पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणारी परीक्षा म्हणजे नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्टरन्स टेस्ट म्हणजेच ‘नीट’ ही परीक्षा यंदा 3 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. सुमारे 22 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. परीक्षेच्या 42 तास आधीच म्हणजे 1 मे रोजी पेपर फुटला. प्रश्न आणि उत्तरे टेलिग्राम व व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर फिरत होते. त्यामुळे रात्रंदिवस मेहनतीने अभ्यास करणार्या लाखो विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी
फेरले गेले. विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय 12 मे रोजी जाहीर केला. पेपर फुटल्याने हा निर्णय घ्यावा लागला; परंतु पुन्हा एकदा अभ्यास करून नव्याने परीक्षा द्यावी लागणार असल्याने विद्यार्थी अस्वस्थ झाले, त्यांच्यात ताणतणाव वाढला, त्यांच्या पालकांची चिंता वाढली होती. नीट पेपरफुटीची देशभर सर्वत्र चर्चा होत असताना, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका याचिकेवर सुनावणी करताना एक निरीक्षण 15 मे रोजी नोंदविले. समाजात असे काही तरुण आहेत जे झुरळांसारखे आहेत, ज्यांना कोणताही रोजगार मिळत नाही किंवा कोणत्याही व्यवसायात स्थान मिळत नाही. त्यांच्यापैकी काही मीडियामध्ये जातात, काही सोशल मीडियावर जातात, आरटीआय (माहिती अधिकार) कार्यकर्ते किंवा इतर कार्यकर्ते बनतात आणि प्रत्येकावर आणि व्यवस्थेवर हल्ले करू लागतात. हे लोक समाजातील परजीवी (पॅरासाइट्स)आहेत, असे विधान न्या. सूर्य कांत यांनी केले होते. आपल्या या विधानावर त्यांनी दुसर्या दिवशी खुलासा केला. माझ्या वक्तव्याचा माध्यमांच्या एका घटकाने चुकीचा संदर्भ घेऊन विपर्यास केला याचे मला दुःख झाले आहे, असे त्यांनी म्हटले. माझी टीका देशातील प्रामाणिक तरुणांवर नव्हती. जे लोक बोगस आणि खोट्या पदव्या मिळवून वकिली व्यवसाय, मीडिया, सोशल मीडिया किंवा इतर क्षेत्रांत घुसतात, त्यांच्याबद्दल मी बोलत होतो. अशा बोगस लोकांना मी परजीवी म्हटले होते, असेही न्या. सूर्य कांत यांनी खुलाशात म्हटले होते. भारताचे तरुण हे विकसित भारताचे आधारस्तंभ आहेत आणि देशातील युवाशक्ती मला दररोज प्रेरणा देते. त्यामुळे मी देशातील तरुणांचा अपमान केला हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असेही त्यांनी नमूद केले होते. सरन्यायाधीशांनी बोगस पदव्या घेणार्यांवर टीका केली होती; परंतु त्यांच्या मूळ वक्तव्यातील ‘झुरळ’ या शब्दामुळे देशातील बेरोजगार तरुणांच्या भावना दुखावल्या गेल्या, हे नाकारता येत नाही. मात्र, सरन्यायाधीशांनी ज्या दिवशी खुलासा केला, त्याच दिवशी अमेरिकेतील अभिजित दीपके नामक भारतीय तथा मराठी तरुणाने ‘कॉक्रोच जनता पार्टी’ डिजिटल स्वरूपात स्थापन केली. लाखो तरुणांना आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी या पार्टीने दिली. आभासी जगातील ही पार्टी दिवसेंदिवस लोकप्रिय होऊ लागली. अनेकांनी अभिजितला भारतात येण्याची विनंती केली. आपल्याला
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विद्यार्थ्यांची विनंती नाकारणे नैतिकतेत बसत नसल्याचे पाहून अभिजितने भारतात येण्याचा 31 मे रोजी निर्णय घेतला. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी
6 जून रोजी दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय झाला. दि. 6 जून 2026 रोजी अमेरिकेतून दिल्ली विमानतळावर दाखल झाले, तेव्हा आभासी दुनियेतील ‘कॉक्रोच जनता पार्टी’ अस्सल दुनियेत अवतरली. सोशल मीडियावर हीरो ठरलेला संभाजीनगरचा मराठी तरुण अभिजित दीपके जमिनीवरील हीरो खर्या अर्थाने देशाच्या राजधानीत ठरला. