थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलवून टाकला. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्षांना त्यांनी आरसा दाखविला. सरकार स्थापन करण्यासाठी विजय यांना अनेक अडथळ्यांवर मात करावी लागली. सरकार स्थापन करताना त्यांनी द्रमुकच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीला खिंडार पाडले. बहुमत सिद्ध करताना त्यांनी भाजपा-अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाही तडे पाडले. थलपती विजय यांच्या पक्षाला 234 पैकी सर्वाधिक 108 जागा मिळाल्या. बहुमतासाठी 118 जागांची गरज होती. त्यात विजय हे दोन मतदारसंघांतून निवडून आले असल्याने एक जागा कमी होऊन त्यांचे संख्याबळ 107 वर आले. बहुमतासाठी आणखी 11 जागांची गरज भासली. तमिळगा वेत्री कळघम हा सर्वांत मोठा पक्ष असूनही राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना सरकार स्थापन करण्याची संधी दिली नाही, तर 118 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र सादर करण्यास सांगितले. बहुमतासाठी 118 चा आकडा गाठण्यासाठी विजय यांना तारेवरची कसरत करावी लागली. द्रमुकच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीतील काँग्रेसने सर्वप्रथम विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला होता. त्यानंतर कम्युनिस्ट पक्ष (दोन जागा), मार्क्सवादी कम्युनिस्ट (दोन जागा) यांनी पाठिंबा जाहीर केला, तेव्हा आकडा 116 पर्यंत गेला. दोन आमदारांची कमतरता भासत होती. यानंतर द्रमुकच्या आघाडीत दोन आमदार असलेल्या विदुथलाई चिरुथैगल कच्ची पक्षाचे (व्हीसीके) प्रमुख थोल थिरुमावलवन यांनी विजय यांना पाठिंबा दिला. शेवटी इंडियन युनियन मुस्लिम लीगने (दोन आमदार) पाठिंबा दिला. त्यानंतर 118 चा जादुई आकडा विजय यांनी गाठला. त्यासाठी त्यांना सर्व पक्षांच्या नेत्यांशी बोलणी करावी लागली. त्या पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा पत्रे दिल्यानंतरच राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापन करण्याची संधी दिली आणि तीन दिवसांत बहुमत सिद्ध करून दाखविण्याचा आदेश दिला. 10 मे रोजी सरकार स्थापन करणार्या विजय यांनी मुदतीत बहुमत सिद्ध केले, तेव्हा त्यांच्या सरकारला 144 आमदारांचा पाठिंबा असल्याचे दिसले. सरकारने बहुमताचा आकडा सहज पार केला. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अण्णाद्रमुक या प्रमुख पक्षात फूट पडली, तसेच याच आघाडीतील अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम या पक्षाच्या एका आमदाराने विजय यांना पाठिंबा दिला. अण्णाद्रमुकचे 47 आमदार निवडून आले. त्यांपैकी 25 आमदारांनी वेगळा गट स्थापन केला. त्यातील 22 आमदारांनी विजय यांना पाठिंबा दिला. इतर लहान पक्षांनीही विजय यांची पाठराखण केली. काँग्रेसने विजय यांना पाठिंबा दिला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर द्रमुकचा विश्वासघात केल्याची टीका केली होती. ज्या अण्णाद्रमुकचे गोडवे पंतप्रधान गात होते, त्याच अण्णाद्रमुकमध्ये फूट पडली, ती विजय यांना पाठिंबा देण्यावरूनच. दुसरीकडे, धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीतील पक्षांनी दुहेरी भूमिका घेतली आहे. जनादेश आपल्या बाजूने नाही म्हणून विजय यांना पाठिंबा देणे आवश्यक असल्याची भूमिका काँग्रेस, दोन्ही कम्युनिस्ट, व्हीसीके, मुस्लिम लीग या पक्षांनी घेतली. ’द्रमुक’शी युती/आघाडी कायम राहणार असल्याचे या पक्षांनी स्पष्ट केले. राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागली, असा दावाही या पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. राज्यात सरकार स्थापन झाले नसते, तर राष्ट्रपती राजवट म्हणजे केंद्राच्या हातात सत्ता गेली असती- केंद्र म्हणजे भाजपा- असा युक्तिवादही केला जात आहे. थलपती विजय यांची भूमिका भाजपाला थेट विरोध करणारी आहे. हे द्रमुकने लक्षात घ्यावे, असा अप्रत्यक्ष सल्ला मित्रपक्षांनी दिला आहे. थलपती विजय यांचे सरकार स्थापन होत असताना विरोधात बसून करायचे काय? हाच विचार अण्णाद्रमुकच्या फुटीर आमदारांनी केला असल्याचे दिसते. त्यांनी सोयीची भूमिका घेतली. तीच भूमिका द्रमुकच्या मित्रपक्षांनी घेतली. थलपती विजय यांचा शपथविधी पार पडल्यानंतर अण्णाद्रमुकचे प्रमुख एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्याविरोधात आमदारांच्या एका मोठ्या गटाने बंड पुकारले. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या ’द्रमुक’शी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फुटीर आमदारांनी पलानीस्वामींवर केला. ज्येष्ठ नेते एस. पी. वेलुमणी आणि सी. व्ही. षण्मुगम यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 30 आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले. विधानसभा निवडणुकीत पक्षाला 164 पैकी केवळ 47 जागा मिळाल्याने पलानीस्वामींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. फुटीर गटाने विजय यांना पाठिंबा जाहीर केला. पलानीस्वामी यांना द्रमुकच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे होते, जो आमच्या पक्षाच्या मूळ तत्त्वांचा अपमान आहे. एम. जी. रामचंद्रन यांनी द्रमुकला विरोध करण्यासाठीच हा पक्ष स्थापन केला होता, असे सांगून षण्मुगम यांनी विजय यांचे समर्थन केले. जयललिता (अम्मा) यांच्या काळातील सुशासन परत आणण्यासाठी विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देणे आवश्यक आहे, असे बंडखोर नेत्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, पलानीस्वामी गटाने हे सर्व आरोप फेटाळून लावले. द्रमुकचे संघटक सचिव आर. एस. भारती यांनी पलानीस्वामींसोबतच्या कोणत्याही गुप्त युतीचे वृत्त फेटाळून लावले. फुटीर आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी पलानीस्वामी गटाने केली आहे. त्यामुळे तामिळनाडूत पक्षांतरबंदी कायदा चर्चेत आला आहे. फुटीर गटाकडे 47 पैकी दोन तृतीयांश (32) आमदार नाहीत. फुटीर आमदारांनी वेगळा गट स्थापन केलेला नाही. त्याला विधानसभा अध्यक्ष जे. सी. डी. प्रभाकर यांनी मान्यता दिली की नाही, हे समजण्यास मार्ग नाही. अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतला, तर त्याला उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. विधानसभा निवडणूक निकालापासून द्राविडी राजकारणात नाट्यपूर्ण घडामोडी घडत असून, द्रमुक आणि अण्णाद्रमुक दोन्ही पक्षांचे महत्त्व कमी झाले आहे.
Dravidian politics
ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…
नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…
माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…
गेल्या आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नाला गेलो होतो. खरेतर लग्न कसले, फक्त वैताग. जावे लागते म्हणून लोक…
सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा ज्येष्ठ नागरिकाचा आरोप मनमाड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या…