नाशिक

पंचवटीसह मखमलाबाद, म्हसरूळ परिसरात बैलपोळ्याचा उत्साह

पंचवटी : प्रतिनिधी
दिवसेंदिवस शहरातील शेती करण्याचे प्रमाण कमी झाले असून, शेती नांगरणी करण्यासाठी बैलजोडी बघणे दुर्मिळ झाले आहे. परंतु अजूनही मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव, नांदूर- मानूर शिवारातील काही हौशी शेतकर्‍यांकडे बैलजोडी असल्याने त्यांच्यामध्ये बैल पोळ्याच्या दिवशी अमाप उत्साह दिसला. मखमलाबाद गावात मिरवणूक काढून पारंपरिक पद्धतीने बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी घरोघरी मातीच्या बैलांचे पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. पिठोरी अमावास्या म्हणजे बैलपोळा या दिवशी ज्या-ज्या शेतकर्‍यांकडे बैलजोडी व गाय-वासरू आहेत, अशा शेतकर्‍यांनी बैलजोडीसह गाय-वासरू यांना आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर बैलजोडीसह गाय-वासरू यांना पाठीवर नक्षीकाम केलेली आकर्षक झूल, शिंगांना बेगडं, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात करदोड्याचे तोडे आणि सर्वांगावर गेरूचे ठिपके अशाप्रकारे लक्षवेधी सजावट केलेली बैलजोडीसह गाय-वासरू व अश्व यांची गावात व परिसरात सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन गावातील ग्रामदैवत मारुती मंदिरासमोर बैलजोडींकडून सन्मानपूर्वक सलामी देण्यात आली. ठिकठिकाणी महिलांकडून बैलजोडीसह गाय-वासरू यांचे औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. शेतकर्‍यांकडून बैलजोडीसह गाय-वासरू यांचे पूजन करण्यात येते. मात्र, यांत्रिक पद्धतीने शेतीमुळे आज ज्यांच्याकडे बैलजोडी नाही त्यांनी घरोघरी मातीच्या बैलांचे पूजन करून पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा केला.
यावेळी टांगाप्रेमी शेतकरी मोतीराम पिंगळे, संजय पिंगळे, विक्रम पिंगळे, रोशन पिंगळे आदींसह शेतकरी उपस्थित होते. मखमलाबाद परिसर झपाट्याने वाढला आहे. अनेक लोक नोकरी- व्यवसायानिमित्त परिसरात स्थायिक झाले आहेत. त्यातच बैलजोडी बघणे दुर्मिळ झाल्याने अनेकांनी मखमलाबाद गावात पोळ्यानिमित्त बैलजोडी व मिरवणूक बघण्यासाठी गर्दी केली होती. काही शेतकर्‍यांनी बैलजोडी व अश्व यांची मिरवणूक काढली. बैलपोळ्यानिमित्ताने शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

Enthusiasm for Bail Pola in Panchavati, Makhmalabad, and Mhasrul areas.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिहस्थ सोहळ्यासाठी नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त

तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…

4 days ago

झाडे तोडली तर पाखरांनी परत जायचे कुठे?

पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…

4 days ago

सत्ताधार्‍यांना धक्के

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…

4 days ago

कुंभमेळ्याच्या जागेसाठी शासनाने ठोस भुमिका घ्यावी

नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…

4 days ago

ध्वजारोहणासाठी शहर भगवेमय

चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…

4 days ago

फिरायला जाताय, एनसीएमसी कार्ड नोंदणी केली का?

आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…

4 days ago