नाशिक

मनपा जलवाहिनीच्या लोखंडी पाइपला दुचाकी धडकून तरुण ठार

मनपासमोर मृतदेह ठेवून संतप्त नातेवाइकांचे आंदोलन

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमध्ये रस्ते अपघाताची मालिका सुरूच असून, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक येथे मनपाने जलवाहिनीच्या कामासाठी थेट रस्त्यात टाकलेल्या लोखंडी पाइपला दुचाकी जाऊन धडकल्याने यात उपेंद्रनगर येथील एका कामगाराचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाल्याची घटना शनिवारी ( दि. 12) रात्री घडली
दरम्यान, या दुर्घटनेनंतर खोदून ठेवलेल्या रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला असून, नागरिकांच्या रोशाला पुन्हा एकदा पालिकेला तोंड द्यावे लागणार आहे. सिद्धार्थ गोरे असे अपघातामध्ये मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात महापालिकेच्या हलगर्जीमुळेच झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाइकांनी करत रविवारी सिद्धार्थ याचा मृतदेह थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आणून ठेवत आंदोलन केले. यावेळी गोरे यांना आर्थिक मदतीबरोबरच पालिकेत नोकरी देण्याची मागणी केली. सुमारे दोन तास मृतदेह आणून ठेवत राजीव गांधी भवन परिसरात गोंधळ उडाला होता. कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र विविध कामे सुरू आहेत. सगळीकडे रस्त्यांचे खोदकाम करण्यात आलेले आहे. रस्ते खड्डेमय झाले आहेत. नाशिककरांना शहरांतर्गत प्रवास करणेदेखील धोकेदायक झाले आहेत.
रस्त्यांवरील संबंधित कामांविषयी अनेक ठिकाणी कोणतेही सूचनाफलक नसल्याने अपघात होत आहेत. शनिवारी झालेल्या रस्त्यात आडव्या टाकलेल्या काळ्या रंगाच्या पाइपांना सिद्धार्थ गोरे या कामगाराची दुचाकी जाऊन धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर संतप्त नागरिकांनी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सिद्धार्थ गोरेच्या मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर नातेवाइकांसह नागरिकांनी मृतदेह थेट नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर नेत ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याने नागरिकांना महापालिकेत प्रवेश करता आला नाही. त्यामुळे मृतदेह प्रवेशद्वाराबाहेर ठेवत ठिय्या दिला आहे. यावेळी नाशिक महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली. नाशिकमधील रस्त्यांचे खोदकाम आणि खड्डे नागरिकांच्या जिवावर बेतू लागले आहेत. शहरातील कृषीनगर जॉगिंग ट्रॅकजवळ पाण्याच्या पाइपलाइनचे काम सुरू आहे. शनिवारी सायंकाळपासून शहरात रिमझिम पाऊस सुरू होता. काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यात आडवे काळे पाइप टाकण्यात आले होते. त्यातच पावसामुळे त्या ठिकाणी चिखलही साचला होता. सिद्धार्थ गोरे आणि मनोज सूर्यवंशी हे दोघे मित्र शनिवारी रात्री काम आटोपल्यानंतर दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांची दुचाकी अंधारात रस्त्यात टाकलेले काळे पाइप न दिसल्याने पाइपांना धडकली. या अपघातात सिद्धार्थ गोरे या तरुणाचा मृत्यू झाला. मनोज सूर्यवंशी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या ठिकाणी रस्त्यावर काम सुरू असल्याने सावधगिरी म्हणून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या, रिफ्लेक्टरही नव्हते, असा आरोप गोरे यांचे नातेवाईक आणि नागरिकांनी केला आहे. त्यामुळे यास ठेकेदारच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

महापौरांचे आश्वासन
महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी मृतकाच्या घरी जात सांत्वन करत नातेवाइकांशी चर्चा केली. तसेच उच्च न्यायालयाच्या गाइडलाइननुसार गोरे कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन
त्यांनी दिले.

साडेतीन तास ठिय्या
सिद्धार्थ गोरे यांचा मृतदेह पालिका प्रवेशद्वारावर दोन तास नातेवाइकांनी ठेवत ठिय्या दिला. दोन वाजेच्या सुमारास सिद्धार्थचा मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आला. मात्र, त्यानंतरही नातेवाइकांनी तेथून न हालता रास्ता रोकोचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थितांची मनधरणी केल्यावर दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान मृताचे नातेवाईक यांनी पालिकेचा परिसर सोडला.

नातेवाइकांना मदतीचे पत्र
महापालिका प्रशासनाच्या वतीने शहर अभियंता संजय अग्रवाल प्रवेशद्वारावर आले असता, यावेळी त्यांना संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी घेराव घालत या अपघाताला संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी मृत सिद्धार्थ यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला मानधनावर घेण्यासह आर्थिक मदत मिळावी, याबाबतचा ठराव महासभेवर ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र अभियंता अग्रवाल यांनी दिले.

Youth killed after bike hits iron pipe of municipal water main

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राजधानीतील गणेशोत्सवाची धूम

राजधानी दिल्लीतील गणेशोत्सवानिमित्त सोमवार(आज)पासून महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती, संगीत, नाट्य आणि लोकपरंपरांचे दर्शन घडविणार्‍या कार्यक्रमांची…

6 minutes ago

बाप्पा मोरया रे…

पार्वतीच्या बाळा पायात वाळा पार्वतीच्या बाळा पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशाचा आवाज तारारारा झाला…

9 minutes ago

पिंजर्‍यातील कुत्र्यावर बिबट्याची झडप

सीसीटीव्हीत थरार कैद नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिकरोड परिसरातील चेहेडी बुद्रुक येथील शेतकरी शिवाजीराव म्हस्के…

13 minutes ago

प्रतिबंधित गुटखा, तंबाखूची वाहतूक करणारा ट्रक पकडला

12 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सिडको : प्रतिनिधी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि…

16 minutes ago

गौरी-गणपतीसाठी नाशिकच्या 149 एसटी बसेस कोकणात

जिल्ह्यातील वाहतुकीवर परिणाम नाशिक : प्रतिनिधी गौरी-गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी नाशिक एसटी विभागातील…

33 minutes ago

अपघाताचा रस्ता बंद होता; मनपाचा दावा

सुरक्षेची उपाययोजनाही केलेली, सीसीटीव्ही तपासणार नाशिक : प्रतिनिधी सिद्धार्थनगर येथे घडलेली अपघाताची घटना दुर्दैवी आहे…

39 minutes ago