महाराष्ट्र

शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी पाच हजार

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळग्रस्त सुमारे दीड कोटी शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंगळवारी (दि. 27) निधीसह मंजुरी दिली. येत्या दोन दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यांत रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल आणि कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी सर्व पात्र शेतकर्‍यांच्या खात्यांत पैसे पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने पाच हजार रुपयांची अग्रिम आर्थिक मदत देण्याचा निर्णय अलीकडे जाहीर केला होता. त्यानुसार, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील 304 तालुक्यांमधील सुमारे दीड कोटी शेतकर्‍यांना या निर्णयाचा लाभ देण्यास मंजुरी देण्यात आली. मदतीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाच्या (डीबीटी) माध्यमातून शेतकर्‍यांच्या बँक कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे. पिकांचे 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना ही मदत दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. पीक नुकसानीचे पंचनामे आणि मदतवाटपाच्या प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता लक्षात घेऊन दिवाळीपूर्वी अग्रिम रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. येत्या दोन दिवसांत मदतीची रक्कम खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल, तर गुरुवारपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यांत एकूण सात हजार 500 कोटी रुपये जमा करण्याचे नियोजन आहे.
मदत मिळण्यासाठी शेतकर्‍यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. फार्मर आयडी असलेल्या शेतकर्‍यांच्या खात्यांत पाच हजार रुपये जमा केले जाणार आहेत. फार्मर आयडी नसलेल्या शेतकर्‍यांच्या प्रकरणांत केवायसीची पडताळणी करून मदत देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान, मदतीची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर बँकांकडून थकीत कर्जापोटी ती कापून घेतली जाण्याची भीती शेतकर्‍यांना होती. याची दखल घेत, मदतीच्या रकमेतून कर्जाची थकबाकी वजा करू नये, असे स्पष्ट निर्देश बँकांना देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकार्‍यांना दिल्या.
मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून शेतकर्‍यांना दमदाटी करून कर्जवसुली करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. शेतकर्‍यांची तक्रार  तातडीने नोंदवून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सर्व जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी शेतकर्‍यांना दिलासा देण्याबाबत सरकारची भूमिका मांडली. नांदेडमध्ये मायक्रोफायनान्स कंपनीच्या कर्जवसुलीशी संबंधित घडलेल्या घटनेमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना त्रास दिल्याची तक्रार प्राप्त होताच ती नोंदवून घेऊन संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. मायक्रोफायनान्स कंपन्यांनी सक्तीने किंवा दमदाटी करून वसुली करू नये, यासाठी रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) पत्र पाठविण्यात येणार आहे. अशा प्रकारे बळाचा वापर करणार्‍या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांवरही कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

काही शेतकर्‍यांना दुष्काळी मदत नाही
राज्यातील दुष्काळग्रस्तांना जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीतून मोठा वर्ग वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूलमंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी मंत्रालयातील उपसमितीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. त्यानुसार शेतकरी असलेले लोकप्रतिनिधी, आयकर भरणारे शेतकरी आणि शासकीय कर्मचारी असलेले शेतकरी यांना ही पाच हजार रुपयांची दिवाळीपूर्व मदत मिळणार नाही, तर उर्वरित पात्र शेतकर्‍यांना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता याच आठवड्यात थेट खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. यासोबतच रायगड, कोल्हापूरसह आणखी काही तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा अहवाल मागविण्यात आला आहे. दुष्काळी भागातील बँक व पतसंस्थांना कर्जवसुलीसाठी शेतकर्‍यांच्या दारी न जाण्याचे सक्त आदेशही देण्यात आले आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Five thousand rupees to farmers before Diwali

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पिंपळगावमध्ये बंद घर फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

शिवाजीनगरमधील घटना; दोन संशयित ताब्यात पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी शिवाजीनगर परिसरात बंद घराचे कुलूप व…

19 minutes ago

येवल्यात स्वामी समर्थ केंद्रात चोरट्यांचा डल्ला

भाविकांत संताप; दानपेटीतील रोकड अन् सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास येवला : प्रतिनिधी शहरातील पारेगाव रोड परिसरातील…

23 minutes ago

दुष्काळात गरिबांच्या ताटातील घास हिरावला!

इगतपुरीत 4,300 शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा घोटी : प्रतिनिधी एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी आणि…

36 minutes ago

चेहेडी बुद्रुकमध्ये बिबट्याची दहशत कायम

पिंजर्‍यातील ‘गुड्डू’ कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न; सीसीटीव्हीत हालचाली कैद नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी चेहेडी बुद्रुक येथील…

48 minutes ago

सातपूरमध्ये तरुणासह 8 ते 10 जणांचा धुडगूस

टेम्पोची काच फोडून दहशत सिडको : प्रतिनिधी मित्रासोबत राहू नको, या कारणावरून कुरापत काढत एका…

53 minutes ago

दानिशच्या जामिनीवर आज सुनावनी

सिडको : प्रतिनिधी नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील महिला कर्मचार्‍यांना धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिश याच्या जामीन…

57 minutes ago