आस्वाद

सत्ता राखणार की परिवर्तन ?

देशातील चार राज्यांच्या आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल उद्या
(दि. 4 मे) लागणार आहे. या राज्यांमध्ये सत्तांतर होणार की, गेल्या काही वर्षांपासून लोकांच्या विश्वासावर टिकलेली सरकारे पुन्हा येणार, हे स्पष्ट होणार आहे. भाजपाने इतर सर्वच निवडणुकांप्रमाणे याही निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यातही पश्चिम बंगालमध्ये त्यांनी मोठी आघाडी उघडली आहे.

पश्चिम बंगालमध्ये काहीही करून सत्ता मिळवायची असा चंग भाजपाने बांधला आहे. त्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्री या राज्यात तळ टाकून होते. अमित शहा यांनी निवडणुकीतील सर्वच गोष्टींकडे जातीने लक्ष पुरवले आहे. भाजपाच्या या शक्तीसमोर आता ममता बॅनर्जी यांची लोकप्रियता किती टिकाव धरते, हे पाहावे लागणार आहे. या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये सात लाखांहून अधिक केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगानेही आपले विशेष अधिकारी इथे तैनात केले आहेत. त्यांनी जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे ममता यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. इतरही सर्व संस्था इथे जीव तोडून मेहनत करत आहेत. चक्क पंतप्रधानांनाही आपल्या सुरक्षा कड्याच्या बाहेर जाऊन दहा रुपयांची बंगाली भेळ म्हणजे जालमुडी खावी लागली आहे. भाजपाच्या अध्यक्षांनी तर चक्क केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बुलेटप्रूफ गाडीतून निवडणूक प्रचार मिरवणूक काढली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निमित्ताने देशभरात महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी कसा विरोध केला, हे सांगितले जात आहे. या सार्‍या तयारीच्या विरोधात ममता बॅनर्जी यांच्याकडे केवळ त्यांची लोकप्रियता आहे. त्यांच्याविषयीचा लोकांच्या मनात असलेला विश्वास आहे. ममता यांच्या रॅलीमध्ये सहभागी होणार्‍या लोकांच्या चेहर्‍यावरचे हावभाव जरी पाहिले तरी ममता यांच्या प्रतिष्ठेचा अंदाज येऊ शकेल. त्या लढवय्या आहेत. येणार्‍या आव्हानांना सामोरे जाणार्‍या आहेत. त्यांच्या सभांना त्यांच्या मिरवणुकांना त्यांच्या आव्हानांना जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो तो काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना जंग जंग पछाडूनही मिळत नाही. त्यांना बंगाली जनतेची मोठी साथ आहे. ही साथ त्यांनी मतदानातूनही दाखवून दिली आहे. सहसा सरकारविरोधातील जनमताच्या वेळी विक्रमी मतदान होत असते, हे आपण पाहिलेले आहे. पश्चिम बंगामध्ये एसआयआरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ममता यांच्या पारंपरिक मतदारांची मते कापण्यात आली. या मतदारयादीतून नाव कापलेल्यांनी तिथे एक आघाडी उघडली असून, ते ममता यांच्या बाजूने प्रचार करत होते.पुनरीक्षणाच्या नावाखाली मतदार यादीतून नावे कापायची आणि नंतर मतदानाच्या वेळेनंतर मतदान घडवायचे, हा महाराष्ट्रातील फॉर्म्युला इथे यशस्वी होऊ नये, यासाठी लोकांनी स्वतःच मतदान केले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम निकालावर काय होतो ते पाहावे लागणार आहे. पश्चिम बंगालमधील उद्याची मतमोजणीही लोकशाहीच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. उद्या (4 मे) दिवसभरात ज्या ज्या घडामोडी घडतील त्या या देशावर दूरगामी परिणाम करणार्‍या ठरणार आहेत. अशाच प्रकारचे चित्र तामिळनाडू आणि केरळमध्ये