महाराष्ट्र

बायकोच्या वाढदिवसाचे नाटक करून गल्ला लंपास

पुण्याचा सराईत चोर उपनगर पोलिसांच्या जाळ्यात

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
बायकोचा वाढदिवस आहे; चांगले कपडे दाखवा, असे सांगून महिला दुकानदाराचे लक्ष विचलित केले आणि काउंटरवरील रोख रकमेचा डबा चोरून पळ काढला. उपनगर क्षेत्रातील आनंदनगर येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेचा उपनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला. पुण्याच्या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकून त्याच्याकडून चोरीची सर्व रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
आनंदनगर भागातील तनिष्क ग्लॅम गॅलरीच्या महिला चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास 25 ते 30 वयोगटातील तरुण दुकानात आला. पत्नीच्या वाढदिवसासाठी कपडे खरेदी करायचे असल्याचे सांगत त्याने कपडे पाहण्यास सुरुवात केली. महिला दुकानदार कपडे दाखवण्यात व्यस्त असताना, भामट्याने अत्यंत हातचालाखीने काउंटरवर ठेवलेला सात हजार रुपयांचा रोख रकमेचा डबा उचलला आणि तेथून पळ काढला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून प्रभारी अधिकारी संजय पिसे यांनी गुन्हेशोध पथकाला तपासाचे आदेश दिले. पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व अंमलदार विनोद लखन यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने संशयिताचा माग काढत शुभम अशोक माने (वय 26, रा. धनकवडी, ता. हवेली, जि. पुणे) यास ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली सात हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
अटक करण्यात आलेला शुभम माने सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्यावर पुण्यातील सिंहगड रोड आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तोतयागिरी, फसवणूक आणि घरफोडीचे तीन गंभीर गुन्हे आधीच दाखल आहेत.
ही धडक कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपआयुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे, पोलिस निरीक्षक शांताराम डंबाळे, सुनील बडे, पोउनि प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार विनोद लखन, संदीप पवार, गौरव गवळी, प्रशांत देवरे, सुनील गायकवाड, अनिल शिंदे व सहकार्‍यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार विनोद लखन करत आहेत.

Cash box stolen by staging a ruse about wife’s birthday

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

गावातून धिंड : ’नाशिक जिल्हा-कायद्याचा बालेकिल्ला’च्या दिल्या घोषणा

मखमलाबाद येथे डॉक्टरला मारहाण, दोन आरोपींना अटक पंचवटी : प्रतिनिधी मखमलाबाद बसस्टँड परिसरात भाजीपाला घेण्यासाठी…

20 hours ago

गुजरातमधून आलेली 2,155 किलो बर्फी जप्त

अन्न प्रशासनाचा कारवाईचा धडाका नाशिक : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थाविरुद्ध…

20 hours ago

भविष्यात ‘एआय’ उठणार माणसाच्या जीवावर?

कमांड न स्वीकारता स्वतःच्या बुद्धीने घेणार निर्णय; मानवी अस्तित्वाला धोक्याचा इशारा मुंबई : प्रतिनिधी आर्टिफिशियल…

20 hours ago

हरितालिका पूजनानंतर होणार श्रीगणेशाचे आगमन

31 वर्षांनंतर दुर्मिळ योग; सकाळी पूजन, मध्यान्ही बाप्पाची स्थापना नाशिक : प्रतिनिधी हरितालिकेची पूजा आणि…

20 hours ago

सातशेपैकी 20 गणेश मंडळांनाच परवानगी

प्रमाणपत्राची पूर्तता न झाल्याने अर्ज प्रलंबित नाशिक : प्रतिनिधी महापालिका प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सवाच्या…

20 hours ago

विषय समित्यांची निवडणूक प्रक्रिया राबवा

मनपा पाठवणार विभागीय आयुक्तांना पत्र नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेची निवडणूक जानेवारीत झाल्यानंतर ऑगस्टमध्ये महिला…

20 hours ago