मंत्री शेलारांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
नाशिक : प्रतिनिधी
केवळ भारताच्याच नव्हे, संपूर्ण आशियाच्या सिनेसृष्टीचा उगम दादासाहेब फाळके यांनी ज्या नाशिकमधून केला, तिथे फिल्मसिटी अर्थात चित्रनगरी उभारण्याच्या गेल्या अडीच दशकांच्या स्वप्नाला सरकारने पुन्हा एकदा ढोपराने गूळ लावला आहे. सुमारे नऊ महिन्यांपूर्वी तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष बैठकीत नाशिक फिल्मसिटीचा अंतिम आराखडा मंजूर करून एका पैशाचाही निधी नाशिकला मिळालेला नाही. किंबहुना, हा निधी सिनेसृष्टीसाठी अव्यवार्ह ठरणार्या रामटेकच्या फिल्मसिटीकडे वळविण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मुंबईत बुधवारी झालेल्या 62 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी नाशिक आणि रामटेक येथे नवीन फिल्मसिटी उभारण्याच्या दिशेने शासन वेगाने काम करत असल्याचे म्हटल्याने या क्षेत्रातील लोकांच्या भुवया
उंचावल्या आहेत.
आधुनिक शहरी सुविधा, शेती आणि गावे, लेणी, मंदिरे, नद्या, निसर्गरम्य परिसर अशा सिनेमाच्या शूटिंगसाठी आवश्यक अनेक गोष्टींनी नाशिक समृद्ध आहे. आधीपासूनच मुंबईशी असलेली भौगोलिक जवळीक आता समृद्धी महामार्गामुळे अधिकच वाढली आहे. त्यामुळे फिल्मसिटी उभारण्यासाठी नाशिक सर्वार्थाने योग्य आहे. त्यामुळे आणि चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंची कर्मभूमी असल्याने नाशिकमध्ये फिल्मसिटी उभारावी, अशी मागणी गेल्या अडीच दशकांपासून केली जाते आहे. मात्र, या मागणीला दीर्घकाळ वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे कामच सरकारने केले. दरम्यान, 2009 मध्ये तत्कालिन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून नाशिक येथे फिल्मसिटी उभारण्याला राज्य सरकारची मान्यता मिळाली. त्यासाठी सुमारे 10 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला. पुढे इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील सुमारे 117 एकर शासकीय जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला देण्याचा प्रस्तावही महसूल विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर या विषयावर अनेकदा चर्चा झाल्या. मागण्यांची उचल खाल्ली. पण, ठोस कारवाई काहीच झाली नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित अधिकारी आणि मंत्री यांची नाशिक फिल्मसिटीबाबत एक विशेष बैठक झाली. त्यावेळी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले. परंतु, पुढे फारशी प्रगती
झाली नाही.
दरम्यान, रामटेक येथेही फिल्मसिटी उभारण्याच्या चर्चा सुरू झाल्या. विशेष म्हणजे, सिनेनिर्मितीसाठी अनेकार्थाने प्रतिकूल असलेल्या रामटेकला नाशिकपेक्षा अधिक प्राधान्य देत काम सुरू आहे. तर नाशिककडे नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष केले गेले आहे. असे असतानाही चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ‘नाशिकच्या फिल्मसिटीचे काम वेगात सुरू आहे’, असे म्हटल्याने ‘हे काम नेमके कुठे सुरू आहे?’ असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.
नाशिकच्या हातातोंडाशी आलेला फिल्मसिटीचा घास हिरावून घेतला जातो आहे. दरवेळी अतिशय थातूरमातूर कारणे सांगून याबाबत चालढकल केली जाते. त्यासाठी ज्या तथाकथित सर्वेक्षणाचे कारण दिले जाते ते कोण करते? कुठे करते? त्यात काय निष्कर्ष निघतात? हे कुणालाच समजत नाही. खरे तर नाशिकची फिल्मसिटी ही अतिशय व्यवहार्य ठरेल. पण, ती तशी नसेल तरी भारतीय सिनेसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळकेंच्या ऋणातून उतराई होण्याच्या नैतिक भावनेतून तरी सरकारने नाशिकला फिल्मसिटी प्रत्यक्षात आणली पाहिजे.
– श्याम लोंढे (समितीप्रमुख, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ)
The government continues to pay mere lip service to the dream of the Nashik Film City.
सोशल मीडियावर झळकले 80 च्या दशकातील फोटो नाशिक : प्रतिनिधी एआयने आताच्या पिढीला थेट 80…
स्थायी सदस्यांचा आरोप, पाणीपट्टी वाटपात घोळ नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेने पाणीपट्टी वितरणासाठी नेमलेल्या खासगी…
सिन्नरच्या पारेषण व्यवस्थेला बळ 300 एमव्हीए क्षमतेची भर पडणार; 121 किमी पारेषण वाहिन्या उभारणार, वर्षभरात…
बनावट नंबरप्लेट लावून टोलनाका पार, फास्टॅग संदेशामुळे चोरीचा माग लागला सिडको : प्रतिनिधी अंबड पोलिस…
शिक्षणाचा अधिकार प्रत्येक मुलाचा आहे, असे आपण अभिमानाने सांगतो, पण शिक्षणासाठी आवश्यक असलेले आरोग्य आणि…
इराणचे नेतृत्व संपुष्टात आणले आहे, इराणची क्षेपणास्त्रे नष्ट केली आहेत, त्यांच्याकडे युद्ध करण्याची क्षमता नाही,…