प्रतिमा

रात्रभर जागणारी पिढी

रात्रीचे एक-दोन वाजलेले असतात. घरातले सगळे दिवे बंद असतात. फक्त एका खोलीतून थोडासा अंधुकसा लाइट बाहेर पडत असतो. आईला मध्येच जाग आलेली असते. ती उठते, पाणी पिते आणि सहज मुलाच्या किंवा मुलीच्या खोलीत डोकावून पाहते. हातात मोबाइल असतो. कानात इयरफोन. स्क्रीनवर काहीतरी सुरू असतं. वेळेचं भान हरवलेलं असतं. अजून झोपला नाहीस? आईचा प्रश्न. हो ना पाच मिनिटांत झोपतो. हे पाच मिनिटं मग एक तास होतात. दोन तास होतात आणि शेवटी रात्र संपते.
हे दृश्य आज अनेक घरांमध्ये रोज घडतं आहे. सकाळी दहा-अकरा वाजेपर्यंत झोप. उठल्यावर चहा हातात आणि पुन्हा मोबाइल. शरीर जागं झालेलं असतं, पण दिवसाची लय हरवलेली असते. रात्रभर जागणं, सकाळी उशिरा उठणं, दिवसाची सुरुवातच दुपारच्या सुमारास होणं आणि मग पुन्हा रात्री उशिरापर्यंत मोबाइल, लॅपटॉप किंवा स्क्रीनसमोर बसणं हे अनेक मुलांचं रूटीन बनलं आहे. काळ बदलला आहे, तंत्रज्ञान बदललं आहे, जीवनशैली बदलली आहे. हे सगळं मान्य आहे. पण माणसाच्या शरीराच्या गरजा बदललेल्या नाहीत. शरीराला विश्रांती हवीच असते. मनाला शांत झोप हवीच असते. डोळ्यांना अंधार हवा असतो. मेंदूला पुनरुज्जीवनासाठी वेळ हवा असतो. पण, आजची पिढी जणू स्वतःच्या शरीराशीच स्पर्धा
करत आहे.
आमच्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे वेगळंच जग होतं. रात्री गच्चीवर झोपायचं. तारांकडे पाहत गप्पा मारायच्या. सकाळी सूर्य उगवण्याआधीच जाग यायची. पक्ष्यांचा आवाज याने दिवस सुरू व्हायचा. अंगात उत्साह असायचा. दिवसभर खेळणं, वाचन, भटकंती, गप्पा यात वेळ जायचा. आज अनेक मुलांना सूर्योदय पाहण्याची सवयच राहिलेली नाही. पहाट म्हणजे काय, सकाळची प्रसन्नता म्हणजे काय, पक्ष्यांचा किलबिलाट म्हणजे काय, याचा अनुभवच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.
आणि याचं दुःख फक्त जुन्या आठवणींचं नाही. त्याचा संबंध त्यांच्या आरोग्याशी, मानसिक स्थितीशी आणि भविष्यातील जीवनशैलीशी आहे. पण, आजची पिढी जणू रात्रीला दिवस आणि दिवसाला रात्र मानू लागली आहे.
पालक म्हणून आम्ही हे सगळं पाहत असतो. सुरुवातीला आम्ही सांगतो. खूप प्रेमाने सांगतो. नंतर समजावतो. पुन्हा पुन्हा सांगतो. कधी रागावतो. कधी विनवणी करतो. पण आजकाल मुलांकडेही प्रत्येक गोष्टीचं उत्तर तयार असतं.
आम्हाला माहिती आहे. तुम्ही काळजी करू नका. सगळेच असं करतात. आमच्या जनरेशनचं लाइफ वेगळं आहे. ही उत्तरं ऐकताना पालक शांत होतात. पण, त्यांचं मन मात्र शांत नसतं. कारण अनुभवाने त्यांना माहीत असतं की, शरीरावर अन्याय केला की त्याची किंमत कधीतरी मोजावी लागते.
तुम्हाला काहीच समजत नाही, हे वाक्य पालकांच्या मनाला सर्वाधिक जखम करतं. कारण त्यांना माहिती असतं की, त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मुलांना समजून घेण्यात घालवलं आहे.आई-बाबा मुलांच्या आयुष्यातील शत्रू नसतात.ते त्यांच्या स्वप्नांचे खरे साक्षीदार असतात. त्यांच्या यशासाठी प्रार्थना करणारे पहिले लोक असतात. त्यांच्या अपयशाने आतून तुटणारेही तेच असतात. मुलं आजारी पडली की, रात्रभर जागणारे तेच. मुलांना यश मिळालं की,
स्वतःपेक्षा जास्त आनंदी होणारे तेच. मग ते रात्रभर जागू नकोस असं सांगतात, तेव्हा त्यामागे नियंत्रण ठेवण्याची इच्छा नसते. त्यामागे प्रेम असतं. काळजी असते. अनुभव असतो आणि एक निःस्वार्थ भीती असते. आपल्या मुलाला काही त्रास होऊ नये. पण, सतत समजावूनही जेव्हा काही बदल होत नाही, तेव्हा पालक हळूहळू गप्प होऊ लागतात. मुलांना वाटतं की, आता त्यांना काही फरक पडत नाही. पण, खरं तर त्यांना खूप फरक पडत असतो. फक्त त्यांना कळून चुकलेलं असतं की, आता शब्दांची ताकद संपली आहे. आता अनुभवच शिकवणार आहे.हे गप्प होणं म्हणजे हार नाही. तो एकप्रकारचा दुःखी स्वीकार असतो. ज्यादिवशी पालक बोलणं कमी करतात, त्या दिवशी त्यांच्या मनातली काळजी संपलेली नसते. उलट ती आणखी वाढलेली असते. कारण आई-वडील असणं ही अशी अवस्था आहे की, मुलं पन्नास वर्षांची झाली तरी त्यांची काळजी संपत नाही. कारण जगातलं सर्वांत निःस्वार्थ प्रेम कोणतं असेल तर ते पालकांचं. ते कधी उपदेशाच्या रूपात दिसतं.कधी काळजीच्या रूपात. कधी भांडणाच्या रूपात आणि कधी पूर्णपणे गप्प झालेल्या शब्दांमधूनही ते तितक्याच ताकदीने व्यक्त होत राहतं. त्यांची ही काळजीच त्यांच्या प्रेमाची सर्वांत खरी
भाषा असते.

The generation that stays up all night

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

20 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

20 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

20 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

20 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

20 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

20 hours ago