नाशिक

लाडक्या ‘गणराया’च्या आगमनाने चैतन्याची अनुभूती

आज होणार प्रतिष्ठापना; नागरिकांसह मंडळे सज्ज

नाशिक : प्रतिनिधी
लाडक्या गणरायाचे आज आगमन होत असून, घराघरांत सजावटीची लगबग, मंडळांमध्ये आरास पूर्ण करण्याची धावपळ, बाजारपेठेत खरेदीसाठी झालेली गर्दी आणि रस्त्यांवर घुमणारा ढोल-ताशांचा निनाद यामुळे चैतन्याची अनुभूती येत आहे.
विघ्नहर्त्याच्या आगमनासाठी भाविकांसह सार्वजनिक मंडळे सज्ज झाली आहेत. गणेशोत्सवात नाशिकच्या वातावरणाला एक वेगळीच लय असते. सिडको, सातपूर, पंचवटीपासून नाशिकरोडपर्यंत आणि गंगापूररोडपासून जुन्या नाशिकपर्यंत विविध भागांतील गणेश मंडळांच्या मंडपांना अंतिम रूप देण्यात आले आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, पारंपरिक देखावे आणि सामाजिक संदेश देणार्‍या संकल्पनांनी मंडप सजले आहेत.
अनेक मंडळांमध्ये रविवारी रात्री उशिरापर्यंत आरास पूर्ण करण्याचे काम सुरू होते. घरगुती गणेशोत्सवाची तयारीही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य, फुले, हार, दुर्वा, मोदकांसह नैवेद्याच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी झाली आहे. मूर्ती घेऊन जाणार्‍या भाविकांमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरही उत्सवी चित्र दिसत होते. हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने धार्मिक वातावरण अधिकच भक्तिमय झाले आहे. महिलांची हरितालिका पूजेची तयारी आणि गणेश स्थापनेची लगबग यामुळे घराघरांत पहाटेपासूनच उत्साहाचे वातावरण राहणार आहे. रोषणाईने उजळणारे मंडप, कानावर पडणारा ढोलताश्यांचा निनाद आणि अधूनमधून घुमणारा ‘गजानना श्री गणराया’चा जयघोष यामुळे नाशिकचे वातावरण गणेशमय झाले आहे.
अशी करा प्रतिष्ठापना
गणेश चतुर्थीनिमित्त घरोघरी श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची तयारी सुरू असून, यंदा गणेश स्थापना व पूजनासाठी सकाळी 11.02 ते दुपारी 1.31 या मध्यान्ह काळातील मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. या कालावधीत भक्तांनी विधिवत श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून पूजा-अर्चा करावी,
गणेश प्रतिष्ठापनेसाठी सर्वप्रथम पूजेची जागा स्वच्छ करून पाटावर लाल किंवा पांढरे वस्त्र अंथरावे. त्यावर रांगोळी काढून अक्षता ठेवाव्यात. त्यानंतर शुभ मुहूर्तावर श्रीगणेशाची मूर्ती पाटावर विधिवत स्थापन करावी. मूर्तीची स्थापना करताना बाप्पाचे मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे राहील, याची काळजी घ्यावी. गणेशमूर्ती स्थापनेनंतर कलशाची मांडणी करून त्याचे पूजन करावे. तसेच दिवा व घंटा यांचे पूजन करून गणरायाला हळद-कुंकू, अक्षता, फुले आणि दुर्वा अर्पण कराव्यात. गणेश पूजनामध्ये दुर्वांना विशेष महत्त्व असल्याने शक्यतो 21 किंवा त्याप्रमाणे दुर्वांची जुडी अर्पण केली जाते. त्यानंतर मोदक किंवा आवडीचा नैवेद्य दाखवावा. पूजेच्या पुढील टप्प्यात श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करून गणपती अथर्वशीर्ष, गणेश मंत्र किंवा स्तोत्राचे पठण करावे. विधिवत पूजा पूर्ण झाल्यानंतर श्रीगणेशाची आरती करून प्रसादाचे वाटप करावे.

उत्सवासाठी शहर सज्ज
घरगुती व सार्वजनिक गणेश स्थापनेसाठी तयारी पूर्ण
गणेशमूर्ती व पूजासाहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
ढोल-ताशा पथकांकडून स्वागताची तयारी
सामाजिक संदेश देणार्‍या देखाव्यांवर मंडळांचा भर

 

A sense of vibrancy upon the arrival of the beloved ‘Ganaraya’.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

गौरी-गणपतीसाठी नाशिकच्या 149 एसटी बसेस कोकणात

जिल्ह्यातील वाहतुकीवर परिणाम नाशिक : प्रतिनिधी गौरी-गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी नाशिक एसटी विभागातील…

17 minutes ago

अपघाताचा रस्ता बंद होता; मनपाचा दावा

सुरक्षेची उपाययोजनाही केलेली, सीसीटीव्ही तपासणार नाशिक : प्रतिनिधी सिद्धार्थनगर येथे घडलेली अपघाताची घटना दुर्दैवी आहे…

23 minutes ago

मनपा जलवाहिनीच्या लोखंडी पाइपला दुचाकी धडकून तरुण ठार

मनपासमोर मृतदेह ठेवून संतप्त नातेवाइकांचे आंदोलन नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये रस्ते अपघाताची मालिका सुरूच असून,…

28 minutes ago

दोन मिनिटे उशीर झाल्याने यूपीएससी परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला

पालक, विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा; यूपीएससी विद्यार्थ्यांना खड्डे, ट्रॅफिकचा मोठा फटका नाशिक : प्रतिनिधी यूपीएससी परीक्षेच्या…

36 minutes ago

एसटी बसखाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

सिडको : प्रतिनिधी म्हसरूळ परिसरातील दिंडोरी रोडवर रविवारी सायंकाळी एसटी बसखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…

46 minutes ago

येवल्यात डंपरच्या धडकेत दोन तरुण ठार

येवला : प्रतिनिधी शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर शनिवारी (दि. 13) सकाळी अकराला भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार…

51 minutes ago