अग्रलेख

विक्रमवीर पंतप्रधान

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी सलग 12 वर्षे (4,399 दिवस) पूर्ण करून 10 जून 2026 रोजी एक नवा विक्रम रचला. यापूर्वी हा विक्रम भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर होता. नेहरूंनी पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर, म्हणजे 1952 ते 1964 या काळात सलग 4,398 दिवस पंतप्रधानपद सांभाळले होते. स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय इतिहासाला नेहरू आणि इंदिरा गांधी या दोन नेत्यांच्या प्रदीर्घ कार्यकाळांनी आकार दिला. 1947 ते 1952 हा हंगामी पंतप्रधान म्हणूनचा कार्यकाळ वगळला, तर नेहरूंनी निवडणूक जिंकून 13 मे 1952 ते 27 मे 1964 पर्यंत सलग बारा वर्षे देशाचे नेतृत्व केले. त्यांचा हा 4,398 दिवसांचा विक्रम सहा दशकांहून अधिक काळ अबाधित राहिला. इंदिरा गांधींनी 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 या काळात सलग 4,077 दिवस पंतप्रधानपद भूषवले. जुलै 2025 मध्ये मोदींनी इंदिरा गांधींचा विक्रम मागे टाकला होता आणि आता त्यांनी नेहरूंचाही विक्रम मोडला आहे. सलग तीन सार्वत्रिक निवडणुका जिंकणे, राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व टिकवून ठेवणे आणि बदलत्या राजकीय परिस्थितीतही लोकप्रियता कायम राखणे, हे कोणत्याही नेत्यासमोरचे मोठे आव्हान असते. मोदींनी हे आव्हान सहजपणे पार पाडले. त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत पायाभूत सुविधांच्या विस्ताराला मोठी गती मिळाली. महामार्ग, रेल्वे, विमानतळे, डिजिटल व्यवहार, थेट लाभ हस्तांतरण, घरकुल योजना, स्वच्छता अभियान आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासन यांसारख्या उपक्रमांमुळे प्रशासन व्यवस्थेत बदल घडवण्याचा प्रयत्न झाला. भारताची जागतिक प्रतिमा उंचावण्यावरही या काळात विशेष भर देण्यात आला. अमेरिका, युरोप, मध्यपूर्व आणि आशियातील देशांशी संबंध वाढले, तसेच जागतिक परिषदांमध्ये भारताची भूमिका अधिक ठळक झाली. यामुळे भारताचा जागतिक प्रभाव वाढला. भारताने नेहमीच शांततेचा पुरस्कार करत संवाद व
चर्चेतून संघर्ष मिटवण्याचे आवाहन केले आहे, यात शंका नाही. विकास, राष्ट्रवाद आणि प्रभावी नेतृत्व हे मुद्दे मोदींनी राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले. विविध सामाजिक घटकांशी थेट संवाद, प्रभावी प्रचारशैली आणि सरकारी योजनांचे महत्त्व जनतेपर्यंत पोेचवण्याचे कौशल्य यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विकास, राष्ट्रीय अस्मिता, डिजिटल प्रशासन आणि कल्याणकारी योजनांवर भर देत परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न मोदींनी केला आहे. ’विकसित भारत’ हे त्यांचे स्वप्न असून, त्या दिशेने वाटचाल सुरू आहे आणि कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्याची त्यांची तयारी दिसते. काँग्रेसच्या राजवटीत काहीच झाले नाही, असा दावा मोदी व भाजप सातत्याने करतात आणि नेहरू-गांधी घराण्यावर त्यांची टीका नेहमीच राहिली आहे. राजकारणाचा भाग म्हणून हे समजण्यासारखे आहे, पण त्यामुळेच मोदींनी काय केले आणि नेहरूंनी काय केले, याची तुलना होणे स्वाभाविक ठरते. चकचकीत रस्ते, भव्य पूल, मोठी बंदरे, विमानतळे, मेट्रो रेल्वे आणि असे अनेक विकास प्रकल्प मोदींच्या नावावर नोंदले जातात. त्यांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधा, वाहतूक आणि ऊर्जा क्षेत्रात अनेक प्रमुख प्रकल्प साकारले गेले. वाहतूक आणि दळणवळणाच्या क्षेत्रात, मुंबई व नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू (मुंबई ट्रान्स- हार्बर लिंक) हा भारतातील सर्वांत लांब सागरी पूल उभारला गेला, तर आसाम व अरुणाचल प्रदेशला जोडणारा, लोहित नदीवरील भूपेन हजारिका सेतू (धोला-सादिया पूल) हा नदीवरील भारतातील सर्वांत लांब पूल ठरला. जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदीवर उभारलेला चिनाब रेल्वे पूल हा जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल आहे, तसेच दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग, पूर्वांचल द्रुतगती मार्ग आणि नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग यांसारखे विस्तृत महामार्ग प्रकल्पही या काळात साकारले गेले. राष्ट्रीय स्मारके व इमारतींच्या बाबतीत गुजरातमध्ये नर्मदा नदीकाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वांत उंच पुतळा उभारण्यात आला, तसेच नवी दिल्लीत देशाची नवी व आधुनिक संसद इमारत, अर्थात, नवीन संसद भवन (सेंट्रल व्हिस्टा) बांधण्यात आली. ऊर्जा आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात, राजस्थानमधील भडला सौर ऊर्जा पार्क हा जगातील सवार्ंत मोठ्या सौर प्रकल्पांपैकी एक ठरला, तर मध्य प्रदेशातील रेवा सौर ऊर्जा प्रकल्प हा आशियातील सवार्ंत मोठ्या सौर प्रकल्पांपैकी एक आहे. जलसंधारण आणि नागरी विकासाच्या आघाडीवर, गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी व पुनरुज्जीवनासाठी नमामि गंगा हा मोठा प्रकल्प राबवला जात आहे, तसेच देशातील शंभर शहरांना आधुनिक सुविधांनी सज्ज करण्यासाठी स्मार्ट सिटी मिशन हा उपक्रम सुरू आहे. मोदींच्या कार्यकाळात मोठी कामे झाली, हे खरे, पण त्याचवेळी नेहरूंच्या कार्यकाळातील योगदानही दुर्लक्षित करता येत नाही. पं. नेहरूंनी (1947-1964) भारताचा पाया भक्कम करण्यासाठी अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले, ज्यांना ते ’आधुनिक भारताची मंदिरे’ म्हणत. मोठी धरणे व कालव्यांच्या, अर्थात जलसिंचन व वीजनिर्मितीच्या क्षेत्रात, सतलज नदीवरील भाक्रा नांगल प्रकल्प हे भारतातील एक अत्यंत मोठे धरण ठरले, ज्यामुळे पंजाब, हरियाणा व राजस्थानला वीज-पाण्याचा लाभ झाला. अमेरिकेच्या धर्तीवर आधारलेली स्वतंत्र भारताची पहिली बहुउद्देशीय नदी खोरे योजना म्हणून दामोदर खोरे प्रकल्प साकारला गेला. ओडिशातील संबळपूर जिल्ह्यात महानदीवर बांधलेले हिराकुड धरण हे जगातील सर्वांत लांब मातीचे धरण मानले जाते आणि आंध्र प्रदेशात कृष्णा नदीवर नागार्जुन सागर प्रकल्पासारखे मोठे धरण उभारले गेले. जड व पायाभूत उद्योगांच्या क्षेत्रात, भिलाई (छत्तीसगड), रुरकेला (ओडिशा) आणि दुर्गापूर (पश्चिम बंगाल) येथे मोठे पोलाद कारखाने उभारले गेले, ज्यांनी देशाच्या औद्योगिक विकासाला चालना दिली. पश्चिम बंगालमध्ये रेल्वे इंजिन निर्मितीचा पहिला मोठा कारखाना, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स सुरू झाला, तसेच विशाखापट्टणम येथे हिंदुस्तान शिपयार्ड हा जहाजबांधणी प्रकल्प विकसित करण्यात आला. विज्ञान, तंत्रज्ञान व उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात 1951 मध्ये खडकपूर येथे देशातील पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) सुरू झाली. त्यानंतर मुंबई, मद्रास, कानपूर आणि दिल्ली येथेही अशा संस्था उभारल्या गेल्या. डॉ. होमी भाभा यांच्या नेतृत्वाखाली ट्रॉम्बे (मुंबई) येथे अणुऊर्जा केंद्र स्थापन होऊन अप्सरा ही पहिली अणुभट्टी कार्यान्वित झाली, तर अंतराळ संशोधनाचा पाया घालण्यासाठी इन्कोस्पार स्थापन करण्यात आले, ज्याचे पुढे ’इस्रो’मध्ये रूपांतर झाले. वैद्यकीय उच्च शिक्षण व उपचारांसाठी नवी दिल्लीत एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) ही प्रमुख संस्था स्थापन झाली. नेहरूंच्या काळातील इस्रो, रेल्वे इंजिन प्रकल्प, आयआयटी, एम्स आणि धरणे आजही कार्यरत आहेत. त्यामुळे नेहरूंनी काय केले आणि मोदींनी काय केले, असे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा स्वातंत्र्यानंतर देशाचा विकास होत आहे, हेच अधिक महत्त्वाचे!

Valiant Prime Minister

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

9 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

9 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

9 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

9 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

9 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

9 hours ago