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या देशांत तरुणाईने केलेली आंदोलने पाहता, भारतात 6 जून रोजी काय घडणार, याकडे लक्ष वेधले गेले होते. सरकारने आंदोलन अत्यंत कुशलतेने हाताळून विद्यार्थी आंदोलकांना आक्रमक होण्याची कोठेही संधी दिली नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दिल्लीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विमानतळ, सीमा आणि संवेदनशील भागांत एक हजारांहून अधिक पोलिस तैनात होते. दुसरीकडे, दीपके आणि त्यांच्या सहकार्यांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. आंदोलकांनी येताना हातात पुस्तके घ्यावीत आणि पाण्याची बाटली आणावी, असे आवाहन केले होते. दीपके यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे, हिंसा न करण्याचे आणि केवळ देश, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देण्याचे आवाहन केले होते. शांततापूर्ण आंदोलन, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, अशा घोषणांचे फलक हातात घेऊन आंदोलक आले होते. याशिवाय, त्यांच्याकडे फुले आणि कॉक्रोच मास्क होते. सभेमध्ये हे मास्क वाटले जात होते. आंदोलकांनी संयम पाळला. विद्यार्थी आणि तरुणांनी घोषणाबाजी केली, परंतु कोठेही धिंगाणा घातला नाही की आततायीपणा केला नाही. त्यामुळे आंदोलन शांततेत सुरू झाले आणि शांततेत संपले. दुसरीकडे जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यास तत्काळ विशेष परवानगी दिली आणि अभिजित दीपके यांना अडवणूक केली नाही. परवानगी दिली नसती, अडवणूक केली असती, तर विद्यार्थी आणि तरुणांचा उद्रेक होईल, हे लक्षात घेऊन पोलिसांनी परिस्थिती कुशलतेने हाताळली. आंदोलनाला परवानगी देऊ नये म्हणून दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखलही करण्यात आली होती, ती खारिज करण्यात आली. दुसरीकडे, जंतर-मंतरवर काही लोक मुद्दामहून गेले होते. त्यांनी दीपके यांच्याविरोधात विद्यार्थ्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना बाहेर काढले. आभासी दुनियेत धुमाकूळ घालणारी कॉक्रोच जनता पार्टी चळवळ खर्या दुनियेत अवतरली. या चळवळीचे भवितव्य काय, याचा काही अंदाज लावता येत नसला, तरी विद्यार्थी आणि तरुणांच्या भावनांकडे, त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हाच संदेश शांततापूर्ण आंदोलनातून दिला गेला आहे. देशात सर्वकाही ठीक आहे, असेही चित्र उभे करून चालणार नाही, हाही संदेश दिला गेला आहे. आपली चळवळ केवळ आभासी दुनियेपुरती मर्यादित न राहता, प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून शांततापूर्ण आणि संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्यासाठी दीपके यांनी भारतात येण्याचे ठरवले होते. 6 जून रोजी त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठ्या आंदोलनाचे नेतृत्व केले. सोशल मीडियातील एक चळवळ असलेली ‘कॉक्रोच जनता पार्टी’ शनिवारी अखेर प्रत्यक्षात जमिनीवर अवतरली. चळवळीचे संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून सकाळी भारतात आले व त्यानंतर त्यांच्यासह हजारो तरुणांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर दिवसभर आंदोलन केले. सरकारला सांगा, आम्ही घाबरत नाही, अशी घोषणा दीपके यांनी यावेळी करताच उपस्थितांनी तिला प्रचंड दाद दिली. देशातील विविध परीक्षांमधील पेपरफुटी आणि घोटाळे यांची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठीच प्रामुख्याने हे आंदोलन करण्यात आले, तरी नीटसह विविध परीक्षांमधील घोटाळे, देशातील सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती याकडे लक्ष वेधण्याचा उद्देश आंदोलनाचा होता. माझ्या आईला भीती होती की, मी भारतात परतल्यावर मला अटक होईल. ही भीती फक्त माझ्या आईची नाही, तर ज्यांना राजकारणाबद्दल बोलायची इच्छा आहे, अशा प्रत्येक पालकाची आहे, हे विधान दीपके यांनी केले, ते बरेच काही सांगून जाणारे आहे. सोशल मीडियावर आम्ही महिनाभरापासून आवाज उठवत आहोत, पण हे लोक आमची खाती हॅक करण्यात आणि पोस्ट हटवण्यात व्यस्त आहेत. तुम्ही आमच्या पोस्ट हटवू शकाल, पण आम्हाला या प्रक्रियेतून पुसून टाकू शकत नाही, असे म्हणत त्यांनी आणखी एक विधान केले. ते असे, देशातील युवक आणि विद्यार्थी विकले गेलेले नाहीत.
Virtual movement in the real world
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…