1980 च्या सिंहस्थातील स्थिती, भाविकांवरही पडत होता सुविधांचा बोजा
नाशिक : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये पुढील वर्षी होणार्या सिंहस्थाचे बजेट तब्बल 26 हजार कोटींच्या घरात पोहोचलेले आहे. शासनामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असून, त्यातील विविध प्रकारची विकासकामे आकार घेत आहेत. आज सिंहस्थाच्या बजेटने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असली तरी, 1979-80 मध्ये झालेल्या सिंहस्थ पर्वणीसाठी येणार्या नागरिकांकडून कररूपाने पैसा गोळा केला जात होता. त्यातून मिळणार्या निधीचा उपयोग सिंहस्थातील सुविधांच्या खर्चासाठी केला जात होता.
1979-80 मध्ये सिंहस्थ पर्वणीसाठी येणार्या भाविकांकडून प्रतिव्यक्ती एक रुपया यात्रा कर म्हणून आकारला गेला होता. त्यासाठी शासनानेच आदेश काढले होते. सिंहस्थात नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाकडून निधी येत असत. मात्र, हा निधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसत. कारण त्यावेळी सिंहस्थ पर्वणीसाठी बजेटमधील तरतूदही कमीच होती. त्यामुळे पर्वणीला येणार्या भाविकांच्या सुविधांसाठी शासनाचा निधी कमी पडत. खर्चाचा हा भार कमी करण्यासाठी व शासनालाही मदत व्हावी म्हणून पर्वणीला येणार्या नागरिकांकडून एक रुपया कर आकारावा, असे आदेश शासनाने राज्यपालांच्या परवानगीने काढले होते. त्यावेळी सभागृह सुरू नव्हते. त्यामुळे राज्यपालांच्या परवानगीनंतर अशा प्रकारे एक रुपया कर आकारण्याचे आदेश 24 ऑगस्ट 1979 ला काढले होते. हे आदेश त्र्यंबक नगर परिषद हद्दीत आणि परिसरातील पाच किलोमीटर अंतरासाठी लागू करण्यात आले होते. ज्यांचे वय 12 वर्षे पूर्ण आहेत, त्यापुढील व्यक्तीसाठी प्रत्येकी एक रुपया तर 12 वर्षांखालील मुलांसाठी पन्नास पैसे कर देऊन त्र्यंबक नगर परिषद हद्दीत प्रवेश करताना द्यावा लागत होता. त्यासाठी नगर परिषद कर्मचार्यांची नियुक्ती केली होती. या कराची पावतीही संबंधितांना दिली जात होती. या तिकिटांवर यात्रा कर प्रतिव्यक्ती एक रुपया असा उल्लेख आढळून येतो. त्या काळात वाहतूक, निवास, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था तुलनेने मर्यादित होत्या. भाविकांची संख्या लाखोंमध्ये असली तरी आजच्या तुलनेत ती खूप कमी होती. बहुतांश भाविक रेल्वे, एस.टी. बस किंवा खासगी वाहनांऐवजी पारंपरिक साधनांचा वापर करून नाशिकमध्ये दाखल होत असत. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आगामी सिंहस्थ 2027 साठी राज्य शासन, महापालिका आणि विविध यंत्रणा हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांची आखणी करत आहेत. विस्तीर्ण रस्ते, उड्डाणपूल, नदीघाटांचे सुशोभीकरण, आधुनिक पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, डिजिटल नियंत्रण कक्ष, सीसीटीव्ही निगराणी आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा यावर भर दिला जात आहे.
1980 मध्ये भाविकांची संख्या काही लाखांमध्ये होती, तर 2027 च्या सिंहस्थात कोट्यवधी भाविक नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाहतूक नियोजन, गर्दी व्यवस्थापन आणि आपत्कालीन सेवांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीतही मोठी झेप दिसून येते. पूर्वी माहिती प्रसारासाठी रेडिओ आणि सूचनाफलकांवर अवलंबून राहावे लागत होते. आता मोबाइल अॅप्स, सोशल मीडिया, जीपीएस-आधारित वाहतूक नियंत्रण आणि ऑनलाइन माहिती सेवा भाविकांच्या सेवेत उपलब्ध आहेत.
Devotees had to pay a tax of one rupee for the Simhastha.
- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…
- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…
- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…
- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…