संपादकीय

अवकाळीमुळे अवकळा!

नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेती क्षेत्राला मोठा फटका बसला असून, शेतकरीवर्ग पूर्णपणे संकटात सापडला आहे. आधीच आर्थिक अडचणींनी ग्रासलेल्या शेतकर्‍यांवर आता निसर्गाच्या या अनिश्चित बदलांचा दुहेरी आघात होत आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी आणि आता ऐन उन्हाळ्यात होणारा अवकाळी पाऊस आणि बदलते सरकारचे धोरण या सर्वांमुळे शेती हा व्यवसाय अधिकच अस्थिर आणि धोकादायक बनत चालला असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकर्‍यांवर कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा मारा होत असल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यात शेतीक्षेत्र विकसित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून कांदा, द्राक्ष, फळ, पालेभाज्या यांची मोठ्या प्रमाणात आयात करण्यात येते. मात्र, जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसासह गारपिटीच्या तडाख्याने जिल्ह्यातील तब्बल 10 तालुके प्रभावित झाले. प्राथमिक आकडेवारीनुसार सुमारे 39 हजार 814 शेतकर्‍यांच्या 28 हजार 364 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ही केवळ एका दिवसाची स्थिती असून, मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे एकूण नुकसान आणखी वाढले आहे. 18 मार्च, 29 मार्च आणि 1 एप्रिल रोजी झालेल्या पावसानेही हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त केली होती. रब्बी हंगामातील पिके काढणीच्या टप्प्यावर असताना आलेल्या या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले आहे. गारपीट आणि वादळी वार्‍यांमुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काही ठिकाणी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. काढणीस तयार असलेली गहू, कांदा, डाळिंब यांसारखी पिके मातीमोल झाली आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे वर्षभराचे कष्ट वाया गेले असून, आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.
तालुकानिहाय परिस्थिती पाहिली असता मालेगाव, सटाणा, देवळा, नाशिक, निफाड, सिन्नर आणि चांदवड या भागांना सर्वाधिक फटका बसला आहे. विशेषतः सटाणा तालुक्यातील नुकसान चिंताजनक असून, अनेक गावे मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहेत. सटाणा येथे सुमारे 80 गावे, निफाडमध्ये 79, सिन्नरमध्ये 65, दिंडोरीत 32 आणि मालेगावमध्ये 30 गावे प्रभावित झाली आहेत. या भागातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत.
पीकनिहाय नुकसानीकडे लक्ष दिल्यास कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सुमारे 22 हजार 726 हेक्टरवरील कांदा पिके बाधित झाली आहेत. त्याखालोखाल गहू 1,920 हेक्टर आणि डाळिंब 1,798 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय मका, भाजीपाला, द्राक्षे, वेलवर्गीय पिके, टोमॅटो, पेरू आणि आंबा या पिकांनाही फटका बसला आहे. या सर्व कारणांमुळे शेतकर्‍यांना मिळणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे.
याचबरोबर वातावरणातील बदलांमुळे नवीन संकटेही निर्माण होत आहेत. पहाटेच्या वेळी पडणारे दाट धुके आणि वाढती आर्द्रता यामुळे उरलेल्या पिकांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. विशेषतः कांदा आणि डाळिंब पिकांमध्ये फळगळ, रोगराई आणि कुज येण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे जे थोडेफार पीक वाचले आहे, त्याचेही उत्पादन आणि बाजारभावावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरीवर्ग सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असून, त्यांना तातडीने शासकीय मदतीची आवश्यकता आहे. नुकसानग्रस्त क्षेत्रांचे त्वरित पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देणे ही काळाची गरज आहे. अनेक वेळा पंचनाम्यांमध्ये होणारा विलंब आणि अपुरी मदत यामुळे शेतकर्‍यांना न्याय मिळत नाही, अशी तक्रार वारंवार केली जाते. त्यामुळे प्रशासनाने या वेळी तत्परतेने कार्यवाही करून शेतकर्‍यांना दिलासा देणे आवश्यक आहे.
दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहता हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती व्यवस्थेत बदल करणेही तितकेच गरजेचे आहे. जलसंधारण, पीकविमा योजना प्रभावीपणे राबविणे, हवामान आधारित शेतीपद्धतींचा अवलंब आणि शेतकर्‍यांना तांत्रिक मार्गदर्शन देणे यावर भर दिला पाहिजे. अन्यथा, अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटांचा सामना करणे शेतकर्‍यांसाठी अधिक कठीण होईल.
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील शेतीक्षेत्राला मोठा धक्का दिला असून, शेतकर्‍यांचे आर्थिक, मानसिक आणि सामाजिक जीवन विस्कळीत झाले आहे. या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी तत्काळ मदत, प्रभावी नियोजन आणि दीर्घकालीन उपाययोजना यांची अत्यंत गरज आहे. अन्यथा शेतीव्यवस्थेची परिस्थिती आणखी गंभीर रूप धारण करू शकते.

Unseasonal weather!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

13 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

21 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

26 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

32 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

38 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

52 minutes ago