेवणाऱ्या ज्योतिबांची शक्ती सावित्री माई असो, तर नवऱ्याने घरातून हुसकून दिल्यावर दुःखाच्या वाढलातून आपल्या विचारांची नाव डगमगू न देता जिद्दीने आयुष्याला सुंदर कळटणी देऊन अनाथांची आई सिंधू ताई सपकाळ असाे. इत्यादी सर्व आदिशक्ती माझ्या डोळ्या समोर आल्या..हया मातांचेच रक्त आमच्या धमण्यांनमध्ये वाहत आहे म्हटल्या नंतर आम्ही तर स्ट्रॉंग असणारच ना. अस म्हणून तीने डोळे पुसले ती पुन्हा तशीच होती…हसरी… आत्मविश्वासी… सगळ्यांसाठी उभी…
वादळांनी तिला झुकवलं असेल, पण मुळांपासून कधीच उपटू शकलं नाही…कारण तिच्या शिरांमधून वाहत होतं त्या रणरागिणींचं रक्त…
म्हणून ती पुन्हा हसली…आणि जगाला आठवण करून दिली—
स्त्रीला स्ट्रॉंग व्हावं लागत नाही,
तीच तर सामर्थ्याचा उगम असते…

 

She has to be strong…

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांच्याऐवजी या नेत्याला, तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…

9 hours ago

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…

2 days ago

त्र्यंबकेश्वरमध्ये अनिर्बंध लॉजिंग बांधकामांना वेग

कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…

2 days ago

‘धाडसत्र’ केवळ ‘दिखावा’ ठरू नये…

ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्‍या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…

2 days ago

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…

2 days ago

इबोलाचा नवा अवतार

इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…

2 days ago