संपादकीय

शिक्षण क्षेत्राची झालेली दैन्यावस्था

शिकणे ही तर माणसाच्या आयुष्यात निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे. त्यालाच अनौपचारिक शिक्षण असे म्हणतात. नवीन गोष्ट शिकण्यामध्ये ज्याला आनंद मिळतो तो सहसा निराश होत नाही. शिकण्याची वृत्ती असेल तर माणूस प्रसंगातून शिकतो, अनुभवातून शिकतो,सहवासातून शिकतो अशी ही शिकण्याची संधी मिळत असते. शिक्षण क्षेत्र असे जेव्हा म्हणतो तेव्हा औपचारिक शिक्षण, असे अभिप्रेत असते.
साठ-सत्तर वर्षांपूर्वी आपल्या मुलांवर उत्तम संस्कार व्हायला हवेत, असे आईला वाटत असे. चार पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण उत्तम संस्कारांची शिदोरी आपण आपल्या मुलांना द्यायला हवी ,हा विचार प्रबळ होता. ’जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगास उद्धरी’ या वचनावर श्रद्धा होती. त्यामुळे आतासारखे माझे करिअर प्रथम,’ असा विचार नव्हता. काहींनी तर मुले मोठी झाल्यावर आपल्या करिअरकडे लक्ष दिले. संसारासाठी नोकरी करून आर्थिक भार उचलला. लहानपण आईच्या सहवासात गेल्यामुळे साहजिकच मुलांवर उत्तम संस्कार होत असत. एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे सहजीवनाचे धडे घरातच गिरवले जात असत. वयाची सहा वर्षे पूर्ण झाल्यावर मुले पहिल्या इयत्तेत प्रवेश घेत असत. आता परिस्थिती खूपच बदलली आहे. आई- वडील नोकरीनिमित्ताने घराबाहेर असल्यामुळे अगदी लहान मुलेही पाळणारात किंवा सांभाळण्यासाठी ठेवलेल्या आयाबाईच्या ताब्यात असतात. त्यामुळे अभावानेच उत्तम संस्कार होताना दिसतात. सध्या पैसा हेच सर्वस्व आहे, अशी चुकीची धारणा झालेली आहे. सुख हे पैशाने मिळत नसते. समाधानी असणे यात सुख असते.
शाळा हे तर सरस्वतीचे मंदिर! कुंभार जसे मातीच्या गोळ्याला आकार देऊन उत्तम, सुबक मडके घडवतो तसेच शिक्षकांनीही मुलांवर उत्तम संस्कार करून देशाची भावी पिढी घडविण्याचे दायित्व घ्यायला हवे. शिक्षकीपेशा किंवा वैद्यकीय व्यवसाय ही काही पैसे मिळविण्याची साधने नव्हेत, पण सध्या विद्यार्थ्यांना शिकवणे किंवा रुग्णांना बरे करणे हे व्रत न राहता तो एक ’धंदा’ झालेला आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शिक्षण विभागाने पत्रक काढून शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांवर गणवेश किंवा शैक्षणिक साहित्य ठराविक ठिकाणाहून घेण्याची सक्ती करू नये, असे कळविले होते, तरीही अनुदानित शाळा आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएससी) शाळेतूनच शिक्षण साहित्य, पाठ्यपुस्तके घेण्याची सक्ती केली जात आहे, जिल्हा परिषदेच्या शाळांमधून ’वह्या विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही’ या शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. ’नीट’ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात प्राध्यापक आणि आधुनिक वैद्य यांचा सहभाग आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. वाम मार्गाने पदव्या मिळवणार्‍या व्यक्ती कुटुंबाचे, समाजाचे किंवा देशाचे भले करू शकतील का? या चुकीच्या मानसिकतेने ते स्वतःचेही नुकसानच करून घेतील. जसे रात्री नंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र, असे कालचक्र अव्याहत फिरत असते. तसेच सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख असे चक्र चालूच राहते. लोकमान्यांनी आपल्या ’गीतारहस्य’ या प्रसिद्ध ग्रंथात नमूद केले आहे की, राजाची दैनंदिनी जरी बघितली तरीही एक दिवससुद्धा केवळ सुखच मिळाले असे होत नाही. मनुष्य जीवनात संघर्ष अटळ आहे. शिक्षणामुळे धैर्य, चिकाटी, नीतिमत्ता आणि विपरीत परिस्थितीत खचून न जाणे हे गुण जोपासले जात नसतील तर अशा शिक्षणाचा काय उपयोग! ’नीट’ परीक्षा रद्द झाल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली.
आत्महत्या करणे कायद्याने अपराध आहे, तर आध्यात्मिक दृष्टीने महापाप आहे. ईश्वराने प्रदान केलेले आयुष्य संपवण्याचा मानवाला अधिकार नाही. जीवन -संघर्षाला सामोरे जाण्याचे बळ जर शिक्षणातून मिळत नसेल तर त्या शिक्षणाचा काय उपयोग? केवळ ’पोटभरू शिक्षण न देता विद्यार्थ्यांवर श्रम, त्याग, चिकाटी, नीतिमत्ता या गुणांचा संस्कार व्हायला हवा.
दुःखाने खचून न जाता, निराश न होता जीवनाची वाटचाल करायला हवी, हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबायला हवा. हे होण्यासाठी पालक, शिक्षक आणि समाज यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत.

The poor state of the education sector

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

14 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

14 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

14 hours ago