आहे. तिथे पंतप्रधानांनी केवळ काही सभा घेतल्या आहेत. मात्र, त्यांनी यावेळी पश्चिम बंगाल आणि नंतर दक्षिणेकडची राज्ये असा क्रम ठरवलेला असू शकतो. केरळमध्ये धार्मिक मुद्दे महत्त्वाचे ठरत नाहीत. याचे कारण केरळमध्ये साक्षरतेचे प्रमाण शंभर टक्के आहे. तिथे शिक्षणाला आणि रोजगाराला मोठे महत्त्व आहे. तामिळनाडूची आपली एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक संस्कृती आहे. त्यामुळे तिथेही केवळ धार्मिक द्वेषाच्या राजकारणावर मतदान होत नाही. त्यामुळे या निवडणुका भाजपासाठी काहीशा कठीण असल्या, तरी त्यांच्याकडे ज्ञान असल्याने ते यातूही काही मार्ग काढतात का, ते पाहावे लागणार आहे.
महाराष्ट्रात काही पोटनिवडणुका असल्या तरी इथे एक वेगळे राजकारण सुरू आहे. उत्तरेतील एका साधूने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. त्यानंतर दुसर्‍या एकानेही त्यांनी माफी मागू नये. महाराष्ट्रात शिवरायांनी काही लढाया केल्या नाहीत. ज्या काही केल्या त्या केवळ पेशव्यांनी केल्या, असे विधान करून त्यांच्या मठाला महाराष्ट्रात जागा मिळेल का, याची चाचपणी केली आहे. महाराष्ट्रातील एका आमदारानेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचे कारण देत त्यांच्या संदर्भात वादनिर्माण केला होता. या सार्‍या प्रकारांकडे पाहता हे सारे योजनाबद्ध रीतीने होत असून, त्याच्या पाठीमागे एक शक्ती उभी असल्याचे दिसून येते. कोणत्याही राज्यावर अतिक्रमण करायचे असते तेव्हा तेथील प्रतीकांना धक्का द्यावा लागतो. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोणीही लुंगासुंगा बेताल वक्तव्य करत आहे. त्याला विरोध करणार्‍यांवर तातडीने कारवाई होत आहे. समाजमाध्यमांवरून काही जण मराठी मुलांनी याचा हिंसक प्रतिवाद करायला हवा, अशा पोस्ट आपल्या घरात लिहून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्नही सुरू केला आहे. त्यातून त्यांना बरेच काही साध्य करायचे आहे.
या सार्‍या गोष्टींचा राज्यातील तरुणांनी अगदी बारकाईने विचार करायला हवा. हे राज्य याआधी पुरोगामी, स्वाभिमानी म्हणून ओळखले जात होते. त्याला चुड लावण्यात आली. त्यानंतर आता थेट या राज्याच्या आराध्य दैवतालाच बदनाम करण्याचे काम होत आहे. त्यावर काही जण जबाबदारी झटकून केवळ हात वर करत आहेत. तरुणांनी आता अशा लोकांपासून सावध राहायला हवे. महाराष्ट्राचा इतिहास हा लिहिला गेला आहे. अनेकांनी त्यासाठी कष्ट घेतले आहेत. मुलांनी ते वाचावेत. त्यानंतर आपली मते तयार करावीत. एकेकाळी साधू-संत हे सर्वसामान्यांना ज्ञानाचा, अध्यात्माचा मार्ग सांगत असतं. आता त्यांच्यातील काही सुपारीबाज झाले आहेत. त्यांना फूस लावली तर ते काहीही बडबडायला लागले आहेत. केवळ भगवी वस्त्रे लेऊन कोणी साधू होत नाही. त्यासाठीची आध्यात्मिक उंची असावी लागते. आपल्या सुदैवाने राज्याला ज्ञानेश्वर माउलींपासून ते थेट गाडगे महाराजांपर्यंतची एक मोठी परंपरा लाभली आहे. त्यामुळे आपल्या राज्याला अशा बांडगुळांची गरज नाही. तरुणांनी या सार्‍या घडामोडींकडे पाहून नेमके काय राजकारण शिजवले जात आहे. याचा बारकाईने अभ्यास करावा. त्यांना जर या राज्याची शांतताभंग करायची असेल तर अशा लोकांना थारा देता कामा नये. या राज्याची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी ही राज्यातील लोकांवर आणि त्यातही तरुणांवर आली आहे. ते ही जबाबदारी योग्य रीतीने पार पाडतील.

Will you maintain power or change?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago