नाशिक

दोन मिनिटे उशीर झाल्याने यूपीएससी परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला

पालक, विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा; यूपीएससी विद्यार्थ्यांना खड्डे, ट्रॅफिकचा मोठा फटका

नाशिक : प्रतिनिधी
यूपीएससी परीक्षेच्या सकाळच्या सत्रात परीक्षा केंद्रावर रविवारी काही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि पावसामुळे वाहतुकीला विलंब होत असल्याचे कारण देत काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले. मात्र, निर्धारित वेळ संपल्याचे सांगत केंद्र संचालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांनी आक्रमक होत परीक्षा केंद्रावर निदर्शने करत संताप व्यक्त केला.
केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे रविवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल प्रबोधिनी द्वितीय या दोन महत्त्वाच्या परीक्षा एकूण 13 उपकेंद्रांवर घेण्यात आल्या. मात्र, त्यातील शहरातील के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर सकाळी प्रवेशावरून मोठा गोंधळ झाला. अवघ्या दोन ते तीन मिनिटांच्या उशिरामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी केंद्राबाहेर तीव्र निदर्शने केली. परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही विद्यार्थी केंद्रावर पोहोचले; मात्र त्यांना प्रवेश मिळाला नाही. प्रवेशद्वार बंद करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आत सोडण्याची मागणी केली. काल रात्रीपासून शहरात पावसाची संततधार सुरू असून, जिकडे-तिकडे रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे घरापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अधिक वेळ लागला, असा दावा विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता, परीक्षा केंद्रात प्रवेश मिळावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली; मात्र ती नाकारण्यात आल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेपासूनवंचित राहावे लागले.
पालक विद्यर्थ्यांचे परीक्षा केंद्राबाहेर निदर्शने
दरम्यान विद्यार्थ्यांसोबत पालकही मोठया संख्येनें परीक्षा केंद्राबाहेर उपस्थित होते. प्रवेशाची वेळ संपल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षागृहात जाता येणार नसल्याचे केंद्र संचालकांनी स्पष्ट करताच मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेशासाठी आग्रह धरत निर्दर्शने करत संताप व्यक्त केला.
3,176 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे रविवारी घेण्यात आलेल्या संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) तसेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी व नौदल अकादमी (एनडीए) परीक्षेसाठी शहरातील 13 केंद्रांवर एकूण 4,375 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3,176 विद्यार्थी उपस्थित, तर 1,199 विद्यार्थी गैरहजर राहिले.सीडीएस परीक्षेसाठी तीन केंद्रांवर 565 विद्यार्थी उपस्थित, तर 358 विद्यार्थी गैरहजर होते. एनडीए व नौदल अकादमी परीक्षेसाठी दहा केंद्रांवर 2,611 विद्यार्थी उपस्थित, तर 841 विद्यार्थी गैरहजर राहिले.

केवळ दोन मिनिटांनी हुकली संधी

परीक्षेसाठी सकाळी 9.30 वाजताची रिपोर्टिंग वेळ निश्चित करण्यात आली होती. परंतु, शहरातील खराब रस्ते, खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अवघ्या काही सेकंदांपासून ते 2 ते 3 मिनिटांचा उशीर झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर परीक्षा केंद्र व्यवस्थापनाने वेळेचे कारण देत उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना आत सोडण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे वर्षानुवर्षे कठोर अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांवर परीक्षा न देताच परतण्याची दुर्दैवी वेळ आली.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नियमांचे अतिशय तंतोतंत पालन केले जाते. परीक्षेचे नियंत्रण केंद्रस्तरावरून होते. काही परीक्षार्थी विहित वेळेत पोहोचू शकले नाहीत म्हणूनच त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. परीक्षा सुरू होण्याच्या नियोजित वेळेपूर्वी किमान 30 मिनिटे आधी प्रवेशद्वार बंद केले जाते. त्यानंतर प्रवेश देण्याचे अधिकार कोणत्याही अधिकारी व कर्मचार्‍याला नाही. तसेच कोणत्याही केंद्रावर विहित वेळेपूर्वी प्रवेशद्वार बंद करण्यात आले, अशी तक्रार प्राप्त नाही.
– रोहितकुमार राजपूत, निवासी उपजिल्हाधिकारी

 

Entry to UPSC exam centre denied due to a two-minute delay.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राजधानीतील गणेशोत्सवाची धूम

राजधानी दिल्लीतील गणेशोत्सवानिमित्त सोमवार(आज)पासून महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती, संगीत, नाट्य आणि लोकपरंपरांचे दर्शन घडविणार्‍या कार्यक्रमांची…

5 minutes ago

बाप्पा मोरया रे…

पार्वतीच्या बाळा पायात वाळा पार्वतीच्या बाळा पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशाचा आवाज तारारारा झाला…

8 minutes ago

पिंजर्‍यातील कुत्र्यावर बिबट्याची झडप

सीसीटीव्हीत थरार कैद नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिकरोड परिसरातील चेहेडी बुद्रुक येथील शेतकरी शिवाजीराव म्हस्के…

12 minutes ago

प्रतिबंधित गुटखा, तंबाखूची वाहतूक करणारा ट्रक पकडला

12 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सिडको : प्रतिनिधी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि…

15 minutes ago

गौरी-गणपतीसाठी नाशिकच्या 149 एसटी बसेस कोकणात

जिल्ह्यातील वाहतुकीवर परिणाम नाशिक : प्रतिनिधी गौरी-गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी नाशिक एसटी विभागातील…

33 minutes ago

अपघाताचा रस्ता बंद होता; मनपाचा दावा

सुरक्षेची उपाययोजनाही केलेली, सीसीटीव्ही तपासणार नाशिक : प्रतिनिधी सिद्धार्थनगर येथे घडलेली अपघाताची घटना दुर्दैवी आहे…

39 minutes ago