– अफजल पठाण
हातात पुस्तक हवं होतं,
हातात विष आलं,
स्वप्नांच्या वाटेवर चालताना आयुष्यच हरवलं.
उद्याचा आधार असलेला
तरुण आज व्यसनात अडकला,
आता तरी जागा हो समाजा… नाहीतर भविष्यच अंधारात बुडाला
आज समाजासमोर उभ्या असलेल्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक म्हणजे अमली पदार्थांचे वाढते व्यसन. काही वर्षांपूर्वी ही समस्या मोठ्या शहरांपुरती मर्यादित होती; मात्र आज ती लहान शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे. विशेषतः युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. देशाचे भविष्य असलेली तरुण पिढी जर व्यसनाच्या आहारी जात असेल, तर हा केवळ एका कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या भवितव्याचा प्रश्न आहे.
अमली पदार्थांचे जाळे दिवसेंदिवस अधिक संघटित होत आहे. सहज पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी काही समाजकंटक युवकांना व्यसनाच्या गर्तेत ढकलत आहेत. सुरुवातीला फक्त एकदा करून बघ या मोहापासून सुरू झालेला प्रवास पुढे कायमस्वरूपी व्यसनात बदलतो. त्यानंतर शिक्षण, करिअर, कुटुंब आणि सामाजिक आयुष्य सर्व काही उद्ध्वस्त
होऊ लागते.
या व्यसनामुळे अनेक युवक गुन्हेगारीकडे वळतात. चोरी, लूटमार, मारामार्या आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये व्यसनाधीन तरुणांचा सहभाग वाढत असल्याचे अनेक घटनांमधून दिसून येते. व्यसन फक्त एका व्यक्तीला नाही, तर संपूर्ण कुटुंबाला मानसिक, सामाजिक आणि आर्थिक संकटात ढकलते.
या समस्येसाठी केवळ पोलीस प्रशासनाला जबाबदार धरून चालणार नाही. पालकांनी मुलांच्या वागणुकीतील बदल वेळेवर ओळखणे गरजेचे आहे. मुलांच्या मित्रपरिवारावर, त्यांच्या हालचालींवर आणि मोबाइलच्या वापरावर योग्य लक्ष ठेवणे आवश्यक आहे. शाळा आणि महाविद्यालयांनी नियमित जनजागृती कार्यक्रम, समुपदेशन आणि व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन आयोजित करणे ही काळाची
गरज आहे.
समाजातील स्वयंसेवी संस्था, धार्मिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. केवळ भाषणे देऊन समस्या सुटणार नाही. प्रत्येक परिसरात व्यसनमुक्ती अभियान, युवकांसाठी क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रम आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण यांसारखे सकारात्मक पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाने अमली पदार्थांची विक्री करणार्या टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. नागरिकांनीही अशा संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना माहिती देण्यास पुढाकार घेतला पाहिजे. समाज आणि प्रशासन यांनी एकत्र येऊनच या संकटाचा मुकाबला करता येईल.
आज प्रश्न असा आहे की, व्यसनाधीन झालेल्या युवकांना दोष देण्यात अर्थ आहे का, की त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी आपण सर्वांनी हात पुढे केला पाहिजे? प्रत्येक व्यसनाधीन युवकामागे एक अस्वस्थ कुटुंब आणि तुटलेले भविष्य असते. त्यामुळे त्यांना शिक्षा करण्याबरोबरच पुनर्वसन आणि समुपदेशनालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे.
युवक वाचले तरच देशाचे भविष्य सुरक्षित राहील. त्यामुळे अमली पदार्थांविरुद्धची लढाई ही केवळ पोलीस किंवा शासनाची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आजच जागे होऊन कृती केली तर उद्याची पिढी व्यसनमुक्त, सुदृढ आणि सक्षम घडू शकेल. अन्यथा, उद्या युवकांना वाचवण्यासाठी कोण पुढे येणार? हा प्रश्न विचारायलाही उशीर झालेला असेल.
Drugs, a life destroyed.
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…