पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली असून, या दोन्ही राज्यांत ऐतिहासिक सत्तापरिवर्तन झाले आहे. केरळमध्ये काँग्रेसला नवीन मुख्यमंत्री निवडायचा असून, पुद्दुचेरीत ऑल इंडिया एन.आर. काँग्रेसचे एन. रंगास्वामी पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे संकेत आहेत. आसाममध्ये भाजपाचे हिमंता बिस्वा सरमा यांचीच पुन्हा मुख्यमंत्रिपदी निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात शनिवारी, दि. 9 मे रोजी एक नवा अध्याय सुरू झाला. भाजपाला खणखणीत बहुमत मिळाल्याने पहिल्यांदाच या राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाले. सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हा कोलकात्यातील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर हजारो समर्थक उपस्थित होते. शपथविधीसाठी भाजपाने जाणीवपूर्वक पश्चिम बंगालचे सुपुत्र रवींद्रनाथ टागोर यांच्या 165 व्या जयंतीचे औचित्य साधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय नेते आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीशासित राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. संपूर्ण मैदान जय श्रीरामच्या घोषणांनी आणि शंखनादाने दुमदुमून गेले होते. वातावरणनिर्मितीसाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रवेशद्वारापासून मंचापर्यंत रोड शो केला. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपाने गेल्या सात-आठ वर्षांत सर्व नीतींचा अवलंब केला. त्यातील सर्वांत महत्त्वाची खेळी म्हणजे, ममता बॅनर्जी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या सुवेंदू अधिकारी यांना पक्षात आणणे. सुवेंदू अधिकारी यांनी 19 डिसेंबर 2020 रोजी मिदनापूर येथील एका मोठ्या जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपाचे सदस्यत्व घेतले. भाजपात येण्यापूर्वी ते तृणमूल काँग्रेसचे प्रभावी नेते आणि ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात परिवहनमंत्री होते. त्यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. अधिकारी यांची राजकीय कारकीर्द बहुआयामी आहे. 2007 मध्ये नंदीग्राममधील जमीन अधिग्रहणविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करून ते जननेता म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यावेळच्या डाव्या आघाडी सरकारने विशेष आर्थिक क्षेत्रासाठी सक्तीने जमीन अधिग्रहण सुरू केले होते, त्याविरोधात उभारलेल्या या आंदोलनामुळेच 2011 मध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता आली. अधिकारी यांनी 2009 आणि 2014 मध्ये तामलुक लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. सन 2016 मध्ये ते आमदार झाले आणि ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात परिवहनमंत्री म्हणून काम पाहिले. भाजपात प्रवेश केल्यानंतर 2021 च्या निवडणुकीत त्यांनी नंदीग्राममधून खुद्द ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. त्यानंतर सन 2021 ते 2026 या काळात विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका बजावली. याचमुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली आणि भाजपाला विजयपथ लाभला. या निवडणुकीत भवानीपूरमध्येही ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्याची करामत त्यांनी केली. रविवारी, 10 मे रोजी तामिळनाडूच्या राजकीय इतिहासाला ’विजय’ नावाचे एक पान जोडले गेले. तमिळगा वेत्री कळघम अर्थात, टीव्हीके पक्षाचे नेते सी. जोसेफ विजय (थलपती) यांनी चेन्नईतील नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ हजारो चाहत्यांच्या साक्षीने घेतली. टीव्हीकेला 234 पैकी सर्वाधिक 107 जागा मिळूनही बहुमताअभावी सत्ता स्थापन करण्यात अडचणी आल्या. विजय यांना काँग्रेस, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, व्हीसीके (विदुथलाई चिरुथाईगल कच्ची) आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी कसरत करावी लागली. तसा काँग्रेसने त्यांना आधीच पाठिंबा जाहीर केला होता. शपथ घेताच विजय यांनी तामिळनाडूच्या जनतेला मोठी भेट दिली. दरमहा 200 युनिट मोफत वीज, प्रत्येक जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी पथकाची स्थापना आणि महिला सुरक्षा दलाची स्थापना या निर्णयांच्या आदेशावर त्यांनी लागलीच स्वाक्षरी केली. शपथविधीसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. या निवडणुकीत विजय यांनी तामिळनाडूच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलवून टाकला. तामिळनाडूत पारंपरिकपणे द्रमुक व अण्णा द्रमुकया दोन पक्षांची आलटूनपालटून सत्ता येत असायची. यावेळी टीव्हीकेने दोन्ही पक्षांना जबरदस्त धक्का दिला. टीव्हीकेचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी द्रमुकचे सर्वेसर्वा एम. के. स्टॅलिन यांचा त्यांच्या कोलाथूर या बालेकिल्ल्यात पराभव केला. मतदारांशी भावनिक नाते, सामाजिक बांधिलकी आणि विश्वासार्ह नेतृत्व यांमुळे विजय यांच्या पक्षास हे यश मिळाले. टीव्हीके पक्षाची स्थापना अभिनेते थलपती विजय यांनी 2 फेब्रुवारी 2024 रोजी केली. धर्मनिरपेक्ष सामाजिक न्याय, समता आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन ही या पक्षाची विचारधारा आणि उद्दिष्टे आहेत. पेरियार (सामाजिक न्याय), कामराज (शिक्षण आणि प्रशासन), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (समानता) आणि वेलू नचियार (महिला शक्ती) यांच्या विचारांना हा पक्ष आदर्श मानतो. तामिळनाडूतील द्राविडी राजकीय परंपरेत चित्रपट कलावंतांना लोक देवासमान मानतात, त्याच अनुषंगाने थलपती विजय यांना जनतेने उचलून धरले आहे. अत्यंत अल्पावधीत स्थापन झालेला हा पक्ष थेट सत्तेवर आला, हेच या निवडणुकीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी आणि तामिळनाडूत थलपती विजय या दोन्ही नेत्यांनी आपापल्या राज्यांत राजकीय इतिहास घडवला आहे. एकाने दशकांची स्थापित सत्ता उलथवली, तर दुसर्‍याने केवळ नवा पक्ष स्थापन करून दोन वर्षांत थेट मुख्यमंत्रिपद मिळविले. पश्चिम बंगालमध्ये सत्तापरिवर्तन अपेक्षित मानले जात होते. तामिळनाडूत सी. जोसेफ विजय करिश्मा करतील, असेही मानले जात होते, पण ते मुख्यमंत्री होतील, असे भाकीत करण्याचे धाडस कोणीही केले नव्हते.

‘Victory’ Path

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नॉन क्रिमीलेअर मर्यादा पंधरा लाख

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…

3 minutes ago

मोटेगावकरच्या मुलासह विद्यार्थी, पालक रडारवर

नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…

19 minutes ago

काटकसर-पर्व

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…

22 hours ago

माय मराठीसह बोलीभाषांचा जागर; आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा

माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…

22 hours ago

समाजाची अधोगती…

गेल्या आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नाला गेलो होतो. खरेतर लग्न कसले, फक्त वैताग. जावे लागते म्हणून लोक…

22 hours ago

मनमाड एसटी आगारात प्रवाशाची अडवणूक

सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा ज्येष्ठ नागरिकाचा आरोप मनमाड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या…

22 hours ago